वटसावित्रीकथा
श्रीगणेशाय नमः ॥
अथ स्कंदपुराणांतर्गत वटसावित्रीकथा लिख्यते ॥
सनत्कुमारमुनी शिवाप्रत प्रश्न करितात , की , हे देवा ! कुलीन स्त्रियांना महाभाग्य देणारे , पुत्रपौत्रादिक वाढविणारे असे व्रत कोणते ते मला सांगा ॥१॥
असा सनत्कुमाराचा प्रश्न ऐकून ईश्वर सांगतात , हे सनत्कुमारा ! मद्रदेशामध्ये शूर , ज्ञानसंपन्न व परम धार्मिक आणि वेदवेदांगामध्ये पारंगत असा अश्वपति या नावाचा एक राजा होऊन गेला ॥२॥
तो महाबाहु अश्वपति राजा सर्वेश्वर्यसंपन्न असून अपत्यरहित असल्यामुळे पत्नीसहवर्तमान तप करिता झाला ॥३॥
तो उदार असा राजा सावित्रीमंत्राचा जप करीत होत्साता सावित्रीप्रीत्यर्थ हवन करुन परमभक्तीने त्याने आराधना केली ॥४॥
त्यामुळे सावित्रीदेवी प्रसन्न होऊन त्या राजाला प्रत्यक्ष दर्शन देती झाली ॥५॥
समस्त व्याह्यती देवतांसहित जिचे स्वरुप युक्त आहे आणि अक्षसूत्र व कमंडलु धारण करणारी व सर्व जगतास वंद्य अशा सावित्रीप्रत अवलोकन करुन ॥६॥
राजाने हर्षयुक्त अंतःकरणाने भक्तिपुरःसर साष्टांग नमस्कार केला . त्याकाळी त्या राजाला अवलोकन करुन प्रसन्न होत्साती देवी बोलती झाली ॥७॥
सावित्री म्हणते , " हे राजेंद्रा तुला मी प्रसन्न झाले आहे . तरी हे सुव्रता ! तू इष्ट वर मागून घे . " सावित्रीने असे सांगितले असता सुप्रसन्न अशा त्या देवीला राजा बोलता झाला ॥८॥
राजा म्हणतो , " हे सावित्री देवी ! मला अपत्य नाही , यास्तव हे शोभने ! मी पुत्राची इच्छा करीत आहे . हे जगन्माये ! एक पुत्रावाचून अन्य वर मी मागत नाही ॥९॥
कारण पृथ्वीवर जे दुर्लभ ते सर्वही तुझ्या प्रसादाने माझ्या घरी आहे , " राजाचे असे भाषण ऐकून देवी म्हणाली , ॥१०॥
हे राजेंद्रा ! तुला पुत्र होणार नाही , परंतु एक कन्या होईल . ती दोन्ही कुळांचा ( भर्तृकुल व पितृकुल यांचा ) उद्धार करील ॥११॥
व हे राजश्रेष्ठा । ती कन्या माझ्या नावानेच विख्यात होईल . शिव म्हणतात , " हे मुनिश्रेष्ठा सनत्कुमारा , ती ब्रह्मदेवाची भार्या राजाशी असे भाषण करुन अंतर्धान पावली . त्यावेळी राजा संतुष्ट झाला . नंतर काही दिवसांनी राजाची पट्टराणी गर्भवती होऊन ॥१२॥ ॥१३॥
पूर्ण दिवस झाले असता प्रसूत झाली . तिला सावित्रीच्या प्रसादाने व सावित्रीमंत्राच्या जपाने जी कन्या झाली ॥१४॥
तिचे नाव वरदासावित्री असे ठेविले व कमळासारखे नेत्र असलेली ती कन्या देवगर्भासमान शोभती झाली ॥१५॥
तिची कांती सुवर्णासारखी असल्याने व सर्व पृथ्वीत ती रुपाने अप्रतिम असल्यामुळे कोणीही वर तिची याचना करीना ! तेव्हा राजास मोठी चिंता लागली ॥१६॥
वरांनी तिची याचना न करण्याचे कारण तिच्या रुपाने सर्व राजे चकित झाले होते . नंतर अश्वपती राजाने त्या तिला जवळ बोलावून सांगितले की ॥१७॥
हे कन्ये , तुझा विवाहकाळ प्राप्त झाला असून तुला कोणी मागणी घालीत नाही . याकरिता तुझ्या मनाला आवडेल तो गुणसंपन्न पती तू वर ॥१८॥
