Blog Views

|| कनकधारा स्तोत्रं ||

|| कनकधारा स्तोत्रं ||

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् ।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गलदेवतायाः ॥ १ ॥

लक्ष्मीदेवीची आवाहन करताना आचार्य तिची स्तुती करत आहेत. हे देवी लक्ष्मी तू सर्व प्रकारचे वैभव तुझ्या भक्तांना प्रदान करतेस. तुझ्या कृपेने प्राप्त होणारे सगळे वैभव हे मंगल आणि त्यामुळे अक्षय्य सुद्धा आहे. अर्थात हे सर्व प्रकारचे अक्षय्य वैभव तुझ्या भक्ताला मिळण्यासाठी त्याला तुझ्या कृपाकटाक्षाची आवश्यकता असते. तुझा कृपाकटाक्ष किती मोहक असतो याचे वर्णन करताना आचार्य म्हणतात. नीलवर्णाच्या कळ्यांनी सुशोभित झालेल्या तमाल वृक्षावर भुंगे बसून त्याला पूर्ण व्यापून टाकतात. कृष्णकमल याचा उल्लेख राधा तमाल असा सुद्धा केला जातो. अशी कथा आहे कि या फुलांनी लगडलेल्या झाडाला पाहून राधेला तो श्रीकृष्णच असल्याचा भास झाला आणि तिने या झाडालाच मिठी मारली. हे झाड त्याच्या नीलवर्णी फुलांनी बहरलेले असताना श्रीकृष्णाच्या इतके सुंदर आणि आकर्षक भासते. हि फुले सुगंधी असतात त्यामुळे यांच्या सुगंधाने भुंगे लुब्ध होऊन याला येऊन बिलगतात. त्याच प्रमाणे तुझा कृपाकटाक्ष तुझ्या पती श्रीहरीवर जरी पडला तर त्याचे अंग त्यामुळे पुलकित होते, रोमांचित होते. श्रीहरी म्हणजे जणू फुलांनी लगडलेले कृष्णकमळ आणि त्याला बिलगलेले भुंगे म्हणजे तुझी कृपादृष्टी आहे. अर्थात नुसत्या कृपाकटाक्षातून तू त्याला पूर्ण व्यापून टाकतेस. हे लक्ष्मीमाते तुझ्या या भक्तावर सुद्धा तुझी ती प्रेमळ कृपादृष्टी टाकून माझे जीवनही पुलकित करून टाक. 

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि ।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः ॥ २ ॥

या श्लोकात सुद्धा आचार्य लक्ष्मी देवीच्या कृपादृष्टीचेच वर्णन करत आहेत. कृपादृष्टीची माला म्हणजे कृपा दृष्टीने पुन्हा पुन्हा अवलोकन करणे. लक्ष्मी देवी समुद्रमंथनातून निर्माण झाली आहे म्हणून तिचा उल्लेख सागरसंभवा असा केला जातो. आचार्य म्हणतात हे लक्ष्मीमाते ज्याप्रमाणे पूर्ण विकसित अश्या कमल पुष्पाच्या सहस्त्र दलातून निघणारा सुगंध भुंग्यांना मोहित करतो आणि ते त्या पुष्पातील मकरंद प्राशन करण्यासाठी वारंवार तिथे येतात. त्यांचे ते जाणे आणि येणे म्हणजे जणू एखाद्या मालेच्या प्रमाणे भासते. श्रीविष्णूंच्या मुखकमलाचे सौंदर्य पाहून लक्ष्मीदेवीची दृष्टी हि लज्जा आणि प्रेमाने मुग्ध झाली आहे. ती वारंवार त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आहे. ज्या प्रमाणे कमळाच्या फुलातील मकरंद कितीही प्राशन केला तरी भुंग्यांचे मन तृप्त होत नाही ते वारंवार अधिकाधिक मधाच्या मोहाने जा ये करतात त्याच प्रमाणे विष्णूपत्नी लक्ष्मीदेवीला आपल्या पतीच्या मुखकमलाचे सौंदर्य वारंवार पाहण्याचा मोह आवरत नाही आणि ती जणू एखाद्या माळेसारखे त्यांच्यावर सतत दृष्टी टाकत आहे. आचार्य लक्ष्मीदेवी ला आवाहन करतात कि तुझी हि प्रेमयुक्त कृपामयी दृष्टी माझ्यावर सुद्धा अशीच वारंवार पडत राहू दे जेणेकरून मी संसार तापातून मुक्त होऊ शकेन, मला चारही पुरुषार्थ साधतील आणि माझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल.     

