समास पहिला मूर्खलक्षण
श्रीराम ॥ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टी भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥
अर्थ १) एक दांत व तीन डोळे आहेत अश्या ॐकाररुप गजाननाला मी नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की, आपल्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे.
तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरीं वसे कृपावंते । स्फूर्तिरुपें ॥ २ ॥
२) ब्रह्मदेवाची कन्या व वेदांची माता अश्या शारदेला नमन करुन तीने स्फूर्तिरुपाने माझ्या अंतरी विराजमान होण्याची माझ्यावर कृपा करावी.वंदून सद्गुरुचरण । करुन रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण बोलिजेल ॥ ३ ॥
३) आता माझ्या सद्गुरुंच्या चरणांना वंदन करुन माझे स्वामी रघुनातहांचेही स्मरण करतो व मूर्खांची लक्षणें सांगतो. त्यांचा (सूज्ञाने) त्याग करावा.येक मूर्ख येक पढत मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोती सादर विवेक । केला पाहिंजे ॥ ४ ॥
४) मूर्खांचे दोन प्रकार आहेत. एक मूर्ख व दुसरा पढत मूर्ख त्यांची लक्षणें ऐकून श्रोत्यांना कौतुक वाटेल. त्यांचा (लक्षणांचा त्यागार्थ) विचार करावा.पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरुपण ।
सावध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥
५) पढत मूर्खाची लक्षणे पुढिल्या अध्यायी (दहाव्या समासांत) सांगितली आहेत. शहाण्या श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत.आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परी कांहीयेक तत्पर । होऊन ऐका ॥ ६ ॥
६) आता मूर्ख लक्षणें जी पुष्कळ आहेत त्यापैकी काहीं सांगतो. ती तत्परतेने ऐकावीत.जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान त्यांचीं लक्षणें ॥ ७ ॥
७) आत्मज्ञान नसलेले व म्हणून अज्ञानी आणि प्रपंचांतच अडकलेले त्यांची लक्षणें सांगतो.जन्मला जयांचें उदरीं । तयांसी जो विरोध करी ।
सखी मानिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८ ॥
८) आपल्या आई-वडिलांस न मानणारा, त्यांचे न ऐकणारा व केवळ पत्नी हीच सखी असे मानणारा तो एक मूर्ख आहे.सांडून सर्वहि गोत । स्त्रीआधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९ ॥
९) आपल्या नातेवाईकांना दूर ठेवून बायकोजवळच अंतरीचे बोलणारा असा बाईलबुद्ध्या तो एक मूर्ख आहे.परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्र्वशुरगृहीं वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १० ॥
१०) परस्त्रीवर प्रेम करणारा, सासुरवाडीस राहणारा व एखाद्या मुलीशी कुलाशीलाचा विचार न करता लग्न करणारा असा तो एक मूर्ख असतो.समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थेंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११ ॥
११) ज्येष्ठ व श्रेष्ठ लोकांशी अहंकाराने ते व आपण बरोबरीचेच आहोत असे मानून अधिकार नसता सत्ता गाजवितो. तो एक मूर्ख असतो.आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२ ॥
१२) आपली आपणच स्तुती करतो. स्वदेशी विपत्तींत असतो. वडिलांची कीर्ती ऐकवून खोटा मोठेपणाचा आव आणतो. तो एक मूर्ख असतो.अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३ ॥
१३) कारण नसतां हसतो. योग्य विचार, सल्ला ऐकत नाही. पुष्कळ लोकांशी वैर धरतो. तो एक मूर्ख असतो. आपुलीं धरुनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४ ॥
१४) आपल्या (नातेवाईकांशी) दुरावा व परकीयांशी घरोबा व दुसर्याचे उणे बोलतो. असा तो एक मूर्ख असतो.बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन । करी तो येक मूर्ख ॥ १५ ॥
१५) पुष्कळजण जागत असतांना हा मध्येच पसरतो (झोपतो). दुसर्या ठिकाणी फार जेवतो. तो एक मूर्ख असतो.मान अथवा अपमान । स्वयें करी परिछिन्न ।
सप्त वेसनी जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६ ॥
१६) मान किंवा अपमान आपला आपण उघड करतो. सात प्रकारच्या व्यसनाधीन मनाचा असतो. तो एक मूर्ख असतो. धरुन परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष । मानी तो येक मूर्ख ॥ १७ ॥
१७) आळशी, कामांत प्रयत्न करण्याची दिरंगाई करतो. काही न करण्यात आनंद मानणारा असतो. तो एक मूर्ख असतो.घरीं विवेक उमजे । आणी सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८ ॥
