श्रीसूक्त
मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचा सर्वात निर्दोष आणि मूलगामी विचार समग्रपणे भारतीय संस्कृतीत केला आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ. हे जीवनव्यापी आहेत. धर्म व मोक्षाच्या मध्ये अर्थ व काम आहेत.
श्री म्हणजे लक्ष्मी. अनेक वैशिष्ट्यपूर्ण विशेषण आहेत. लक्ष्मीचे समाजकल्याणकारी व राष्ट्रकल्याणकारी रुप आहे. समाजजीवन समृद्ध, निकोप व वैभवशाली असावे व त्यायोगे राष्ट्राचा उत्कर्ष व्हावा ही वैदिक संस्कृतीची धारणा आहे म्हणूनच लक्ष्मीचे आगमन राजरस्त्याने वाजत अश्वदळ गजदळा सह व्हावे.
श्रीसूक्त श्लोक व विवेचनाच्या सह पाठवत आहे. आपणही आणखी काही त्यात हवे असल्यास सांगावे.
उद्या पासून रोज सकाळी एक श्लोक व विवरण.
सार्थ श्री सूक्तम
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् l
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ll१ll
हे अग्निदेव ! सुवर्णासारख्या वर्णाची कांतिमान, हरिणीसारखी चपळ, सुवर्ण व चांदीचे अलंकार धारण केलेली, चंद्रासारखी शीतल अल्हाददायक, सुवर्णस्वरुप लक्ष्मी माझ्याकडे घेऊन ये. तिला माझ्यासाठी आवाहन कर.
श्रीसूक्ताच्या दोन देवता आहेत. एक अग्नी व दुसरी लक्ष्मी. मानव व लक्ष्मी मधील अग्नी हे माध्यम. जातवेदो. ज्या पासून वेद निर्माण झाले आहेत. अग्नी तेजस्वी, शुद्ध, पवित्र प्रतीक आहे. ह्यात अशुद्ध जाळून टाकण्याचे सामर्थ्य आहे. अग्नी जीवनासाठी आवश्यक आहे. योग्य बंधनामुळे तो समाजोपयोगी बनतो. मात्र तो सतत प्रज्वलित राहण्यासाठी त्यात आहुती द्याव्या लागतात. समाजकल्याणार्थ वैयक्तिक सुखाचे, स्वार्थाचे हवन करावे लागते.
अशा गुणांनी युक्त असलेल्या अग्नींने लक्ष्मीला माझ्या कडे आणावे. जी लक्ष्मी माझ्याकडे अग्नी आणेल ती शुद्ध, पवित्र, कल्याणकारी, आनंददायी अशीच असेल. सोन्याचांदीचे अलंकार धारण करणारी, लखलखणारी लक्ष्मी एवढेच तीचे वर्णन नाही तर चंद्रासारखी शीतल, शांत व अमृतमयी असावी. सन्मार्गाने मिळवलेले धनच मनाला शांती मिळून देते.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् l
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ll२ll
हे अग्निदेव ! जी प्राप्त झाली असता मला सुवर्ण, गोधन, अश्व व सेवक मिळतील अशा अविनाशी स्थिर लक्ष्मीला माझ्या साठी आवाहन करुन घेऊन ये.
माझ्या कडे येणारी लक्ष्मी ही अनपगामिनी असावी. परत न जाणारी स्थिर, कायम माझ्याकडेच असावी. लक्ष्मीच्या प्राप्ती नंतर येणारे दुर्गुण माझ्यात येऊ नयेत ही प्रार्थना. लक्ष्मी चंचल नसते ती आल्यावर आपला विवेक सुटतो व आपणच बेजबाबदार वागतो व ती जाते.
रघुवंशाचा इतिहास सांगतो की त्या घरात आलेली लक्ष्मी व किर्ती पिढ्यानपिढ्या कायम राहिली व वृद्धिंगत झाली. कारण रघुवंशातील राजे महापराक्रमी, सदाचारी, सद्गुणी, धर्मपरायण व प्रजाहितदक्ष होते.