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दं
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् ।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥ ३ ॥

भगवान श्रीविष्णू हे क्षीरसागरात शेषनागाची शय्या करून त्यावर निवास करतात. शेष नागाचा उल्लेख भुजंग म्हणून सुद्धा केला जातो. श्रीविष्णुंची अंगना म्हणजे त्यांची पत्नी ती महालक्ष्मी आहे. भुजंगशय म्हणजे श्रीविष्णू आहेत. कनीनिक म्हणजे दृष्टीमंडळ. पक्ष्म म्हणजे पापण्या. आकेकरस्थित म्हणजे अर्धोन्मीलित नेत्र.
क्षीरसागरात श्रीविष्णू शेषाच्या शय्येवर विराजमान आहेत. त्यांच्या चरणांच्या पाशी महालक्ष्मी देवी बसली आहे. श्रीविष्णूंचा डोळा लागला आहे. आनंदकंद भगवान श्रीविष्णूंच्या कडे अत्यंत प्रेमाने अनिमिष नेत्रांनी ( डोळ्यांची उघडझाप न करता ) महालक्ष्मी पाहाते आहे. अनिमिष नेत्र या संकल्पनेचा अर्थ इथे समजून घ्या. ज्या मानव/देव/गंधर्वाची कुंडलिनी पूर्ण जागृत होऊन होते त्यांचा तृतीय नेत्र उन्मीलित होतो. तृतीय नेत्र हे त्रिकालदर्शी होण्याचे द्योतक आहे. तृतीय नेत्र हा दृश्यमान नाही पण त्याचे अस्तित्व दर्शवणारी गोष्ट म्हणजे अनिमिष नेत्र. कोणत्याही सामान्य मानवाचे डोळे हे उघडझाप न करता असूच शकत नाहीत परंतु कुंडलिनी जागृत झाल्यावर नेत्र अनिमिष होतात. कुंडलिनी जागृती झाल्यावर सर्व कामनां लय पावतात. परंतु आपल्या पतीचे लावण्य पाहून लक्ष्मी लुब्ध झाली आणि तिच्या मनात श्रीहरींच्या विषयी कामभाव जागृत झाला. त्या कामभावनेने दग्ध झाल्याने तिचे अनिमिष नेत्र क्षणभरासाठी आकेकर अर्थात अर्धोन्मीलित झाले. श्रीविष्णूंच्या प्रेमासाठी आतुर झाले. हे श्रीहरीच्या सौंदर्याच्या परिपुर्णतेचे विवेचन आणि स्तुती आहे पतीच्या स्तुतीने पत्नी प्रसन्न होते म्हणून सुद्धा लक्ष्मीदेवीच्या कृपाप्राप्तीचे हे आवाहन आहे. बाल शंकर लक्ष्मीमातेला आवाहन करत आहे कि माते तुझी हि भगवान श्रीविष्णूंच्या ठिकाणी निश्चलपणे आसक्त झालेली प्रेमव्याकूळ दृष्टी मला ऐश्वर्यसंपन्न करू दे.
बाह्यन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या
हारावलीव हरिनीलमयी विभाति ।
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥ ४ ॥

महालक्ष्मीचे वास्तव्य कमल पुष्पात असते म्हणून तिचा उल्लेख कमलालयाया असा करतात. श्रीहरी विष्णू यांनी मधु या दैत्याचा वध केला असल्याने त्यांना मधुजित असे म्हटले जाते.  श्रीहरीच्या गळ्यातील माळेत कौस्तुभ मणी आहे. त्या कौस्तुभ मण्यांची हिरवी आभा श्रीहरींच्या दोन्ही बाहूंच्या मध्ये वक्षस्थळावर पसरली आहे. श्रीहरींच्या वक्षस्थळावर महालक्ष्मीची कटाक्षमाला स्थिर झाली आहे. महालक्ष्मीचे नेत्र नीलवर्णी आहेत त्यामुळे तिच्या दृष्टीमंडळातून पडणारी आभा सुद्धा नीलवर्णी आहे. त्यामुळे श्रीहरीच्या गळ्यातील मौक्तिक माला हरीनीलमयी दिसत आहे. मोत्याची माळ हि आरक्तवर्णी आहे पण ती कौस्तुभमणी आणि नीलवर्णी कटाक्षमालेच्या प्रभावाने हिरवी आणि निळी अशी भासते आहे. श्रीहरी जरी सर्व ऐश्वर्य आणि गुणांनी संपन्न असले तरी लक्ष्मीच्या या दृष्टीप्रभावाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या कटाक्षमालेच्या प्रभावाने श्रीहरींचे रूप अधिक साजिरे अधिक मोहक दिसते आहे त्यांच्या इच्छांची पूर्तता होते आहे, हे लक्ष्मीदेवी  त्याच कृपादृष्टीने माझे सुद्धा कल्याण कर हीच माझी प्रार्थना आहे.

