*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*.. श्री.व्यंकटेश विजय ..*
___________🔺__________
अध्याय ४..
पुढे सुतांनी शौनकादिक ऋषींना सांगण्यास प्रारंभ केला. तीच हकीकत शतानंद गौतम राजाजनकास सांगू लागले. शतानंद म्हणाले- राजा या कलियुगामध्ये त्या पर्वताला वेंकटगिरी हे नाव का पडले ती कथा आता तुला मी सांगतो. या पृथ्वीवर कालहस्ती या नावाचे एक सुंदर नगर आहे. तेथे वेदशास्त्रात पारंगत हरिभक्त आणि सदाचारसंपन्न, स्नानसंध्या पंचमहायज्ञ नित्य करणारा, दया, क्षमा, शांती अशा सर्व गुणांनी संपन्न सत्य भाषण करणारा पुरंदर नावाचा एक ब्राह्मण तेथे रहात होता. त्याला संतती नसल्याकारणाने तो अनेक प्रकारचे उपाय करीत असे. पुष्कळ नवससायास केल्यावर त्या ब्राह्मणाला एक मुलगा झाला. ब्राह्मणाला व सर्वांना परमेश्वर संतुष्ट झाला म्हणून आनंद झाला. ब्राह्मणाने बालकाचे जातकर्म केले. चंद्राच्या कलेप्रमाणे तो मुलगा वाढू लागला. पुरंदर ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव माधव असे ठेवले. आठ वर्षे पूर्ण होताच त्यांची मुंज करून वेदशास्त्र इतर सर्व विद्या व पुराणे त्याला शिकविली. त्याचे विद्येतील प्राविण्य पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होत असत. आपल्या मुलाची ही योग्यता पाहून आपल्या कुलात सत्पुत्र जन्माला आला म्हणून पुरंदराला अतिशय आनंद झाला. पुढे वयात आल्यावर पांडिव राजाची अत्यंत सुंदर आणि सर्व गुणसंपन्न अशा चंद्ररेखा नावाच्या मुलीबरोबर त्याचे लग्न केले. सुनेला घेऊन पुरंदर ब्राह्मण आपल्या गावी येऊन आनंदाने राहू लागला.
पुढे एकेदिवशी माधवाने अतिशय कामातुर होऊन आपल्या पत्नीशी दिवसा रममाण होण्याची इच्छा व्यक्त केली. चतुर पत्नीने अनेकवार ही गोष्ट अयोग्य आहे, हे शास्त्रविहित नाही, लोक हसतील आपण विद्वान आचारसंपन्न ब्राह्मण आहात असे अनेक प्रकारे सांगून पाहिले; परंतु आपली इच्छा पूर्ण न झाल्यास आपले प्राण जातील असे माधव म्हणताच चंद्ररेखा म्हणाली, नाथ आपण कुशसमिधा आणावयास वनात चलावे; मीही पाणी आणावयास आपणाबरोबर येते. असे म्हणताच ठीक आहे म्हणून तो ब्राह्मण उठला व ती दोघेही गंगेच्या काठी असलेल्या एका अरण्यात आली. तो तेथे येताच एक आश्चर्य घडले ! तेथे एका झाडाखाली त्याला एक सुंदर स्त्री दिसली. तिला पाहून तो आश्चर्यचकित झाला, व तो म्हणाला, ही जर आपणांस मिळेल तर आपण फार सुखी होऊ. असा विचार करून तो आपल्या पत्नीस म्हणाला, तू घरी जा. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. तुझे मन मी पाहिले. तू आता येथे राहू नकोस. पतीच्या आज्ञेप्रमाणे ती चंद्ररेखा घरी परत आली.
नंतर तो त्या स्त्रीपाशी जाऊन तिला म्हणाला. सुंदरी तू कोण, कोठे राहतेस वगैरे सांग तिनेही त्याला असाच प्रश्न केला. माधवाने आपली सर्व हकीकत सांगितली, व तुझ्या रूपावर मी मोहित झालो आहे. माझी इच्छा पूर्ण कर असे तो तिला म्हणाला. तेव्हा ती त्याला म्हणाली. महाराज मी जातीने चांडाळीण आहे. माझे नाव कुंथळा आपल्यासारख्यांना माझा स्पर्शही न व्हावा. असे असता आपण हे काय बोलत आहा.