लक्ष्मीच्या बरोबरीने सुवर्ण वैभव येऊ दे. हे वैभव म्हणजे गोधनही. भारतीय संस्कृतीत गोधनाला खूप मान आहे. दूध, तूप, दही, लोणी हे शक्तिवर्धक व आरोग्यवर्धक आहे. तसेच गोमूत्र व गोवऱ्या हे जंतुनाशकही आहे. गो माता आहे. विपुल गोधन हे वैभव समृद्धी आहे.
लक्ष्मीसह अश्वही यावेत. राजवैभव यावे. हे सर्व आल्यावर पुरुषही यावेत. आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, नोकरचाकरही यावेत तरच घराला वैभव असेल. वैभव हे एकट्याने उपभोगायचे नाही. सुखदुःखात सहभागी होणारे आप्तेष्ट, वेळप्रसंगी सल्ला देणारे सुह्रद् आणि जीवाला जीव देणारे नोकर हवेत. हेच वैभव.
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् l
श्रीयं देवीमुपव्हये श्रीर्मा देवी जुषताम् ll३ll
जिच्या रथाला पुढे घोडे जोडलेले आहेत, ती ज्या रथात बसलेली आहे, हत्तींच्या चित्कारांनी जिचे आगमन कळते अशा लक्ष्मीदेवीला मी आवाहन करतोय. बोलवत आहे. हे श्रीदेवी माझ्यावर संतुष्ट हो.
या ऋचेतील लक्ष्मी सामर्थ्य संपन्न राजलक्ष्मी आहे. आम्ही सामर्थ्याचे शक्तीचे पुजक आहोत. आपल्या सर्वच देवांनी दुष्टांच्या निर्दालनासाठी शस्त्र धारण केली आहेत. देतानाही अनावर झालेल्या असुरांचा निःपात दुर्गेने काठीने केला. या" देवीसर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ". चतुरंग सैन्यासह सामर्थ्यवान लक्ष्मीने माझ्याकडे यावे.
लक्ष्मीने हत्तींच्या चित्कारांनी राजरस्त्याने अश्वदल, गजल, रथ याच्यांसह समारंभाने यावे. हास्य, आनंद, उल्हास, वैपुल्य, धान्याच्या राशी अशी समृद्धी माझ्याकडे येवो.
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तिं तृत्पां तर्पयन्तीम् l
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपव्हये श्रियम् ll ४ll
जी अवर्णनीय आहे. जिच्या स्वरुपाचे वर्णन करता येणार नाही --> काम, जी सस्मित आहे सोस्मिताम् --> स्मितहास्य करीत आहे, जी सुवर्णस्वरुप, कोमल, तेजस्वी आहे, जी स्वतः तृप्त आहे आणि भक्तांनाही तृप्त करते, जी कमळात निवास करते, जिची कांती कमळा सारखी आहे अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो.
जे मिळवायचे आहे ते मंगल, उदात्त, सात्विक हवे. कसेही, कोणतेही, कोणत्याही मार्गाने आलेले धन आपण स्विकार नये.स्वच्छ धन हवे.
लक्ष्मीचे वर्णन भव्य दिव्य असते. मानवी शक्तीच्या पलिकडे असते. तिला पूर्णपणे समजण्यास दिव्यचक्षुच हवेत.
लक्ष्मीसह ते आपल्या मंगलमय सस्मित दर्शनाने वातावरण प्रसन्न करते. सुहास्यवदनाने घर प्रसन्न होते. अशी लक्ष्मी जिच्यात मायेचा ओलावा 'आर्द्रा' वत्सला, अंतःकरणाने कोमल हवी. आई सारखी. ती आर्द्रा असली तरी ज्वलंती आहे. माझे घर तेजाने उजळून टाकणारी हवी. माझ्यातील गुणदोष नाहिशी करणारी, जाळून टाकणारी, कठोर उपाय करणारी हवी. ती तृप्ती तर्पयन्ती ही हवी अशी प्रार्थना अग्नीदेवाला आहे. लक्ष्मी बाबत विवेकी लोकांनी कसे असावे "लक्ष्मी तरुणाप्रमाणे द्यावी, लक्ष्मीचा उपभोग बालकाप्रमाणे भोगावा, लक्ष्मीस वृद्धा प्रमाणे सांभाळावी".