१८) घरांमध्ये शहाणपणाने विचाराने बोलणारा (शहाण्यांच्या) सभेंत मात्र बुजणारा व तोंडून शब्द फुटत नाही असा असतो. तो एक मूर्ख असतो. आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९ ॥
१९) आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाराशी जवळीक करतो. कोणी काहीं हिताचे सांगू लागला तर कंटाळा करतो. तो एक मूर्ख असतो.नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसीं जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २० ॥
२०) जे ऐकत नाहीत त्यांना शिकवायला जातो. मोठ्या माणसांपुढे शहाणपणा मिरवतो. चांगल्याला भानगडींत अडकवतो. तो एक मूर्ख असतो. येकायेकीं येकसरा । जाला विषंई निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा । वर्ते तो येक मूर्ख ॥ २१ ॥
२१) विषयवासना भोगापायीं मर्यादा सोडून निलाजरा होतो आणि उद्दामपणे वागतो. तो एक मूर्ख असतो.औषध ने घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ॥
२२) व्याधी, व्यथेने पिडित असूनही औषध घेत नाही. पथ्य पाळीत नाही. वाट्यास जे आले ते स्वीकारत नाही. तो एक मूर्ख असतो. संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३ ॥
२३) सोबत कोणाची नसता विदेशी जातो. ओळख-पाळख नसतां मैत्री करतो. महापुरांत उडी मारतो. तो एक मूर्ख असतो. आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४ ॥
२४) जेथे लोक मान देतात तेथे वारंवार जातो. स्वतःचा मान व योग्य गोष्टीचा अभिमान धरत नाही. तो एक मूर्ख असतो.सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ जो दुश्र्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५ ॥
२५) आपला नोकर श्रीमंत झाला तर त्याचा गुलाम होतो. ज्याचे चित्त नेहमी अस्थिर असते. तो एक मूर्ख असतो.विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६ ॥
२६) एखाद्याचा काहीं अपराध नसतांना सारासार विचार न करता त्यास शिक्षा करतो. थोड्या त्यागासाठी (खर्चासाठी) कंजूषपणा करतो. तो एक मूर्ख असतो.देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७ ॥
२७) देवाची वा वडिलधार्यांची तमा बाळगत नाही. बळहीन, शक्तिहीन, ज्ञानहीन असूनही तोंडाळपणा करतो. वाटेल तसे बरळत असतो. तो एक मूर्ख असतो.घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८ ॥
२८) घरांतील माणसांवर दांत-ओठ काढतो, बाहेरच्याशीं मात्र बापुडवाणेपणाने वागतो. असा अज्ञानी व वेडा एक मूर्ख असतो.नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९ ॥
२९) नीच, हलक्या लोकांशी संगत करतो. दुसर्याच्या बायकोशी रत होतो. रस्त्याने खातखात जातो. तो एक मूर्ख असतो.स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३० ॥
३०) आपण कोणावरही उपकार करत नाही. दुसर्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतो. काम कमी करतो पण अफाट बोलतो. तो एक मूर्ख असतो.तपीळ खादाड आळसी । कुश्र्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१ ॥
३१) तापट, खादाड, आळशी, वाईट वर्तुणुकीचा, कपटी मनाचा आणि धैर्यहीन असा तो एक मूर्ख असतो.विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२ ॥
३२) विद्या, ज्ञान, धन, पैसा, पुरुषार्थ, सामर्थ्य नसूनही अभिमान बाळगतो, तो एक मूर्ख असतो.लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३ ॥
३३) खोटा, दुराचारी, लबाड, उद्धट, वाईट कामे करणारा, वाईट बुद्धीचा व बेशरम असून फार झोपा काढतो, तो एक मूर्ख असतो. उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४ ॥
३४) जो उंच जागी जाऊन कपडे घालतो. उकीरड्यावर परसाकडे बसतो. बहुतेक नेहमी नग्न किंवा कमी कपडे घालतो. तो एक मूर्ख असतो.दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५ ॥
३५) ज्याचे दांत, डोळे, नाक, हात-पाय व कपडे नेहमी ज्याचे मळलेले असतात. तो एक मूर्ख असतो. वैधृति आणी वितिपात । नानाकुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६ ॥
३६) वैधृति, व्यतिपात अशा वाईट मुहूर्तांवर प्रवास करतो. अपशकून करुन दुसर्याचा घात करतो. तो एक मूर्ख असतो.क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७ ॥
३७) फार राग, अपमान सहन न होऊन स्वतःचा आत्मघात करतो. ज्याला स्थिर बुद्धी नसते, तो एक मूर्ख असतो.जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८ ॥