कालाम्बुदाळीललितोरसि कैटभारेः
धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव ।
मातुस्समस्तजगतां महनीयमूर्तिः
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥ ५ ॥
महालक्ष्मीचा उल्लेख संपूर्ण विश्वाची माता असा केला जातो. श्रीविष्णू हे विश्वाचे पालनकर्ते देव आहेत आणि त्यांची पत्नी या नात्याने संपूर्ण विश्वाचे पालन पोषण महालक्ष्मी करते म्हणून तिचा उल्लेख विश्वाची माता असा करतात. महालक्ष्मी देवी हि भृगु ऋषींची कन्या आहे. तिची अत्यंत रमणीय आणि सर्वश्रेष्ठ असणारी मूर्ती माझे कल्याण करो. या लक्ष्मीची मूर्ती कशी आहे याचे फार सुंदर विवेचन शंकराने केले आहे. भगवान श्रीविष्णू यांनी कैटभ या दैत्याचा वध केला आहे त्यामुळे त्यांना कैटभारी असे सुद्धा संबोधले जाते. श्रीविष्णू श्यामवर्णी आहेत. त्यांचे वक्षस्थळ हे काळ्या मेघांच्या सामुदायाप्रमाणे सुंदर दिसते आहे. आणि त्या वक्षस्थळी महालक्ष्मी देवी स्थित आहेत. विष्णूंच्या वक्षस्थळी महालक्ष्मीची हि मूर्ती अत्यंत आकर्षक दिसते आहे. जणू मेघमंडळात एखादी तेजस्वी विद्युल्लता कडाडावी आणि तिच्या तेजःपुंज रूपाने ते संपूर्ण मेघमंडळ प्रकाशित व्हावे त्याच प्रमाणे श्रीहरींच्या वक्षस्थळावर महालक्ष्मी देवी तेजःपुंज रुपात भासते आहे. हि तेजःपुंज रूप लक्ष्मीदेवी माझ्यावर कृपा करू दे.
( तिरुपती येतील भगवान व्यंकटेश हे श्रीविष्णू यांचेच रूप आहे. त्यांच्या मूर्तीच्या वक्षस्थळावर महालक्ष्मी प्रतिमा अंकित आहे. त्या प्रतिमेला चंदनाचे लेपन केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करताना त्या चंदनावर लक्ष्मीची पूर्ण प्रतिमा अंकित होते. ती एक अत्यंत सुंदर आणि विलोभनीय प्रतिमा आहे. )
याच भावाचा एक श्लोक नारद विरचित महालक्ष्मी स्तवं मध्ये सुद्धा आहे.
कृष्ण वक्षस्थले कृष्णे कृष्णवर्ण प्रशोभिते
पूर्णचंद्र प्रभे देवी महालक्ष्मी नमोस्तुते || ४२ ||
अर्थात कृष्णवर्णी विष्णूच्या वक्षस्थली तू विराजमान असणारी कृष्णा आहेस. श्रीहरीचा कृष्णवर्ण तुझ्यामुळे खुलून दिसतो. कसा तर... तू पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रमाणे तेजस्वी आहेस, विद्युल्लतेप्रमाणे लकाकत आहेस आणि श्रीहरीच्या कृष्णवर्णी वक्षस्थळाची तू तुझ्या तेजमय रूपाने शोभा वाढवली आहेस. 
 