कमळात राहणारी लक्ष्मी पांढऱ्याशुभ्र कमळात राहणारी लक्ष्मी. कमळ चिखलात वाढते पण ते चिखलाच्यावर दिमाखाने उभे राहते. निर्लेपता.
अशा कमळात राहणारी सद्गुणांचा सुगंध दरवळणारी लक्ष्मी आमच्या घरी येवो.
चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं
श्रीयं लोकेदेवजुष्टामुदाराम् l
तां पद्मिनीमं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यंतां त्वां वृणे ll५ll
जी चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे, तेजस्वी आहे, जी त्रिभुवनात आपल्या यशाने तळपणारी आहे, जी देवांकडून पूजिली जाते, जी उदार आहे, जी श्वेतकमळ धारण करते त्या लक्ष्मीला मी शरण आहे. हे जगन्माते ! तू माझे दारिद्र्य नष्ट कर अशी तुला प्रार्थना करतो.
लक्ष्मी चंद्रा प्रमाणे तेजस्वी, आल्हाददायक प्रकाश सुखावणारा, संतोष देणारा, कांतीमान, त्रिभुवनात आपल्या तेजाने तळपणारी आहे. ही अष्टभुजा आहे. देवही तीचे पुजन करतात. शरण जातात. ती सज्जनांजवळ असली तर तिचा चांगल्या कामासाठी उपयोग होतो. दुष्टांच्या हातात गेली तर तिचा उपयोग विघातक कामांसाठी केला जातो. रावणाचा जवळची संपत्ती, सामर्थ्याचा उपयोग विघातक कामासाठी झाला.श्रीरामांची शक्तीपूजा सज्जनांच्या व पिडीतांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी होती.
लक्ष्मी सात्विक लोकांजवळ राहते. लक्ष्मी उदारा आहे पण ती कोणासाठी जो समाजातील दुर्बल, गरजू साठी जो सत्पात्री दान करतो त्याच्यासाठी.
लक्ष्मीसह पद्मावर बसलेली विष्णूपत्नी. ह्या संशोधनात गृहस्थाश्रमाची सूचना आहे. सर्व आश्रमातील श्रेष्ठ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी म्हणून.
धवल वर्ण फार थोडा प्रकाश घेतो व अधिक मात्रेनें तो बाहेर पसरवितो त्याचप्रमाणे आपल्या मिळकतितील थोडा भाग आपल्या गरजा पूर्ण झाल्यावर समाजासाठी खर्च करावा. जोडोनिया धन l उत्तम वेव्हारें l उदास विचारे वेच करी l
आपल्या चातुर्मासातील कहाण्यातून हेच सांगितले आहे.
अलक्ष्मीर्मे पैशाची व बुद्धिचीही. दारिद्र्य हे गृहस्थाश्रमीचे फार मोठे दुःख आहे तसेच बुद्धीचे मानसिक दारिद्र्य आहे. दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, द्वेष करणे होय.
कोणत्याही गोष्टीची चांगली बाजु पाहणे, सकारात्मक विचार हवा. हे लक्ष्मी ते तू माझे "भौतिक, नैतिक, मानसिक आणि बौद्धिक दारिद्र्य दूर कर ही प्रार्थना"
आदित्यवर्णे तपसोऽधिजायतो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः l
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्र्च बाह्या अलक्ष्मीः ll६ll
हे सूर्यासारख्या तेजस्वी जगन्माते तुझ्या तपःसामर्थ्याने वनस्पती म्हणजे फुले न येताच फळे येणारा बिल्ववृक्ष उत्पन्न झालाय. तुझ्याच तपोबलाने त्याची बिल्वफळे माझे अज्ञानजन्य कष्ट व बाह्य दारिद्र्यही नष्ट करेल.