मात्र तो तुझ्या मनाला आनंद देणारा , कुलीन आणि शिलाने उत्तम असावा , असे सांगून राजाने वृद्ध अमात्य बरोबर देऊन ॥१९॥
वस्त्र अलंकारांसहित आणि धनरत्नांसह तिला वर पहाण्याकरिता पाठविली . नंतर राजा स्वस्थ राहिला ॥२०॥
तो भगवान नारदऋषी तेथे आले . त्या नारदमुनीची राजाने अर्द्यपाद्यादीकेकरुन पूजा केली ॥२१॥
आसनाचे ठायी पूजित असे नारद सुखाने बसले असता त्यांस तो राजा पुढीलप्रमाणे बोलता झाला ॥२२॥
राजा म्हणतो - " हे नारदमुने ! आज मला आपण आपल्या दर्शनाने पुनीत केल . " असे राजा बोलत आहे तोच ती कमलनयना सावित्री ॥२३॥
आश्रमापासून वृद्ध अमात्यांसह तेथे येऊन पोहोचली . तिने पित्याच्या चरणांना वंदन करुन नंतर नारदमुनीना वंदन केले ॥२४॥
त्याकाळी त्या संतुष्ट अशा राजकन्येप्रत अवलोकन करुन नारदानी राजास प्रश्न केला की , " हे महाबाहो राजा ! ही उपवर झालेली देवगर्भासारखी सुंदर कन्या अद्यापि वराला का देत नाहीस ? " असे नारदांनी विचारले असता राजा म्हणतो ॥२५॥ ॥२६॥
याच कार्याकरिता मी ही पाठविली होती , ती ही आत्ताच वर पसंत करुन आली आहे ॥२७॥
तरी हे मुनिसत्तमा , हिने कोण पती निवडला तुम्ही विचारा . असे राजाने सांगितले असता नारदांनी तिला प्रश्न केला . त्यावेळी ती सावित्री नारदाप्रत बोलती झाली ॥२८॥
नारदा , द्युमत्सेन राजाचे राज्य त्याचा वैरी जो रुक्मी त्याने हरण केले व तो दैववशात अंध होत्साता पत्नीसहित वनात राहात आहे . त्याचा पुत्र सत्यवान् ॥२९॥
नावाचा आश्रमामध्ये आहे . तो मी अंतःकरणाने वरिला आहे ॥३०॥
असे तिचे भाषण ऐकून नारद म्हणतात , " हे महाराजा ! तुझ्या कन्येने फार वाईट केले ; ते असे की , सत्य्वान् गुणांनी प्रसिद्ध पाहून त्याचा दोष न कळल्यामुळे त्याला भर्ता वरिला ॥३१॥
त्याचा पिता सत्य भाषण करितो व त्याची माताही सत्य भाषण करिते आणि स्वतः तोही सत्य बोलतो , त्यामुळे त्याला सत्यवान् असे म्हणतात ॥३२॥
तसेच त्या सत्यवंताला अश्व प्रिय असून तो बाळपणी मृत्तिकेच्या घोडयांनी क्रीडा करीत असे व अश्वांची चित्रेही काढितो . यास्तव त्याला चित्राश्व असेही म्हणतात ॥३३॥
आणि तो रुपगुणसंपन्न असून सर्व शास्त्रांमध्ये निपुण आहे . त्यासारखा या लोकीत कोणी मनुष्य नाही ॥३४॥
जसा सर्व रत्नांनी समुद्र पूर्ण आहे तद्वत् तो सर्व गुणांनी परिपूर्ण आहे ; परंतु याला त्या सर्व गुणांचे आवरण करणारा एक महान दोष आहे , तो असा की , एक वर्षाने तो क्षीणायु होत्साता देहत्याग करील ! ॥३५॥
असे नारदाचे वचन ऐकून अश्वपतिराजा कन्येला म्हणतो - हे शुभलोचने सावित्री । अद्यापि तुझा विवाहाच काळ आहे . तरी तू दुसरा पती वर ॥३६॥
तेव्हा सावित्री म्हणते " हे ताता । मी आता दुसरा भर्ता मनानेही करु इच्छीत नाही . जो मी एकवेळ मनाने भर्ता वरिला तोच माझा भर्ता होईल , दुसरा होणार नाही ॥३७॥
कारण कोणत्याही कार्याचा आधी मनात विचार करावा ; नंतर ते वाचेने बोलावे , मग ते शुभ असो किंवा अशुभ असो , बोलल्याप्रमाणे करावे ॥३८॥