प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावात्
माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन ।
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः ॥ ६ ॥

मकरालय म्हणजे सागर. सागर हे सुसरी मगरींचे वास्तव्य स्थान आहे. ज्यावेळी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते त्यातून प्राप्त झालेले एक रत्न म्हणजे लक्ष्मीदेवी आहेत. म्हणून त्यांच्या उल्लेख सागरकन्या असा सुद्धा केला जातो. या सागरकन्या महालक्ष्मीची दृष्टी कशी आहे. तर मंद म्हणजे मृदू अथवा सौम्य, अलस म्हणजे सावकाशपणे अवलोकानाचे कार्य करणारी, मंथर म्हणजे किंचित वक्र किंवा गंभीर अशी कृपापूर्ण दृष्टी ती सुद्धा अर्धोन्मीलित रूपातील. शंकर महालक्ष्मीची आळवणी करतो आहे कि माते तुझी अशी कृपापूर्ण दृष्टी मला याच लोकी याच जन्मात लाभो. या अश्या कृपापूर्ण दृष्टीचा प्रभाव काय आहे ? तर या दृष्टीच्या प्रभावानेच सर्वमंगल स्वरूप असलेल्या श्रीहरींच्या ठिकाणी कामदेवाने प्रथमच स्थान प्राप्त करून घेतले. रुक्मिणीच्या उदरी कामदेव श्रीकृष्ण कृपेने प्रद्युम्नाच्या रूपाने अवतरला आहे.      

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षं
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम्
इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ७ ॥

इंदिरा म्हणजे लक्ष्मी . इंद या धातूचा अर्थ ऐश्वर्यसंपन्न असणे असा होतो. लक्ष्मीदेवी स्वतः ऐश्वर्यसंपन्न आहेच परंतु ती भक्तांना सुद्धा विपुल ऐश्वर्य देते म्हणून तिला इंदिरा हे नाव शोभून दिसते. लक्ष्मीचे नेत्र हे कमळाच्या कोशाप्रमाणे अत्यंत कोमल, स्निग्ध आणि आरक्तवर्ण आहेत. त्या नेत्रातून ती ईक्षणार्ध अर्थात अर्धोन्मीलित दृष्टीने क्षणभर मिस्कील पणे पाहते आहे. तिच्या या कृपायुक्त अर्धोन्मीलित दृष्टीचा महिमा असा थोर आहे कि संपूर्ण विश्वाला ज्या अमरेंद्र इंद्राच्या वैभवाचा आणि पदाचा हेवा वाटतो ते तिच्या एका विभ्रमाचे फलित आहे. लक्ष्मीदेवीची हि कृपादृष्टी संपूर्ण विश्वाच्या आनंदाला कारणीभूत आहे. लक्ष्मीदेवीच्या दृष्टीने साक्षात भगवान श्रीविष्णू सुद्धा अधिकाधिक आनंदित होतात. बाल शंकर श्रीलक्ष्मीदेवीला विनवणी करतो आहे माझ्याकडे सुद्धा अशीच क्षणभर अर्धोन्मीलित कृपादृष्टी टाक.
  

इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते ।
दृष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥ ८॥

बाल शंकर देवी महालक्ष्मीची आळवणी करतो आहे. तो म्हणतो हे लक्ष्मी माते जे सामान्यबुद्धीचे सर्व दृष्ट्या सामान्यजन आहेत असे अविशिष्टमति लोक सुद्धा तुझ्या दयार्द दृष्टीने सहजच त्रिविष्टपपदाला अर्थात स्वर्गीय सुखाला प्राप्त होतात. त्यांना अलौकिक सुखाचा लाभ होतो. ती तुझी कृपादृष्टी आमच्याकडे सुद्धा वळव. जिचे पुष्कर हेच विष्टर आहे अर्थात कमळाचे फुल हेच जिचे आसन आहे. जिचे दृष्टीपटल प्रहृष्टकमलोदरदिप्ति अर्थात कमळाच्या विकसित फुलाच्या आतील कोश जसा आर्द्र आहे, कोमल आहे , आणि आरक्त आहे. तशी तुझी दयार्द दृष्टी आमच्यावर पडू दे आणि त्यामुळे आम्हाला जे फळ इष्ट आहे जे फळ आम्हाला पुष्ट करू शकेल तेच फळ आम्हाला दे.
 