लक्ष्मी आदित्यवर्ण सूर्यासारखी तेजस्वी, परोपकारी आहे. जेथे सूर्यप्रकाश पोहचत नाही तेथे रोगराई, अज्ञान, अंधकार असतो. सूर्यप्रकाशाने जीवन मिळत,अज्ञान, अंधकार नाहीसा होतो. लक्ष्मी सूर्यासारखी तेजस्वी आहे तीच्या येण्यांने शारिरीक, मानसिक व बौद्धिक सामर्थ्य प्राप्त होते. सर्व घर उजळून निघते.
गृहिणीला गृहलक्ष्मी म्हणतात. तिचा योग्य तो मान राखला जातो त्या घरात लक्ष्मी प्रसन्न पणे वास करते. गृहिणीला प्रसन्न राहण्याचे शिक्षण द्यायला हवे. सुशिक्षित व सुसंस्कारीत गृहिणी घराचा स्वर्ग बनवते. सर्व आश्रमातील श्रेष्ठ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी.
बिल्ववृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. ज्याला फुले न येताच फळे येतात हे त्याचे वैशिष्ट्य. त्याला श्रीवृक्षही म्हणतात. लक्ष्मींनी बेलाच्या वृक्षांशी बसून तपश्चर्या केली. तिच्या तपःसामर्थ्याने हा वृक्ष पावन झाला. शंकराला बेल प्रिय. त्रिदल वहावयाचे. त्रिशूल शंकरांचे प्रमुख अस्त्र. त्रिलोक स्वर्ग, मृत्यु, पाताल. तीन अवस्था कुमार, यौवन, जरा. त्रिगुण सत्व, रज, तम. तीन दोष कफ, वात, पित्त. निद्रा, आल्यावर, भय हे त्रिकोणी. ह्यां सर्वांपासुन सुटका कर आणि माझी बुद्धी आत्मज्ञानात स्थिर कर.
बेलाचे फळ, पान, साल, खोड औषधी आहे. त्याचा औषधी उपयोग आपल्या गृपवर दोन आयुर्वेदिक डॉक्टर आहेत एक सौ. वर्षा जोशी व श्री. नितीन झोडगे दोघेही निष्णात आहेत. त्यांचेही मार्गदर्शन गृपवर हवंय.
बिल्ववृक्षाचे निरामय जीवन प्राप्त होते. निरामय जीवन हीच सर्वात मौल्यवान लक्ष्मी आहे.
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह l
प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ll७ll
हे लक्ष्मी ! देवाचा शंकराचा मित्र असलेला कुबेर, चिंतामणि-चिंता नष्ट करणारे रत्न आणि कीर्ति यांचे हे माझ्याकडे येवो. मी ह्या श्रेष्ठ राष्ट्रात जन्मलो आहे म्हणून तो कुबेर या राष्ट्रानुकूल कीर्ति व समृद्धी मला देवो.
या महान भारत राष्ट्रात माझा जन्म झाला. सुराष्ट्र कसे परंपरा, संस्कृती, जीवनशैली, जीवनमूल्ये यांच्या रक्षणार्थ पराकाष्ठा प्रयत्न करणाऱ्या थोर विभूतींमूळे. लक्ष्मी संपत्ती आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी नसून समाजाच्या भरणपोषणासाठी व राष्ट्राच्या उन्नतीसाठी आहे अशा त्यागी वृत्तीचे लोक राष्ट्र महान करतात. ही श्रेष्ठ परंपरा ह्या भारत देशात आहे प्राचीन काळापासून म्हणून हा भारताचा महान. अशा देशात माझा जन्म झाला आहे. माझाही जीवनक्रम त्याला अनुकूल असाच असायला हवा. राष्ट्राच्या किर्ती समृद्धी भर घालणारा हवा. त्यासाठी हे लक्ष्मीमाते, कुबेरांनी मला धनसंपन्न करावे.