३८) जिवलग लोकांना अति दुःख देतो. त्यांना सुखाचा शब्दही देत नाही. नीचांशी मात्र दबून वागतो, तो एक मूर्ख असतो.आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भर्वसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९ ॥
३९) आपल्या स्वतःच्या सुखांत व ते राखण्यांत तत्पर, प्रयत्नशील असतो. कोणी आश्रयास आल्यास त्याला अव्हेरतो-दूर लोटतो. तो एक मूर्ख असतो.पुत्र कलत्र आणि दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्र्वरा । तो येक मूर्ख ॥ ४० ॥
४०) मुलगा, कुटुंब व बायको येवढ्यांनाच ओळखतो व देवासही विसरुन जातो, तो एक मूर्ख असतो. जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावावें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१ ॥
४१) " जसे करावे तसे मिळते ", हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्ख असतो.पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्र्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२ ॥
४२) स्रियांची विषयवासना पुरुषांपेक्षा आठपट असते, अशा अनेक स्त्रियांशी लग्न करतो. तो एक मूर्ख असतो. दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३ ॥
४३) दुर्जनाने सांगितल्याप्रमाणे मर्यादा सोडून वागतो व दिवसा डोळे झाकून म्हणजे ज्ञान असूनही अज्ञानी माणसासारखा (दुर्जनांच्या सांगण्यावरुन) वागतो, तो एक मूर्ख असतो. देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४ ॥
४४) देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांचेशी विश्र्वासघाताने वागणारा, एक मूर्ख असतो.परपीडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५ ॥
४५) दुसर्यास त्रास होत असेल तर याला आनंद व दुसर्यास सुख होत असेल तर याला दुःख होते, हरवलेल्या गोष्टींचे दुःख करतो. तो एक मूर्ख असतो.आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६ ॥
४६) कोणाचाही आदर न ठेवता बोलतो. कोणीही विचारल्याशिवाय साक्ष देतो. वाईट गोष्टी जवळ बाळगतो. तो एक मूर्ख असतो. तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७ ॥
४७) जो अनुमानावीना बोलतो, सरळ मार्गाने चालत नाही, वाईट कामे करणारांशी मैत्री करतो. तो एक मूर्ख असतो.पत्य राखों नेणे कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८ ॥
४८) स्वतःची पत न राखू शकणारा, नेहमी थट्टामसकरींत दंग, कोणी हसला तर हातघाईवर येऊन चिडतो, तो एक मूर्ख असतो.होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९ ॥
४९) अवघड पैज मारतो. कारणाशिवाय बडबड करतो. हवे असेल तेव्हां मात्र बोलत नाही. तो एक मूर्ख असतो. वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विस्वासे । तो येक मूर्ख ॥ ५० ॥
५०) चांगले वस्त्र व उत्तम विद्या नसताही उच्चासनावर जाऊन बसतो. नातेवाईकांवर विश्र्वास ठेवतो. तो एक मूर्ख असतो.तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेची मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१ ॥
५१) चोराला आपली सर्व माहीती देतो. व दिसलेली वस्तू मागतो. रागामुळें स्वतःचे नुकसान करुन घेतो, तो एक मूर्ख असतो.हीन जनासीं बराबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२ ॥
५२) हलक्या लोकांशी बरोबरीने वागतो, त्यांच्याशी वादंग घालतो. डाव्या हाताने पाणी पितो, तो एक मूर्ख असतो.समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३ ॥
५३) श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, स्वतःला प्राप्त न होऊ शकणार्या वस्तूसाठी हेवा करतो. स्वतःच्या घरांत चोरी करतो, तो एक मूर्ख असतो. सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४ ॥
५४) परमेश्र्वराला सोडून माणसाचा भरंवसा धरतो, कांहीही सार्थक न करता आयुष्य फुकट घालवितो, तो एक मूर्ख असतो.संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५ ॥
५५) संसारसागरांत भोगत असलेल्या दुःखासाठी देवास शिव्या देतो. मित्रांचे दोष चारचौघांत उघड करतो, तो एक मूर्ख असतो.अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विश्र्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६ ॥