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधारां
अस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे ।
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥ ९॥

हे नारायण प्रणयिनी अर्थात नारायणावर अनन्य प्रेम करणारी त्यांची पत्नी लक्ष्मी देवी तुझे नेत्र म्हणजे जणू भक्तजनांवर कल्याणवृष्टी करणारे मेघच आहेत. भक्तजनांच्या साठी तुझ्या चित्ती असणारा दयार्द भाव हा जणू वाऱ्यासमान तरल आहे. तूला ज्याची दया येईल त्याच्याकडेच तो कृपादृष्टीरुपी मेघ वळेल. माते मी जन्मोजन्मी केलेल्या आणि संचित असलेल्या दुष्कर्मांच्या फलित रुपी उन्हाळ्याने अत्यंत पिडीत झालेलो आहे. या उन्हाळ्याला कायमचे दूर करून तुझा तो कृपादृष्टीपूर्ण मेघ या अकिंचन अर्थात दरिद्री, निर्धन आणि असहाय्य असलेल्या, त्याच प्रमाणे अत्यंत विषण्ण अर्थात खिन्न आणि दुक्खी असलेल्या “ विहंगम शिशु “ अर्थात चातक पक्षाच्या पिल्लाप्रमाणे जलवर्षावास आतुर झालेल्या मज बालकावर ‘द्रविण’ अर्थात सोने ,हिरे माणके रुपी जलधारांचा वर्षाव कर. माझी तुझ्या चरणी इतकीच प्रार्थना आहे.  

गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति ।
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥ १०॥

हा श्लोक आचार्यांच्या विचारातील अद्वैत प्रकट करते. हा श्लोक दुर्गासप्तशती मध्ये जे तिने धारण केलेले अष्टअवतार आहेत त्यांचा उल्लेख करतो.
संपूर्ण त्रैलोक्याचे गुरु असणारे भगवान विष्णू आणि त्यांच्या सान्निध्यात विराजमान असणारी तरुणी अर्थात कोमलांगी श्रीदेवी महालक्ष्मी तिला माझा नमस्कार असो.
समस्त वाकप्रपंचाची अधिष्ठात्री असल्याने तिचा उल्लेख प्राधानिक रहस्यात गीर्देवता अर्थात वाक्देवता सरस्वती असा केला आहे.
गरुडध्वज हे भगवान विष्णू यांचेच एक नाम आहे. त्यांची सुंदरपत्नी अर्थात श्रीमहालक्ष्मी देवी आहे.
शाकंभरी हे तिचेच रूप आहे जे तिने अनावृष्टीने ग्रासलेल्या पृथ्वीवरील जीवांच्या रक्षणासाठी धारण केले होते.
भगवान शंकरांनी आपल्या जटेमध्ये चंद्र धारण केला आहे म्हणून त्यांना शशीशेखर संबोधले जाते. त्यांची प्राणवल्लभा म्हणजे पार्वती देवी ते सुद्धा तुझेच रूप आहे. पार्वती अर्थात ललिता त्रिपुरसुंदरी देवी. ललिता देवीच्या नियंत्रणात उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन अवस्था आहेत. हे सुद्धा जिचे रूप आहे त्या महालक्ष्मीला माझा नमस्कार असो.
अर्थात महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती हे तिन्ही अवतार तुझेच ऐक्यरूप आहे अश्या महालक्ष्मीदेवीला माझा नमस्कार असो.
 

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै ।
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥ ११॥

श्रुती अर्थात वेद. हे वेदस्वरूपा भगवती तुला माझा नमस्कार असो. वेदविद्या हे सुद्धा तुझेच रूप आहे. सर्व मानवांना शुभ कर्मफळ प्रदान करणारी आदिमाया महालक्ष्मी तूच आहेस माझा तुला नमस्कार असो. तू रमणीय गुणांचा महासागर आहेस. तू रती म्हणजे निरतिशय आनंदस्वरूप आहेस, अत्यंत शुद्ध, निरपेक्ष आणि प्रेमस्वरूप आहेस. तुला माझा नमस्कार असो.
आई लक्ष्मी, शतपत्र अर्थात कमलपुष्प हेच तुझे निकेतन अर्थात निवासस्थान आहे. तू सर्व विश्वाला शक्तीरूपाने / चेतना रूपाने व्यापले आहेस. सर्व चर अचरांच्या ठायी तूच चेतनारूपाने व्यापून आहेस. तू पुरुषोत्तम अर्थात भगवान विष्णू यांची प्रियवल्लभा अर्थात प्रियपत्नी आहेस. तुला माझा नमस्कार असो.  या सर्व विश्वाची तूच तुष्टी आणि पुष्टी स्वरूपा आहेस तुला माझा नमस्कार असो.