तस्मात् अन्य पुरुषाप्रत मनानेही म्या कसे वरावे आणि असे आहे की , राजे व पंडितजन एकच वेळ भाषण करीत असतात ॥३९॥
तशीच कन्या एकवार दिली जाते , अशा तीन गोष्टी एकेकवारच होत असतात ; तस्मात् सत्यवंतावाचून अन्य पुरुषाप्रत पती मानण्यास माझी मति चलित होणार नाही ॥४०॥
आता तो गुणवान असो किंवा गुणहीन असो , मूर्ख असे किंवा पंडित असो , दीर्घायुषी अथवा अल्पायुषी असोः हे प्रभो ! तोच माझा भर्ता होय ॥४१॥
हे ताता ! आता जरी शचिपती इंद्र प्राप्त झाला तरी मी अन्य भर्ता वरणार नाही . असा माझा निश्चय जाणून कर्तव्य असेल ते करावे ॥४२॥
असे तिचे भाषण ऐकून त्याकाळी नारद म्हणाला , " हे राजेंद्रा ! या सावित्रीची मति सत्यवंताचे ठिकाणी अत्यंत स्थिर झाली आहे . यास्तव सत्यवंतासहवर्तमान हिचा विवाह करण्याविषयी तू त्वरा कर " ॥४३॥
शिव म्हणतात - हे सनत्कुमारा ! सावित्रीचा दृढ निश्चय नारदांनी जाणला . नंतर तो अश्वपती राजा सावित्रीसह वनास जाण्याकरिता निघाला ॥४४॥
त्याने आपल्याबरोबर द्र्व्य घेऊन व थोडे सैन्य व वृद्ध अमात्य यांसहवर्तमान द्युमत्सेनाच्या सान्निध येऊन पोहोचला ॥४५॥
इकडे नारदमुनी आकाशमार्गी अंतर्धान पावले व अश्वपतिराजा जाऊन द्युमत्सेनास भेटला ॥४६॥
तो द्युमत्सेन राजा वृद्ध व अंध होता आणि एका वृक्षाच्या मुळाचा आश्रय करुन बसला होता , त्याला सावित्री आणि अश्वपती राजा यांनी वंदन केले ॥४७॥
आपले नाव कथन करुन अश्वपती राजा उभा राहिला असता द्युमत्सेन राजा म्हणतो की , " हे राजन् ! आपले येणे कोणत्या कारणाने झाले ? " ॥४८॥
असे भाषण करुन अरण्यातील फुले , मुळे व अर्घ्य इत्यादिकांनी त्याचे पूजन केले . शंकर म्हणतात - हे मुनिसत्तमा सनत्कुमारा ! नंतर त्याने अश्वपतीराजास कुशलवर्तमान विचारिले ॥४९॥
त्यावेळी अश्वपती म्हणतो - " हे राजन् ! आज आपल्या दर्शनाने माझे कुशल अहे . माझ्या आगमनाचे कारण माझी सावित्री नामक कन्या तुमच्या पुत्राची इच्छा करीत आहे " ॥५०॥
त्याकरिता हे राजश्रेष्ठा , तुमचा पुत्र या सुंदरीला पती म्हणून प्राप्त होवो आणि मलाही हे योग्य वाटत आहे . यास्तव मला प्रिय असा हा तुमचा आमचा संबंध जडो ॥५१॥
द्युमत्सेन म्हणतो , हे राजेंद्रा ! मी तर वृद्ध आणि अंध असून राज्यभ्रष्ट झालेला , फळे , मुळे भक्षण करुन राहतो ; तसाच माझा पुत्रही वनातील फलादीकांवर उपजीविका करितो ॥५२॥
त्यासाठी तुझी कन्या जिला दुःख कसे ते ठाऊक नाही - अरण्यात दुःख कसे सहन करील ? यास्तव हा संबंध मला योग्य वाटत नाही ॥५३॥
त्यावर अश्वपती म्हणतो - हे राजश्रेष्ठा , हे सर्व जाणूनच हिने तुमच्या पुत्रास वरिले आहे , तस्मात् तुमच्या पुत्रसहवर्तमान वनवासही हिला स्वर्गतुल्य होईल यात संशय नाही , असे अश्वपती राजाने द्युमत्सेनराजर्षीला म्हणाला असता ॥५४॥ ॥५५॥
*क्रमश;.......पुढील भाग नंतर....*
〰〰〰〰〰〰📕
*सं- श्रीधर कुलकर्णी*