गुरुचरित्र अध्याय १०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीगुरुभ्यो नमः ॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण ।
कुरवपुरींचे महिमान । केवी जाहले म्हणतसे ॥ १
॥
म्हणसी श्रीपाद नाही गेले । आणिक सांगसी अवतार
झाले ।
विस्तार करोनियां सगळे । निरोपावे म्हणतसे ॥ २
॥
सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय
पुससी ।
अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्र्वव्यापक
परमात्मा ॥ ३ ॥
पुढें कार्याकारणासी । अवतार झाला परियेसीं ।
राहिला आपण गुप्तवेषीं । तया कुरवक्षेत्रांत ॥
४ ॥
पाहें पा भार्गवराम देखा । अद्यापि
स्थिर-जीविका ।
अवतार जाहला आपण अनेका । तयाचेनिपरी
निश्र्चयावें ॥ ५ ॥
सर्वां ठायीं वसे आपण । मूर्ति एक नारायण ।
त्रिमूर्तीचे तीन गुण । उत्पत्ति-स्थिति-लयासी
॥ ६ ॥
भक्तजन तारावयासी । अवतार होती ह्रषीकेशी ।
शाप दिधला दुर्वासऋषीं । कारण असे तयाचे ॥ ७ ॥
त्रयमूर्तीचा अवतार । त्याचा कवणा कळे पार ।
निधान तीर्थ कुरवपुर । वास तेथे गुरुमूर्ति ॥
८ ॥
जें जें चिंतिले भक्तजनीं । लाधती
श्रीगुरुदर्शनी ।
श्रीगुरु राहती जया स्थानीं । कामधेनु असे
जाणा ॥ ९ ॥
श्रीपादश्रीवल्लभस्थानमहिमा । वर्णावया मी
किमात्मा ।
अपार असे सांगतां तुम्हां । एखादा सांगेन
दृष्टांत ॥ १० ॥
तुज सांगावया । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण ।
सर्वथा न करी तो निर्वाण । पाहे वास भक्तांची
॥ ११ ॥
दृढ भक्ति असावी मनीं स्थिर । गंभीरपणे असावे
धीर ।
तोचि उतरे पैलपार । इह सौख्य परलोक ॥ १२ ॥
याचि कारणें दृष्टांत तुज । सांगेन ऐक वर्तले
सहज ।
काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया 'वल्लभेश' ॥ १३ ॥
सुशील द्विज आचारवंत । उदीममार्गे उदर भरीत ।
प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया
श्रीपादक्षेत्रासी ॥ १४ ॥
असतां पुढे वर्तमानीं । वाणिज्या निघाला तो
उदिमी ।
नवस केला अतिगहनीं । संतर्पावे ब्राह्माणांसी
॥ १५ ॥
उदीम आलिया फळासी । यात्रेसि येईन विशेषीं ।
सहस्र वर्ण-ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन
म्हणे ॥ १६ ॥
निश्र्चय करोनियां मानसीं । निघाला तो द्विज
उदीमासी ।
चरण ध्यातसे मानसीं । सदा श्रीपादश्रीवल्लभाचे
॥ १७ ॥
जे जे ठायीं जातां देखा । अनंत संतोष पावे
निका ।
शतगुणें जाहला लाभ अधिका । परमानंदे परतला ॥
१८ ॥
लय लावूनि श्रीपादचरणीं । यात्रेसि निघाला
तत्क्षणीं ।
करावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले
समागमे ॥ १९ ॥
द्रव्य घेऊनि द्विजवर । निघतां देखती तस्कर ।
कपटरुप होऊनि संगतीकर । तेही तस्कर निघाले ॥
२० ॥
दोनतीन दिवसवरी । तस्कर आले संगिकारी ।
एके दिवशी मार्गी रात्री । जात होते मार्गस्थ
॥ २१ ॥
तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जातो
कुरवपुरासी ।
श्रीपादश्रीवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम
असे ॥ २२ ॥
बोलत मार्गेसीं । तस्करीं मारिलें द्विजासी ।
शिर छेदूनि परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥ २३
॥
भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरीं ।
पावला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांगी ॥
२४ ॥
त्रिशूळ खड्ग येरे हातीं । उभा ठेला
तस्करांपुढतीं ।
वधिता झाला तस्करां त्वरिती । त्रिशूळेंकरुनि
तयेवेळीं ॥ २५ ॥
समस्त तस्करांसि मारितां । एक येऊनि वुनविता ।
कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधि आपण असें ॥ २६ ॥
नेणे याते वधितील म्हणोन । आपण आलो संगी होऊन
।
तूं सर्वोत्तमा जाणसी खूण । विश्र्वांचे
मनींची वासना ॥ २७ ॥
ऐकोनि तस्कराची विनंति । श्रीपाद त्यातें जवळी
बोलाविती ।
हाती देऊनियां विभूति । प्रोक्षी म्हणती
विप्रावरी ॥ २८ ॥
मान लावूनि तया वेळां । मंत्रोनि लाविती
विभूति गळां ।
सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा एकचित्तें ॥
२९ ॥
इतुके वर्तता परियेसीं । उदय जाहला दिनकरासी ।
श्रीपाद जाहले अदृश्येसी । राहिला तस्कर
विप्राजवळी ॥ ३० ॥
विप्र पुसे तस्करासी । म्हणे तूं कां माते
धरिलेसी ।
कवणे वधिले या मनुष्यांसी । म्हणोनि पुसे तया
वेळी ॥ ३१ ॥
तस्कर सांगे द्विजासी । जाहले अभिनव परियेसीं
।
आला होता एक तापसीं । वधिलें यांते त्रिशूळें
॥ ३२ ॥
मातें राखिले तुजनिमित्त । धरोनि बैसविले
अतिप्रीत ।
विभूति मंत्रोनि तूंते लावीत । सजीव केला तुझा
देह ॥ ३३ ॥
उभा होता आतां जवळी । अदृश्य जाहला तत्काळी ।
न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण राखिला ॥ ३४
॥
होईल ईश्र्वर त्रिपुरारि । भस्मांगी होता
जटाधारी ।
तूं भक्त होशील निर्धारी । म्हणोनि आला
ठाकोनियां ॥ ३५ ॥
ऐकोनि तस्कराचे वचन । विश्र्वासला तो ब्राह्मण
।
तस्करापाशील द्रव्य घेऊन । गेला यात्रे
कुरवपुरा ॥ ३६ ॥
नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्र चारी ।
अनंतभक्ती प्रीतिकरीं । पूजा करी
श्रीपादगुरुपादुकांची ॥ ३७ ॥
ऐसे अनेक भक्तजन । सेवा करिती श्रीपादस्थान ।
कुरवपुर प्रख्यात जाण । अपार महिमा परियेसा ॥
३८ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरीं तूं
मानसीं ।
श्रीपाद आहेति कुरवपुरासी । अदृश्य होऊनियां ॥
३९ ॥
पुढे अवतार असे होणे । म्हणोनि गुप्त, न दिसे कवणा ।
अनंतरुप नारायण । परिपूर्ण असे सर्वां ठायीं ॥
४० ॥
श्रीपादश्रीवल्लभमूर्ति । लौकिकी ऐक्य
परमार्थी ।
झाला अवतार पुढे ख्याती । श्रीनरसिंहसरस्वती ॥
४१ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ ४२ ॥ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे कुरवपुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम
दशमोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