नमोऽस्तु नालीकनिभाननायै
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥ १२॥

नालिक म्हणजे कमळ. कमळाचा देठ नळीसारखा पोकळ असतो म्हणून कमळाला नालिक म्हटले जाते. हे देवीमाते तुझे मुख हे कमळाच्या प्रमाणे कोमल आणि आरक्तवर्णी आहे. तुझे ऐश्वर्या अतुल्य आहे तू साक्षात रत्नाकर अर्थात सागराची कन्या आहेस ज्याच्या उदरात अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ रत्ने आहेत. सोम अर्थात चंद्र आणि अमृत हि तुझी भावंडे आहेत. ( हे दोन्ही क्षीरसागर मंथनातून प्राप्त झाले. लक्ष्मीदेवी सुद्धा क्षीरसागरातून प्रकट झाली आहे ) तू विश्वाचा पालनहार आणि त्या न्यायाने संपूर्ण विश्वाच्या संपत्तीचा स्वामी असणारा नारायण अर्थात भगवान विष्णू यांची पत्नी आहेस. हे लक्ष्मी देवी मी तुला भक्तिपूर्वक नमस्कार करतो आहे. माझे मनोरथ पूर्ण कर. 

नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै
नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै ।
नमोऽस्तु देवादिदयापरायै
नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै ॥ १३॥

हे आदिमाया लक्ष्मी देवी तू सुवर्णकमळाच्या पिठावर स्थित आहेस. तू समस्त भूमंडलाची अर्थात पृथ्वीची नायिका / स्वामिनी आहेस. ज्या ज्या वेळी राक्षस प्रबळ झाले आणि त्यांनी देवांवर हल्ला करून त्यांना पराभूत केले आणि सृष्टीचक्र धोक्यात आणले त्या त्या वेळी तू  देवांच्या दुरवस्थेची दया येऊन त्या राक्षसांचा संहार केला आहेस आणि समस्त देवांना त्यांच्या मूळ स्थानाची आणि अवस्थेची प्राप्ती करून दिली आहेस. शार्ङ्ग हे भगवान विष्णू यांचे एक आयुध आहे. हे आयुध धारण करणाऱ्या भगवान विष्णू यांची तू प्रियतमा पत्नी आहेस. हे महादेवी माझे तुला नमन असो. माझ्या सुद्धा क्लेशांचे तू हरण कर मी तुला शरण आलो आहे.

नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै
नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै ।
नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै
नमोऽस्तु दामोदरवल्लभायै ॥ १४॥

हे महालक्ष्मी देवी तू भृगु ऋषींची कन्या होऊन त्यांच्या चित्ताला शांतता प्रदान करतेस. तू विष्णूच्या हृदयी स्थित होऊन त्यांच्या चित्ताचे हरण करतेस. तू कमल पुष्पात निवास करतेस. तू विष्णूच्या श्रीकृष्णरुपात त्याची प्रियतमा होऊन रास रचतेस. तुझ्या या भिन्न रूपांची मी आराधना करतो आहे. तुझ्या कृपादृष्टीचा मी सुद्धा अभिलाषी आहे. माते माझे सुद्धा चित्त स्थिर कर आनंदी कर.

नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै
नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै ।
नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै
नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै ॥ १५॥

