Blog Views

मनाचे श्लोक

मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥२॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढें वैखरी राम आधीं वदावा ।
सदाचार हा थोर सोडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा नये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सारवीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नानाविकारी ।
नको रे मना सर्वथा अंगिकारूं ।
नको रे मना मत्सरू दंभभारू ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवीं धरावें ।
मना बोलणें नीच सोशीत जावें ।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें ।
परी अंतरीं सज्जना नीववावें ॥८॥

नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें ।
अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचे ।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें ।
न होतां मनासारिखें दुःख मोठें ॥९॥

सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी ।
दुःखाची स्वयें सांडि जीवीं करावी ।
देहेदुःख हें सूख मानीत जावें ।
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावेंं ॥१०॥

जनीं सर्वसूखीं असा कोण आहे ।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें ।
तयासारिखें भोगणें प्राप्त जालें ॥११॥

मना मानसीं दुःख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेकें देहेबुध्दि सोडूनि ्द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय जालें ।
अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें ।
म्हणोनी कुडी वासना सांडिं वेगीं ।
बळें लागला काळ हा पाठिलागीं ॥१३॥

जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला ।
परी सेवटीं काळमूखीं निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेंचि गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥१५॥

मरे येक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढें जात आहे ।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥१६॥

मनीं मानव व्यर्थ चिंता वहातें ।
अकस्मात होणार होऊनि जातें ।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें ।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें ॥१८॥

मना सर्वथा सत्य सोडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ।
मना सत्य तें सत्य वाचे वदावें ।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥

बहू हिंपुटी होइजे मायपोटीं ।
नको रे मना यातना तेचि मोठी ।
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥२०॥

मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडिं रे द्रव्यदारा ।
मना यातना थोर हे गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं राघवासी ॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें ।
रघूनायका दृढ चित्तीं धरावें ।
महाराज तो स्वामि वायूसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥

न बोलें मना राघवेंवीण कांहीं ।
जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं ।
घडीनें घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो ॥२३॥

रघुनायकावीण वायां सिणावें ।
जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें ।
सदा सर्वदा नाम वाचें वसों दे ।
अहंता मनीं पापिणी ते नसों दे ॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा ।
सुखाची घडी लोटतां सूख आहे ।
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला ।
परी शेवटीं काळ घेऊनि गेला ।
करीं रे मना भक्ति या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥२६॥

भवाच्या भयें काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडीं ।
रघुनायकासारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी ।
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥

पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ।
पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२९॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे ।
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥

महासंकटीं सोडिलें देव जेणें ।
प्रतापें बळें आगळा सर्वगूणें ।
जयातें स्मरे शैलजा शूळपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ।
जया वर्णितां सीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥

वसे मेरु मांदार हे सृष्टिलीळा ।
शशी सूर्य तारांगणें मेघमाळा ।
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥

उपेक्षा कदा रामरूपीं असेना ।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना ।
शिरीं भार वाहेन बोले पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३४॥

असे हो जया अंतरीं भाव जैसा ।
वसे हो तया अंतरीं देव तैसा ।
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ।
सुखानंद आनंद कैवल्य दानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटीं स्वामि तैसा ।
हरीभक्तिचा घाव गाजेे निशाणीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥

मना प्रार्थना तूजला येक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहें ।
अवज्ञा कदा हो येदर्थीं न कीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३८॥

जया वर्णिती वेदशास्त्रेंपुराणें ।
जयाचेनि योगें समाधान बाणे ।
तयालागि हें सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथें ।
अती आदरें ठेविजे लक्ष्य तेथें ।
विवेकें कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४०॥

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ।
सिणावें परी नातुडे हीत कांहीं ।
विचारें बरें अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४१॥

बहूतांपरी हेंचि आतां धरावें ।
रघूनायका आपुलेसें करावें ।
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४२॥

मना सज्जना येक जीवीं धरावें ।
जनीं आपुलें हीत तुवां करावें ।
रघुनायकावीण बोलों नको हो ।
सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥

मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी ।
कथा आदरें राघवाची करावी ।
नसे राम तें धाम सोडूनी द्यावें ।
सुखालागिं आरण्य सेवीत जावें ॥४४॥

जयाचेनि संगें समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ।
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीनें मति राम जोडी ॥४५॥

मना जे घडी राघवेंवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवां हानि केली ।
रघुनायकावीण तो सीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष्य लाऊनि पाहे ॥४६॥

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहें ।
जनीं जाणता भक्त होऊनि राहें ।
गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य वाचा ।
स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥

सदा बोलण्यासारिखें चालताहे ।
अनेकीं सदा येक देवासि पाहे ।
सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥

नसे अंतरीं कामकारी विकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ।
निवाला मनीं लेश नाहीं तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धि ।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ।
सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥

क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादें ।
न लिंपे कदा दंभवादें विवादें ।
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ।
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ।
ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळु ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळु ।
तया अंतरीं क्रोध संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥

जगीं होइजे धन्य या रामनामें ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्यनेमें ।
उदासीनता तत्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

नको वासना वीषईं वृत्तिरूपें ।
यदर्थीं जडे कामना पूर्वपापें ।
सदा राम निःकाम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोही नसावा ॥५८॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ।
मनीं कामना राम नाहीं जयाला ।
अती आदरें प्रीति नाहीं तयाला ॥५९॥

मना राम कल्पतरू कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं ।
जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आतां ॥६०॥

उभा कल्पवृक्षातळीं दुःख वाहे ।
तया अंतरीं सर्वदा तेंचि आहे ।
जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा ।
पुढें मागुतां शोक जीवीं धरावा ॥६१॥

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळें अंतरीं शोकसंताप ठेला ।
सुखानंद आनंद भेदें बुडाला ।
मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला ॥६२॥

घरीं कामधेनू पुढें ताक मागे ।
हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।
करीं सार चिंतामणी काचखंडें ।
तया मागतां देत आहे उदंडें ॥६३॥

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्तीं वसेना ।
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषई सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥

नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणें ।
धरीं रे मना आदरें प्रीति रामीं ।
नको वासना हेमधामीं विरामीं ॥६५॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहें ।
जनीं वीष खातां पुढें सूख कैचें ।
करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।
करी संकटीं सेवकाचा कुडावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६७॥

बळें आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ।
पुढें मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६८॥

सुखानंदकारी निवारी भयातें ।
जनीं भक्तिभावें भजावें तयातें ।
विवेकें त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६९॥

सदा रामनामें वदा पूर्णकामें ।
कदा बाधिजेना पदा नित्यनेमें ।
मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७०॥

जयाचेनि नामें महादोष जाती ।
जयाचेनि नामें गती पाविजेती ।
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७१॥

न वेंचे कदा ग्रंथिंचे अर्थ कांहीं ।
मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं ।
महाघोर संसार शत्रू जिणावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७२॥

देहेदंडणेचें महादुःख आहे ।
महां दुःख तें नाम घेतां न राहे ।
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥

बहुतांपरी संकटें साधनाचीं ।
व्रतें दान उद्यापनें तीं धनाचीं ।
दिनाचा दयाळू मनीं आठवावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥

समस्तामध्यें सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ।
म्हणे दास विश्वास नामीं धरावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७६॥

करी काम निःकाम या राघवाचें ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गातां ।
हरीकीर्तनीं वृत्तििवश्वास होतां ॥७७॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं ।
तया पामरा बाधिजे सर्व कांहीं ।
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची ।
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥७९॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें ।
तरा दुस्तरा त्या परा सागरातें ।
सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।
करा नीकरा त्या खरा मत्सरातें ॥८०॥

मना मत्सरें नाम सांडूं नको हो ।
अती आदरें हा निजध्यास राहो ।
समस्तांमध्यें नाम हें सार आहे ।
दुजी तूळणा तूळीतांही न साहे ॥८१॥

बहू नाम या रामनामीं तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हें कळेना ।
विषा औषध घेतलें पार्वतीशें ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥८२॥

जेणें जाळीला काम तो राम ध्यातो ।
उमेसीं अती आदरें गूण गातो ।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।
परी अंतरीं नामविश्वास तेथें ॥८३॥

विठोने शिरीं वाहिला देवराणा ।
तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा ।
निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी ।
जिवां सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ।
स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥८५॥

मुखीं राम विश्राम तेंथेंचि आहे ।
सदानंद आनंद सेऊनि राहे ।
तयावीण तो सीण संदेहकारी ।
निजधाम हें नाम शोकापहारी ॥८६॥

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ।
गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ।
हरीभक्त तो शक्त कामास मारी ।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥

बहू चांगलें नाम या राघवाचें ।
अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें ।
करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें ।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें ॥८८॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावें ।
अती आदरें गद्य घोषें म्हणावें ।
हरीचिंतनें अन्न जेवीत जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥८९॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ।
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं ।
बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥९०॥

नको वीट मानूं रघूनायकाचा ।
अती आदरें बोलिजे राम वाचा ।
न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा ।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥

अती आदरें सर्व ही नामघोषें ।
गिरीकंदरीं जाइजे दूर दोषें ।
हरी तिष्ठतु तोषला नामघोषें ।
विशेषें हरा मानसीं रामपीसें ॥९२॥

जगीं पाहतां देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्वतां सार चिंता ।
तयाचें मुखीं नाम घेता फुकाचें ।
मना सांग पां रे तुझें काय वेंचे ॥९३॥

तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां ।
निवाला हरू तो मुखें नाम घेतां ।
जपे आदरें पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि हें नाम आतां ॥९४॥

अजामेळ पापी वदें पुत्रकामें ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें ।
शुकाकारणें कुंटणी राम वाणी ।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥९५॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी नित्यकाळीं ।
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ॥९६॥

मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची ।
अहंतागुणें यातना ते फुकाची ।
पुढें अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारिले मानवीदेहधारी ।
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥

जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी ।
तयेमाजिं जातां गती पूर्वजांसी ।
मुखें रामनामावळी नित्यकाळीं ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥

येथासांग रे कर्म तेंहि घडेना ।
घडे कर्म तें पुण्य गांठीं पडेना ।
दया पाहतां सर्वभूतीं असेना ।
फुकाचें मुखीं नाम तेंही वसेना ॥१००॥

जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची ।
म्हणोनी अति आदरें नाम घ्यावें ।
मुखें बोलतां दोष जाती स्वभावें ॥१०१॥

अती लीनता सर्वभावें स्वभावें ।
जना सज्जनांलागि संतोषवावें ।
देहे कारणीं सर्व लावीत जावें ।
सगूणी अती आदरेंसीं भजावें ॥१०२॥

हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी ।
देहेबुद्धि निरूपणीं वीसरावी ।
परद्रव्य आणीक कांता परावी ।
येदर्थीं मना सांडि जीवीं करावी ॥१०३॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें ।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ।
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥

विवेकें क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ।
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा ।
मना कल्पना सोडिं संसारतापा ॥१०५॥

बरी स्नानसंध्या करीं येकनिष्ठा ।
विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा ।
दया सर्व भूतीं जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला ॥१०६॥

मना कोपआरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होई रे मोक्षभागीं विभागी ॥१०७॥

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं सूखसंवाद सूखें करावा ।
जनीं तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥

तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें ।
विवेकें अहंभाव यातें जिणावें ।
अहंतागुणें वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥

हिताकारणें बोलणें सत्य आहे ।
हिताकारणें सर्व शोधूनि पाहे ।
हिताकारणें बंड पाखांड वारीं ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥

जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला ।
परी वाद वेवाद तैसाचि ठेला ।
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥

जनीं हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ।
तयांहूनि व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहें ॥११३॥

फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे ।
दिसेंदीस अभ्यंतरीं गर्व सांचे ।
क्रियेवीण वाचाळतां व्यर्थ आहे ।
विचारें मना तूंचि शोधून पाहे ॥११४॥

