सकाळी उठल्यावर करावयाच्या कृती
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सकाळी उठल्या उठल्या आपली नियोजित कामे करण्याच्या मागे लागतो. अशा वेळी उठल्यावर थोडा वेळ धर्माचरण केल्यास त्याचा दिवसभर लाभ होऊ शकतो.
सकाळी उठल्यावर प्रथम ….
*१. उजव्या कानाला हात लावून श्रीविष्णूची ‘ॐ श्री केशवाय नम: ।’… अशी २४ नावे म्हणावीत.*
श्रीविष्णूची नावे घेतांना
उजव्या कानाला हात लावून श्रीविष्णूची
‘ॐ केशवाय नमः ।,
ॐ नारायणाय नमः ।,
ॐ माधवाय नमः ।,
ॐ गोविंदाय नमः ।,
ॐ विष्णवे नमः ।,
ॐ मधुसूदनाय नमः ।,
ॐ त्रिविक्रमाय नमः ।,
ॐ वामनाय नमः ।,
ॐ श्रीधराय नमः ।,
ॐ हृषीकेशाय नमः ।,
ॐ पद्मनाभाय नमः ।,
ॐ दामोदराय नमः ।,
ॐ संकर्षणाय नमः ।,
ॐ वासुदेवाय नमः ।,
ॐ प्रद्मुम्नाय नमः ।,
ॐ अनिरुद्धाय नमः ।,
ॐ पुरुषोत्तमाय नमः ।,
ॐ अधोक्षजाय नमः ।,
ॐ नारसिंहाय नमः ।,
ॐ अच्युताय नमः ।,
ॐ जनार्दनाय नमः ।,
ॐ उपेंद्राय नमः ।,
ॐ हरये नमः ।,
ॐ श्रीकृष्णाय नमः ।’
अशी २४ नावे म्हणावीत. आदित्य, वसु, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, अनील इत्यादी सर्व देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला, तरी आचमनाचे फळ मिळते.
*२. त्यानंतर श्री गणेशवंदन म्हणावे*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।*
*निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।*
*अर्थ :*
वाकडी सोंड, शरिराचा मोठा आकार आणि कोटी सूर्यांच्या प्रकाशाचे तेज ज्याच्या शरिरावर आहे, त्या विघ्नहर्ता श्री गजाननास कार्यसिद्धीसाठी मी वंदन करतो.
*३. देवतावंदन*
*ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरांतकारिर्भानु: शशी भूमिसुतो बुधश्च ।*
*गुरुश्च शुक्र: शनिराहुकेतव: कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् ।।*
*अर्थ :*
निर्माता ब्रह्मदेव; पालनकर्ता आणि ‘मुर’ या दानवाचा वध करणारा श्रीविष्णु; संहारक आणि ‘त्रिपूर’ राक्षसाचा वध करणारा शिव हे प्रमुख तीन देव आणि सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु आणि केतु हे नवग्रह माझी सकाळ शुभ करोत.
*४. पुण्यपुरुषांचे स्मरण*
*पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः ।*
*पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः ।।*
*अर्थ :*
पुण्यवंत नल, युधिष्ठिर, विदेह (जनक राजा) आणि भगवान जनार्दन यांचे मी स्मरण करतो.
*५. सप्तचिरंजिवांचे स्मरण*
*अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।*
*कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ।।*
*अर्थ :*
द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, दानशूर बलीराजा, वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा परशुराम हे सात चिरंजीव होत. यांचे मी स्मरण करतो.
*६. पंचमहासतींचे स्मरण*
*अहिल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा ।*
*पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।*
*अर्थ :*
गौतमऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभु रामचंद्रांची पत्नी सीता, राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती आणि रावणाची पत्नी मंदोदरी या पाच महासतींचे जो स्मरण करतो, त्याच्या महान पातकांचा नाश होतो.
*७. सात मोक्षपुरींचे स्मरण*
*अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची ह्यवन्तिका ।*
*पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः ।।*
*अर्थ :*
अयोध्या, मथुरा, मायावती (हरिद्वार), काशी, कांची, अवन्तिका (उज्जयिनी) आणि द्वारका या सात मोक्षपुरी आहेत. म्हणजेच या सात मोक्ष देणार्या नगरी आहेत. यांचे मी स्मरण करतो.
*८. करदर्शन*
दोन्ही हातांची ओंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणावा.
*कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।*
*करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।*
*अर्थ :*
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन घ्यावे. . श्लोकाचा भावार्थ
*१. लक्ष्मीचे महत्त्व*
‘हाताच्या अग्रभागावर (कराग्रे) लक्ष्मी आहे, म्हणजे बाह्य भौतिक भाग हा लक्ष्मीरूपाने विलसत आहे. म्हणजे भौतिक व्यवहारासाठी लक्ष्मीची (धनाचीच नव्हे, तर पंचमहाभूते, अन्न, वस्त्र वगैरेंची) आवश्यकता आहे.
*२. सरस्वतीचे महत्त्व*
धन किंवा लक्ष्मी प्राप्त करतांना ज्ञान आणि विवेक नसेल, तर लक्ष्मी अलक्ष्मी ठरून नाशाला कारणीभूत होते; म्हणून सरस्वतीची आवश्यकता आहे.
*३. सर्वकाही गोविंदच असणे*
गोविंद हाच सरस्वतीरूपाने मध्यभागी आणि लक्ष्मीरूपाने अग्रभागी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात शिव-पार्वती स्तवनात म्हणतात, ‘मूल, मध्य आणि अग्र हे तिन्ही वेगळे दिसत असले, तरी या तिन्हींमध्ये गोविंदच त्या स्वरूपातून कार्य करीत आहे. जवळजवळ सर्वच उद्योग हाताच्या बोटांच्या अग्रभागाने होतात, म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे; परंतु त्या हातात मूल स्रोतातून येणारा अनुभवी ज्ञानाचा प्रवाहच गेला नाही, तर तो त्याशिवाय कार्यही करू शकत नाही.’
*९. भूमीवंदन*
‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.
*समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।*
*विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।*
अर्थ : समुद्ररूपी वस्त्र धारण करणार्या, पर्वतरूपी स्तन असणार्या आणि भगवान श्रीविष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, मी तुला नमस्कार करतो. तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे, याबद्दल तू मला क्षमा कर.
माहिती संदर्भ:-Santan Santha