कमलेक्षण अर्थात ज्याचे नेत्र कमळाच्या पानाप्रमाणे रेखीव आणि सुंदर आहेत. भगवान श्रीविष्णू यांचेच हे एक नाम आहे. त्यांची पत्नी अर्थात लक्ष्मी देवी मी तुला नमस्कार करतो. तू प्रभूराम चंद्र जे विष्णूचा अवतार आहेत त्यांचे नाम हेच समस्त ऐश्वर्याचे स्वरूप आहे तू त्यांचीच जणू प्रतिकृती आहेस. तुझे नाम सुद्धा ऐश्वर्यदायक आहे. तू १४ भुवनांची / लोकांची स्वामिनी आहेस. त्या चौदा लोकांची नावे या प्रमाणे. सत्य, तप, जन, महर, स्वर, भूवर, भू, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल. या चौदा लोकांच्या पैकी आपण सातव्या लोकात अर्थात भूलोकात स्थित आहोत. आपल्या वर सहा ऊर्ध्वलोक आहेत त्यांना आपण सत्कर्मे करून प्राप्त करून घेऊ शकतो आणि अधो आठ लोक आहेत हे आपण पापकर्मे करून पतन होऊन प्राप्त करून घेत असतो. परंतु या चौदा लोकांची स्वामिनी आणि पूजनीय देवता महालक्ष्मी आहे मी तिच्या चरणी वंदन करतो. हे महालक्ष्मी देवी तू देवांना सुद्धा पूजनीय आहेस तू नंदाचा आत्मज अर्थात श्रीकृष्ण याची सुद्धा प्रियतमा आहेस मी तुला वंदन करतो.     

सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि ।
त्वद्वन्दनानि दुरितोद्धरणोद्यतानि
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥ १६॥

आई तुझ्या चरणी निरंतर वंदन करण्याची प्रवृत्ती माझ्या ठिकाणी असावी मला दुसरे काही नको आहे. तुझ्या वंदन भक्तीचाच मला छंद लागू दे हीच प्रार्थना आहे. तुझ्या चरणी वंदन केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभ होतो. त्याच्या सर्व इंद्रियांना आनंद प्राप्त होतो. हे कमलाक्षी मते तुझ्या चरणी केलेले वंदन हे भक्ताला साम्राज्य वैभवाचे सुद्धा दान देते. भक्तजनाच्या सर्व दुरितांचे हरण करण्याचे सामर्थ्य या वंदनात आहे. भक्तांच्या दुरीतांच्या पैकी सगळ्यात मोठे दुरित म्हणजे अज्ञान आहे. आई जे तुझ्या चरणी अनन्यभावाने लीन होतात त्यांच्या अंतःकरणात ज्ञानसुर्याचा उदय होतो. अखिल देव आणि महर्षी यांना पूज्य असणारी महालक्ष्मी अंबिका माता तिच्या चरणी मी भक्तिभावाने प्रणाम करतो आहे. ती माझे कल्याण करो. 

यत्कटाक्षसमुपासनाविधिः
सेवकस्य सकलार्थसंपदः ।
संतनोति वचनाङ्गमानसैः
त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे ॥ १७॥

आई जगत्जननी तुझ्या कृपाकटाक्षाचा लाभ व्हावा म्हणून तुझी विधिवत आणि उत्तम रीतीने केली जाणारी पूजा/ उपासना हि भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. सेवकाला अभिष्ट असणाऱ्या सगळ्या संपत्तीचा वैभवाचा लाभ करून देते. संतनोति अर्थात त्याच्या या वैभवाचा सतत विस्तारच होत जातो ते लोप पावत नाही. असा तुझ्या उपासनेचा महिमा आहे. आई महालक्ष्मी तू मुरारी म्हणजे भगवान श्रीहरी यांची हृदयेश्वरी आहेस. त्यांची प्राणवल्लभा आहेस. मी तुझी कायावाचामनेकरून भक्ती करत आहे. मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर.

सरसिजनिलये सरोजहस्ते
धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ १८॥

आई जगत्जननी, सरसिज म्हणजे कमळ हे तुझे वसतीस्थान आहे. सरोजहस्ता म्हणजे तू हातात कमळ धारण केलेले आहेस. कमळावर अधिष्ठित होऊन आणि ते हाती धारण करून तू तुझे हृदय हे कमळाच्या प्रमाणे कोमल आणि सरस आहे हेच जणू सूचित करते आहेस. तुझी वस्त्रे अत्यंत शुभ्र धवल आहेत. तू शुभ्र चंदनाची उटी लावली आहेस. शुभ्र फुलांच्या माळा तू गळ्यात धारण केल्या आहेस. तू स्वतः गौरवर्ण आहेस आणि या शुभ्र वस्त्रअलंकाराने तुझी शोभा अधिकच खुलून दिसते आहे. तू साक्षात भगवती, सर्वऐश्वर्याची स्वामिनी, विष्णू प्रिया आहेस. तू मनोज्ञा आहेस. अर्थात तू भक्तांच्या मनातील अभिलाषा जाणून घेतेस आणि तुझे पूर्ण स्वरूप भक्त केवळ मनानेच जाणून घेऊ शकतो त्याला व्यक्त करण्याचे सामर्थ्य नाही. मी तुला नमस्कार करतो. तू मला प्रसन्न हो.  