५६) थोड्याही चुकीसाठी माफ न करता शिक्षा करुन, चुकणारास धारेवर धरतो, स्वतःमात्र विश्र्वासघात करतो, तो एक मूर्ख असतो.समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७ ॥
५७) ज्ञानी श्रेष्ठ लोकांच्या मनांतून उतरतो, सभेमध्ये नकोसा होतो, चंचळ मनाचा असतो, तो एक मूर्ख असतो. बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८ ॥
५८) जुने विश्र्वासु सेवक सोडून नवीन सेवक ठेवतो, ज्याच्या सभेला सावरणाराच (अध्यक्ष) कोणी नसतो, तो एक मूर्ख असतो.अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीती न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९ ॥
५९) भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवतो, धर्म, नीति, न्यायाने वागत नाही, बरोबर राहणार्या लोकांना तोडतो, तो एक मूर्ख असतो.घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचें उचिष्ट अंगीकारीं । तो येक मूर्ख ॥ ६० ॥
६०) घरी सुंदर स्त्री असूनही जो बाहेरख्यालीपणा करतो, पुष्कळ लोकांचे उष्टे खातो, तो एक मूर्ख असतो.आपुलें अर्थ दुसर्यापासीं । आणी दुसर्याचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१ ॥
६१) आपला पैसा दुसर्यापाशी ठेवून दुसर्याच्या पैशाची इच्छा धरणारा, हलक्या लोकांशी पैशाचे व्यवहार करतो, तो एक मूर्ख असतो.अतिताचा अंत पाहे । कुश्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२ ॥
६२) आलेल्या पाहुण्यास मदत करत नाही, वाईट वस्तीच्या गावांत राहतो, नेहमी चिंताग्रस्त असतो, तो एक मूर्ख असतो.दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३ ॥
६३) दोघेजण काहीं बोलत असता न बोलाविता तेथे जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोके खाजवितो, तो एक मूर्ख असतो.उदकांमधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४ ॥
६४) जलाशयांत चूळ टाकतो, पायाने पाय खाजवितो, नीच लोकांकडे नोकरी करतो, तो एक मूर्ख असतो.स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५ ॥
६५) बायको व मुलाशी बरोबरीने वागतो, भुताच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रें पाळतो, तो एक मूर्ख असतो.परस्त्रीसी कळह करी । सुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६ ॥
६६) जो परस्त्रीशी भांडण करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खांच्या संगतींत राहतो, तो एक मूर्ख असतो.कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्तां खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७ ॥
६७) कोणाचे भांडण पहात उभा राहतो, ते न सोडविता गंमत बघत उभा राहतो, खरे असेल ते सोडून खोटें सहन करतो, तो एक मूर्ख असतो.लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८ ॥
६८) पैसा, संपत्ती आल्यावर ओळख दाखवत नाही, देवब्राह्मणांवर सत्ता गाजवितो, तो एक मूर्ख असतो.आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढिलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९ ॥
६९) आपले काम असेल तोवर नम्रतेने वागतो, दुसर्यांचे (त्याचेकडे असलेले) काम मात्र करीत नाही. तो एक मूर्ख असतो.अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७० ॥
७०) वाचन करीत असतांना कांही भाग सोडून देतो किंवा स्वतःची वाक्यें मधे घालतो, पुस्तकांची निगा राखत नाही, तो एक मूर्ख असतो.आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१ ॥
७१) आपण कधी वाचत नाही व दुसर्यासही वाचावयास देत नाही, पुस्तके नुसती बांधुन ठेवतो, तो एक मूर्ख असतो.ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चित्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥
७२) अशी ही मूर्खलक्षणें आहेत. ती ऐकून माणसे हुशार होतात. शहाणे लोक ती लक्ष देऊन नेहमी ऐकतात. (व त्यांचा त्याग करतात.)लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३ ॥
७३) अशी ही मूर्खलक्षणें पुष्कळ आहेत. त्यांतील कांही माझ्या बुद्धीस सुचली ती लोकांनी त्यागावी म्हणून येथे सांगितली. त्याबद्दल लोकांनी क्षमा करावी.उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासीं आघवीं । निरोपिलीं ॥ ७४ ॥
७४) आपण उत्तम लक्षणे घ्यावी, (त्यांचा अंगीकार करावा) व मूर्ख लक्षणे त्यागावीत. पुढील समसांत उत्तम लक्षणें सांगितली आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