तुटे वाद संवाद तेथें करावा ।
विवेकें अहंभाव हा पालटावा ।
जनीं बोलण्यासारिखें आचरावें ।
क्रियापालटें भक्तिपंथेचि जावें ॥११५॥

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ।
दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥

धुरुं लेकरूं बापुडें दैन्यवाणें ।
कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ।
चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥

गजेंद्रू महासंकटिं वाट पाहे ।
तयाकारणें श्रीहरी धांवताहे ।
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला ।
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥

विधीकारणें जाहला मत्स्य वेगीं ।
धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागीं ।
जना रक्षणाकारणें नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥

महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणें सिंह जाला ।
न ये ज्वाळ वीशाळ संन्नीध कोण्ही ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥

कृपा भाकितां जाहला वज्रपाणी ।
तयाकारणें वामनु चक्रपाणी ।
द्विजाकारणें भार्गव चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२२॥

अहिल्ये सतीलागि आरण्यपंथें ।
कुडावा पुढें देव बंदीं तयांतें ।
बळें सोडितां घाव घाली निशाणीं ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२३॥

तये द्रौपदीकारणें लागवेगें ।
त्वरें धांवतू सर्व सांडूनि मागें ।
कळीलागि जाला असें बोद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥

अनाथां दिनां कारणें जन्मताहे ।
कलंकी पुढें देव होणार आहे ।
जया वर्णितां सीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥

जनाकारणें देव लीळावतारी ।
बहूतांपरीं आदरें वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥१२६॥

जगीं धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ।
देहेभावना रामबोधें उडाली ।
मनोवासना रामरूपीं बुडाली ॥१२७॥

मना वासना वासुदेवीं वसों दे ।
मना कामना कामसंगीं नसों दे ।
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥१२८॥

गतीकारणें संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ।
रतीनायकाचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होऊनि राहे ॥१२९॥

मना अल्प संकल्प तो ही नसावा ।
सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा ।
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत येकांतकाळीं भजावा ॥१३०॥

भजाया जनीं पाहतां राम येकू ।
करीं बाण येकू मुखीं शब्द येकू ।
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥१३१॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ।
बरें शोधल्यावीण बोलों नको हो ।
जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी ।
जेणें मानसीं स्थापिलें निश्चयाशीं ।
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥१३३॥

नसे गर्व आंगीं सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ।
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा ॥१३४॥

धरीं रे मना संगती सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ।
बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे ।
महा क्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत तें संत आनंत पाहें ।
जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना ।
भय मानसीं सर्वथा ही असेना ॥१३६॥

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ।
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३७॥

भ्रमें नाडळे वित्त तें गुप्त जालें ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ।
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३८॥

पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे ।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ।
अभावें कदा पुण्य गांठी पडेना ।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३९॥

जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं ।
गुणें गोविलें जाहलें दुःख देहीं ।
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना ।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१४०॥

म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।
गुरुअंजनेवीण तें आकळेना ।
जुनें ठेवणें मीपणें तें कळेना ॥१४१॥

कळेना कळेना कळेना ढळेना ।
ढळे नाढळे संशयो ही ढळेना ।
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळें आकळेना मिळेना मिळेना ॥१४२॥

अविद्यागुणें मानवा ऊमजेना ।
भ्रमें चूकलें हीत ते आकळेना ।
परीक्षेविणें बांधलें द्ृढ नाणें ।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणे ॥१४३॥

जगीं पाहतां साच तें काय आहे ।
अती आदरें सत्य शोधूनि पाहें ।
पुढें पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥१४४॥

सदा वीषयो चिंतितां जीव जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मासि आला ।
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ।
जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें ॥१४५॥

दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारलें काळ मोडी ।
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४६॥

फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचलें मीपणें तें कळेना ।
तया एकरूपासि दुजें न साहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४७॥

निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां सीणली वेदवाचा ।
विवेकें तदाकार होऊनि राहें ।
मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४८॥

जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे ।
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे ।
जगीं पाहतां पाहणें जात आहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४९॥