दिग् हस्तिभिः कनककुंभमुखावसृष्ट-
स्वर्वाहिनीविमलचारुजलप्लुताङ्गीम् ।
मातर्नमामि जगतां जननीमशेष-
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥ १९॥

चार हत्ती तुझ्या सभोवताली उभे आहेत. त्यांनी गंगा जल सुवर्णकुंभात भरून आणले आहे आणि ते त्या जलाने तुला अभिषेक करत आहेत. चारही बाजूनी त्यांनी सोंड उंचावून तुझ्या शरीरावर अमृतरुपी जलाची संतत धार धरलेली आहे. त्यामुळे तुझे सगळे अंग जलाने भिजले आहे. अर्थात बाह्यांग जलाने भिजले आहे आणि तुझे अंतरंग तू दयार्द्रचित्ता असल्याने भक्तांच्या साठी सतत सदार्द्र आहेच. अशेष लोकांचे म्हणजे चौदा लोकांचे स्वामी भगवान विष्णू आणि त्यांची गृहस्वामिनी तू आहेस. तू क्षीरसागराची कन्या आहेस. आई तुला मी नमस्कार करतो. या श्लोकात देवीचे पितृकुल, पतिकुल आणि तिचा स्वसिद्ध अलौकिक महिमा यामुळे ती भक्ताला मनोवांच्छित फळ देण्यास समर्थ आहे हे ध्वनित केले आहे.
 

कमले कमलाक्षवल्लभे त्वं
करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः ।
अवलोकय मामकिञ्चनानां
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥ २०॥

हे कमले देवी. अंतर्बाह्य कोमल असल्याने देवीचा उल्लेख कमला असा केला आहे. तू कमलाक्षवल्लभा अर्थात भगवान महाविष्णू यांची प्रियपत्नी आहेस. आई तुझ्या अंतरंगात करुणेचा महापूर येऊ दे. त्या पुराने तुझी दृष्टी तरंगीत होऊ दे. मी अत्यंत दीन आणि निष्कांचन लोकांचा प्रमुख आहे . अर्थात माझ्या इतका दीन अवस्थेला कोणीच पात्र झाला नसेल. मी तुझ्या दयेचे अकृत्रिम पात्र आहे. तुझ्या दयेचा वर्षाव माझ्यावर होऊ दे. मी तुला भक्तीभावाने वारंवार नमस्कार करतो आहे. 

देवि प्रसीद जगदीश्वरि लोकमातः
कल्याणगात्रि कमलेक्षणजीवनाथे ।
दारिद्र्यभीतिहृदयं शरणागतं माम्
आलोकय प्रतिदिनं सदयैरपाङ्गैः ॥ २१॥

हे महालक्ष्मी देवी माझे हृदय दारिद्र्यामुळे, असहाय्य अवस्थाप्राप्त झाल्याने भीतीने ग्रासले आहे. मी तुझ्या चरणी अनन्यभावे शरण आलो आहे. हे देवी जगदीश्वराची पत्नी मला तुझा कृपा प्रसाद दे. हे कमलेक्षण विष्णुपत्नी माझे अंतर्बाह्य कल्याण कर, शुभ कर. तुझ्या नेत्र कटाक्षातून मला नित्य तुझ्या कृपेचा, प्रेमाचा लाभ होऊ दे.

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमीभिरन्वहं
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् ।
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥ २२॥

हा फलश्रुतीचा श्लोक आहे. या स्त्रोत्रातील श्लोकांनी जो कोणी नित्य त्रिभुवनमाता वेदस्वरूप महालक्ष्मीची स्तुती करतील ते खरोखर धन्य होतील. ते सर्व गुणांनी श्रेष्ठ होतील. गुरुतर अर्थात अत्यंत श्रेष्ठ असे भाग्य म्हणजे ऐश्वर्या त्यांना लाभेल.  

|| इति श्रीमच्छङ्कराचार्यकृत
श्री कनकधारास्तोत्रं संपूर्णम् ॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs