बोडण - चित्पावन कुळसंस्कार
बोडण विधी- या विधीला एकूण चार सवाष्णी व एक कुमारिका आवश्यक असते. (घरातील एक व बाहेरच्या तीन सवाष्णी). बोडण दुपारी १२ वाजेचे आत भरावयाचे असते. बोलविलेल्या सवाष्णींचे व कुमारिकेचे तुळशीपाशी पायावर दूध पाणी घालून, औक्षण करून, ओटी (खणा नारळाची थवा खोबऱ्याची-ऐपतीप्रमाणे) भरून स्वागत करायचे असते. विधीच्या सुरुवातीस सुपारीचा गणपती मांडून त्याची पंचामृती, षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर घरातील देवीला ताम्हनांत घेऊन तिचीही तद्वत पूजा करावी. देवीला बोडणासाठी परातीत ठेवण्यापूर्वीची तयारी- कणकेत हळद घालून ती दुधात भिजवावी. त्याचा पाट अथवा चौरंग तयार करून त्यावर देवीची मूर्ती ठेवावी. मूर्तीमागे हारा-डेरा ठेवावा. तो दुधाने भरावा, मणी-मंगळसूत्र, वेढी-विरोल्या, बांगड्या, गळेसर, वेणी हे सर्व कणकेचे अलंकार करावेत. याशिवाय त्याच कणकेचे पाच भंडारे, पाच दिवे व दोन मुटके करावेत. भंडारे प्रत्येकी एकेक या स्वरूपात वहायचे. केलेल्या दिव्यांमधून वाती घालून आरती करावी, तेही दिवे परातीत घ्यावे. परातीत छोटे पाच नैवेद्य वाढावेत. ते नैवेद्य देवीला दाखवावेत. कुमारिकेचा नैवेद्य सहावा वाढून ते पान तिला जेवायला ठेवायचे. यानंतर बोडण कालवावयास सुरुवात करावी. कुमारिकेला वरचेवर विचारून तिचे समाधान होईपर्यंत पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) घालत रहावे. बोडण झाल्यानंतर सवाष्णींना व कुमारिकेस जेवावयास वाढावे. बोडण झाल्यानंतर देवी धुवून, स्नान घालून परत घरातील देवघरांत पूजा करून ठेवावी. त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसादाचे भोजन करावयाचे. कालवलेले बोडण गाईस खायला घालावयाचे अथवा नदीत सोडून द्यावे
-------------------
बोडणाची आरती
जय देवी जयदेवी जय अंबामाते।.
तुमचा मी आज खेळ मांडीते ।।धृ।।
सुवासिनी कुमारी ह्या आल्या सदना।
पाय धुवूनी करिते आऔक्षणा।।
कुंकुम श्रीफल देवुनि ओट्या ही भरिते।
लीन होऊनी वंदन करिते ।।१।। जय देवी।।
आवड तुम्हा मोठी पंचामृताची।
तशीच आहे पुरणा वरणाची।।
दूध, दही, तूप, मध, शर्करा नच कमिते ते।
तृप्त होऊनि चेले तू माते ।।२।। जय देवी।।
सुवासिनी कुमारी बसती प्रेमे भोजना।
त्यासी आर्पिते वीडा दक्षणा।।
भक्ति भावे केला खेळ मानुनि घेई।
सौभाग्य समृद्धी सकला देई ।।३।। जय देवी।।
-----------------------
(चाल- आरती ज्ञानराजा)
आरती अन्नपूर्णा। माझी येवू दे करुणा।
आरती अन्नपूर्णा नवरात्री नवमीला,
थाट बोडणाचा केला, कुवार-सुवासिनी,
तुम्आ करिते वंदना।।
पायावर दुधपाणी, माझ्या तुळशी अंगणी,
धरूनि प्रेम भाव, आता यावे हो सदना।।
कोरीव काथोट, आत कणिकेचा पाट,
वरती बैसविली, तुझी मूर्ती सुवर्णा..
पाच दिवे पुरणाचे, माझ्या प्राणांचे,
ओवाळी ते मनोभावे, वरी देते दक्षिणा।।
पाच पोळ्या, पाच पानी, वरी दही दूध लोणी,
नैवेद्य ताटीचा, तुला करिते अर्पणा।।
साडी चोळी जरी काठी, पाच फळांची ओटी,
श्रीफळ मानाचे, देते सौभाग्य वाणा।।
मनोभावे सेवा केली, त्याची प्रचीती आली,
राहो कृपा-दृष्टी, अशी माझी प्रार्थना।।
-----------------------
उग्र तूझें रूप तेज हें किती ।
शशी-सुधासम असे तव कांती ॥
अष्टभुजा अष्ट आयुधें हातीं ।
करिसी रिपुसंहार भक्त वंदीति ॥ ध्रु० ॥
जय देवी जय देवी जय कुलस्वामिनी ।
आम्ही बहु अपराधी आलों तव चरणी ॥ १ ॥
पंचामृतीं तुज घालुनी स्नान ।
सर्व अलंकार सर्व भूषण ॥
नीलवर्ण वस्त्र करिसी परिधान ।
अंबे व्याघ्र तुजला आवडे वाहन ॥ जय देवी० ॥ २ ॥
नाकीं तुझ्या नथ पायीं पैंजण ।
जननई शक्ती आदिमाया तूं पूर्ण ॥
धूप दीप कर्पूर करूं आरतीला ।
पंचपक्वान्नांचा नैवेद्य तुला ॥ जय देवी० ॥ ३ ॥
संसारतापाचे भय आम्हां भारी ।
कृपा करूनियां सर्व निवारीं ॥
आमुचे मनोरथ पूर्ण तूं करीं ।
उमा तुझे दृढ चरण धरी ॥ जय देवी० ॥ ४ ॥
---------------------
नैवेद्य १) भक्ष्य: लाडु, पोळी वगैर २) भाज्य: गुळभात, खिचडी वगैर ३) लेह्य : पंचामृत, लोणचे, मिरची वगैर ४) चोष्य : चाखुन खाता येतील असे पदार्थ ५) पेय : दुध किंवा तत्सम द्रव पदार्थ असावे. तुळशीपत्र ठेवुनच नैवेद्य अर्पण करावा.
-----------------------
अधिक माहितीसाठी -
|| शिवाशिर्वाद || प्रकाशन आणि मंत्रोच्चार वर्ग, पुणे.
+919096453211