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं ।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१५०॥

खरें शोधितां शोधितां शोधताहे ।
मना बोधितां बोधितां बोधताहे ।
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागें ॥१५१॥

बहूतांपरी कूसरी तत्वझाडा ।
परी अंतरीं पाहिजे तो निवाडा ।
मना सार साचार तें वेगळें रे ।
समस्तांमधें येक तें आगळें रे ॥१५२॥

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्वज्ञानें ।
समाधान कांहीं नव्हे तानमानें ।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान तें सज्जनाचेनि योगें ॥१५३॥

महावाक्य तत्वादिकें पंचीकर्णें ।
खुणें पाविजे संतसंगें विवर्णें ।
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥१५४॥

दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें ।
बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ।
करीं घेऊं जातां कदा आडळेना ।
जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना ॥१५५॥

म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहें ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ।
जनीं मीपणें पाहतां पाहवेना ।
तया लक्षितां वेगळें राहवेना ॥१५६॥

बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ।
मती भांडती शास्त्रबोधें विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥१५७॥

श्रुति न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें ।
स्मृति वेद वेदान्तवाक्यें विचित्रें ।
स्वयें शेष मौनावला स्थीर राहे ।
मना सर्व जाणीव सांडून पाहे ॥१५८॥

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्ति कैंची ।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना ॥१५९॥

नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नाना विकारी ।
नको रे मना सीकऊं पुढिलांसि ।
अहंभाव जो राहिला तूजपासीं ॥१६०॥

अहंतागुणें सर्व ही दुःख होतें ।
मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ।
सुखी राहतां सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें ॥१६१॥

अहंतागुणें नीति सांडि विवेकी ।
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं ।
परी अंतरीं सर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते ॥१६२॥

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला ।
देहातीत तें हीत सांडीत गेला ।
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६३॥

मनें कल्पिला वीषयो सोडवावा ।
मनें देव निर्गूण तो वोळखावा ।
मनें कल्पितां कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥

देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरीं लोभ निश्चिंत ठेला ।
हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥

अहंकार विस्तारला या देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ।
बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥

बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणें दास संदेह तो वीसरावा ।
घडीनें घडी सार्थकाची करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६७॥

करी वृत्ति जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुद्धितें वाढवीते ।
परी सज्जना कवि बाधूं शके ते ॥१६८॥

नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकार विस्तार हा नीरसावा ।
गुणेंवीण निर्गूण तो आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवो नाठवावा ॥१६९॥

देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी ।
विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी ।
तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें ।
म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें ॥१७०॥

असे सार साचार तें चोरलेंसें ।
इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे ।
निराभास निर्गूण तें आकळेना ।
अहंतागुणें कल्पितांही कळेना ॥१७१॥

स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ।
मुळीं कल्पना दोरुपें तेचि जाली ।
विवेकें तरी स्वस्वरुपीं मिळाली ॥१७२॥

स्वरुपीं उदेला अहंकार राहो ।
तेणें सर्व आछ्यादिलें व्योम पाहों ।
दिशा पाहतां ते निशा वाढताहे ।
विवेकें विचारें विवंचूनि पाहे ॥१७३॥

जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना ।
भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना ।
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो ॥१७४॥

विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं ।
परी लीहितो कोण त्याचे कपाळीं ।
हरु जाळितो लोक संहारकाळीं ।
परी सेवटीं शंकरा कोण जाळी ॥१७५॥

जगीं द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ।
जगीं देव धुंडाळितां आढळेना ।
जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना ॥१७६॥

तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ।
कळेना कळेना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना जनीं मीपणासी ॥१७७॥

जया मानला देव तो पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोणी न पाहे ।
जगीं पाहतां देव कोट्यानकोटी ।
जया मानिली भक्ति जे तेचि मोठी ॥१७८॥

तिन्हीं लोक जेथूनि निर्माण जाले ।
त्या देवरायासि कोणी न बोले ।
जगीं थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥

गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ।
मनीं कामना चेटकें धातमाता ।
जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥१८०॥