ब्राह्मण म्हणाला- तुझ्या सौंदर्यापुढे हे सर्व फुकट आहे. जगात अशा पुष्कळ गोष्टी आहेत; व लोकही फळाकडे दृष्टि देऊनच वागत असतात. आता तू माझे मनोरथ पूर्ण कर. असे म्हणताच ती चांडाळ स्त्री म्हणते. आपण आपल्या मातापित्यांचा कुलधर्म कुलाचारांचा व प्रिय पत्नीचा त्याग करून ही अयोग्य गोष्ट करण्यास तयार झाला तर लोक आपल्याला हसतील. आपणास जातीबाहेर टाकतील. हे तिचे बोलणे ऐकूनही माधव आपला अविचार बदलण्यास तयार नाही असे पाहाताच ती स्त्री विचार करू लागली की, या ब्राह्मणास वेड लागले आहे. असे म्हणत ती आपल्या घरी जाण्यास उठली असता वीज तळपल्याचा भस झाला. ब्राह्मण झटदिशी पुढे गेला व त्याने पकडून तिच्याशी तो पूर्ण रममाण झाला. ती चांडाळीण नंतर त्यास म्हणाली. आता माझ्या घरी आपण चलावे, मद्यमांसाचे सेवन करीत मजबरोबर आपण राहावे. त्याप्रमाणे तिच्या घरी जाऊन तो ब्राह्मण राहू लागला. सर्व आचारविचार, ब्राह्मण्य वगैरे त्याचे नष्ट झाले. तो आपले सर्व कुलगोत विसरून गेला. केवढा हा स्त्रीसंगाचा परिणाम !
पुढे माधवाच्या आईबापांना ही हकीकत समजली. पत्नीसह सर्वांना फार दुःख झाले. पूर्व कर्मास दोष देऊन सर्व लोक व्यवहार करीत राहिले. बारा वर्षे याप्रमाणे तो ब्राह्मण अनाचार करीत पिशाचाप्रमाणे राहिला.
नंतर अकस्मात ती चांडाळीणच मरण पावली. माधवास फार दुःख झाले. आता त्याला आपल्या सर्व गोष्टींची आठवण झाली. आपण कोण होतो, काय झाले याचा विचार करीत तो फार उदासीन झाला. प्रिय पत्नी, आईबाप यांचा मी त्याग केला ही माझ्याकडून फार मोठी चूक घडली; पण आता उपाय काय? आता आपण देशान्तर करावे. आपणास महानरक यातना भोगाव्या लागणार. यातून कोणीही सोडविणार नाही. कोणास शरण जावे. कोण आपला उद्धार करील असा विचार तो रात्रंदिवस करू लागला. याप्रकारे अरण्यात हिंडत असता यात्रेस जाणारे लोक माधवास भेटले. त्यांना माधवाने विचारले असता शेषाद्रीच्या यात्रेस जात आहोत असे त्यांनी सांगताच माधव त्यांचेबरोबर जाऊ लागला. माधवाने आपली घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगताच ते त्यास धीर देऊन म्हणाले तू त्या पर्वताचे दर्शन घे. तू सर्व पातकापासून मुक्त होशील.
हे ऐकताच त्यांचेबरोबर तो ब्राह्मण जाऊ लागला. त्या यात्रेकरू लोकांनी भोजन करून बाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न खात तो आपला उदरनिर्वाह करीत असे. त्यांची सेवा तो करू लागला.
असा जात असता पुष्कळ राजेमहाराजे, साधुसंत मंडळी तेथे जमा झाली होती. ते सुंदर स्वामीतीर्थ पाहून यालाही समाधान वाटले. तेथे क्षौरश्राद्धादि विधि इतरांनी केल्याप्रमाणे माधवाने ही केले. पुढे ती मंडळी पर्वत चढू लागली. त्यांचेबरोबर हाही जाऊ लागला असता पर्वतस्पर्शाने याचे पातक नष्ट होऊ लागले. तेथे त्यास एकदा ओकारी झाली, त्याबरोबर त्याचे सर्व पातक नाहीसे झाले. ब्राह्मण पवित्र व तेजस्वी झाला. सर्व लोकांनाही फार आश्चर्य वाटले. पर्वताच्या दर्शनास आलेल्या ब्रह्मदेवाने माधवास म्हटले, माधवा तू आता सर्व पातकांतून मुक्त झाला आहेस. स्वामी तीर्थापाशी स्नान कर. वराहाचे दर्शन घे व तेथेच देहसमर्पण कर. पुढील जन्मी तू आकाशराजा म्हणून जन्म घेशील व तुझ्या पोटी लक्ष्मीमाता जन्म घेईल. भगवान तिला वरतील व ते तुझे जामात होतील. असा पर्वतदर्शनाचा महिमा सांगून ब्रह्मदेव गुप्त झाले. वें म्हणजे महादोष. *ते केवळ स्पर्शाने नाहीसे झाले म्हणून या पर्वताला कलियुगात वेंकटगिरी असे नाव पडले आहे.*
〰〰〰〰〰〰📕
सं- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच ग्रुप
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