नव्हे चेटकू चाळकू द्रव्यभोंदू ।
नव्हे निंदकू मत्सरु भक्तिमंदू ।
नव्हे उन्मतू व्यसनी संगबाधू ।
जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधु ॥१८१॥

नव्हे वाऊगी चाहुटी काम पोटीं ।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ।
मुखें बोलिल्यासारिखें चालताहे ।
मना सद्गुरु तोचि शोधूनि पाहे ॥१८२॥

जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेन योगें समाधान बाणे ॥१८३॥

नव्हे तेचि जालें नसें तेंचि आलें ।
कळों लागलें सज्जनाचेनि बोलें ।
अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें ।
मना संत आनंत शोधीत जावें ॥१८४॥

लपावें अती आदरें रामरूपीं ।
भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपीं ।
कदा तो जनीं पाहतांही दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना ॥१८५॥

सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य शोधून पाहे ।
अखंडीत भेटी रघूराजयोगु ।
मना सांडि रे मीपणाचा वियोगु ॥१८६॥

भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे ।
परी सर्वही स्वस्वरूपीं न साहे ।
मना भासलें सर्व कांहीं पहावें ।
परी संग सोडूनि सूखीं रहावें ॥१८७॥

देहेभान हें ज्ञानशस्त्रें खुडावें ।
विदेहीपणें भक्तिमार्गेंचि जावें ।
विरक्तीबळें निंद्य सर्वै त्यजावें ।
परी संग सोडूनि सूखें रहावें ॥१८८॥

मही निर्मिली देव तो वोळखावा ।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ।
तया निर्गुणालागि गूणी पहावें ।
परी संग सोडूनि सूखें रहावें ॥१८९॥

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।
परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता ।
तया निर्विकल्पासि कल्पीत जावें ।
परी संग सोडूनि सूखें रहावें ॥१९०॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना ।
परब्रह्म तें मीपणें आकळेना ।
मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥१९१॥

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें ।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें ।
तया खूण ते हीण द्ृष्टांत पाहे ।
तेथें संग निःसंग दोनी न साहे ॥१९२॥

नव्हे जाणता नेणता देवराणा ।
न ये वर्णितां वेदशास्त्रा पुराणा ।
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।
श्रुति नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥

वसे हृदईं देव तो कोण कैसा ।
पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा ।
देहे टाकितां देव कोठे रहातो ।
परी मागुता ठाव कोठें पहातो ॥१९४॥

वसे हृदईं देव तो जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ।
सदा संचला येत ना जात कांहीं ।
तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥१९५॥

नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं ।
रिता ठाव या राघवेंवीण नाहीं ।
तया पाहतां पाहतां तेंचि जालें ।
तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें ॥१९६॥

नभासारिखें रूप या राघवाचें ।
मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें ।
तया पाहतां देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥१९७॥

नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न साहे ।
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें ।
तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें ॥१९८॥

अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे ।
तेथें तर्कसंपर्क तोही न साहे ।
अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें ।
दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें ॥१९९॥

कळे आकळे रूप तें ज्ञान होतां ।
तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था ।
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे ।
तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥

कदा वोळखीमाजि दूजें दिसेना ।
मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना ।
बहूतां दिसां आपुली भेटि जाली ।
विदेहीपणें सर्व काया निवाली ॥२०१॥

मना गूज रे तूज हें प्राप्त जालें ।
परी अंतरीं पाहिजे यत्न केले ।
सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥२०२॥

मना सर्वही संग सोडूनि ध्यावा ।
अती आदरें सज्जनाचा धरावा ।
जयाचेनि संगें महादुःख भंगे ।
जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥

मना संग हा सर्व संगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ।
मना संग हा साधकां सीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥

मनाची शतें ऐकतां दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगीं ।

म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ॥२०५॥

समर्थ रामदास-

दीप ज्योती मंत्र (शुभं करोति कल्याणमारोग्यं)

दीप ज्योती मंत्र  शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥ दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो...

Popular Blogs