समृद्धी साठी देवसखा कुबेर माझ्याकडे येऊ दे. देवांचा तो कोषाध्यक्ष. त्यांने माझ्या कडे यावे.
आपल्या राष्ट्राची खरी समृद्धी आहे भगवंतानी गीतेत गायलेलं ज्ञान-आत्मविद्या. तेजातून रत होणारा भारत. लौकिक संपत्ती इतकेच आत्मविद्येला किंबहुना काकणभर जास्तच आत्मविद्येला महत्त्व आहे. कारण तीच विश्वबंधुत्वाची जननी आहे.
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् l
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात ll८ll
भूक, तहान अशा मागितल्याने युक्त असलेल्या तीव्र अलक्ष्मीला-अवदशेला मी नष्ट करतो. हे देवी तू अभाव व असमृद्धीला माझ्या घरातून घालवून दे.
लक्ष्मी घरात येण्यापूर्वी घरातील अलक्ष्मी बाहेर जायला हवी. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य, अस्वच्छता, व्यसनाधीनता, कलह, कडकड बोलणे, दुर्गुण जायला हवेत तरच लक्ष्मीला यावे वाटेल. सद्गुण अंगी बारकावे. स्वच्छ, शांत, पवित्र, अशा ठिकाणी लक्ष्मी प्रसन्नतेने येते.
क्षुधा व पिपासा सतत कशाचीही हाव. स्वार्थासाठी संपत्तीचा अती लोभ माणसाला अनितीने वागण्यास प्रवृत्त करतो, मानसिकता बदलते. कष्ट न करता अवैध मार्गाने संपत्ती मिळवली जाते. अशी मिळवलेली संपत्ती पचनी पडत नाही. चैन, ऐतखाऊ, व्यसनी, आळशी, ऐषआरामी बनतात. हे नको.
अलक्ष्मीला घालवल्यानंतर लक्ष्मीला विनवणी आहे अभूती चा नाश कर. अभूतिमसमृद्धिं म्हणजे असंतोष, अतृप्त, असमाधान याच उच्चाटन कर. घरात समाधान, शांती, तृप्ती नांदू दे. तसेच माझ्याघरातील दारिद्र्य जाऊ दे.
स्वतःतील दोष दूर करण्यासाठी आपले प्रयत्न आवश्यक असतात. आजुबाजूला समृद्धी नांदण्यास दैवीकृपा आवश्यक.
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्ठां करीषिणीम् l
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्हये श्रियम् ll९ll
विशिष्ट सुवासामुळे ओळखू येणारी, जिला कोणीही बळजबरीने उचलून नेऊ शकत नाही किंवा हरणही करु शकत नाही अशी, नेहमी धान्याने संपन्न असणारी, वाळलेले भरपूर गोमय असणारी म्हणजेच भरपूर गोधन असणारी, सर्व प्राणिमात्रांची माता भूमी रुप लक्ष्मी येथे येऊ दे.
आता पर्यंत संपत्ती, वस्तु, पशु यांची समृद्धी मागितली. आता मागणी आहे भूमीच्या संपन्नतेची, समृद्धीची. भूमातेसाठी आलेली विशेषणे लक्षणीय आहेत.
गंधद्वारा-----वेगवेगळ्या ऋतुत भूमीचा वेगवेगळा वास येतो. पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने येणारा सुगंध मोहरून टाकतो. पावसाळ्यात उगवणारा गवताचा व ओल्या धान्याचा सुगंध वेगळाच हवाहवासा असतो. रानाचा सुगंध वेगळा तर रखरखत्या जमिनीचा वेगळा. या वेगवेगळ्या वासावरुन आपण भूमिची स्थिती व काळ ओळखू शकतो. हे सर्व कृषिलक्ष्मीचे वर्णन आहे.
दुराधर्षां -----इतर संपत्ती बळजबरीने ऊचलून नेऊ शकतात. तसे भूमीचे नाही. तिच्या साठी युद्धे होतात. परंतु ती कोणाबरोबरही जात नाही. त्यांनाच येथे रहावे लागते.
चौदा वर्षे राजसत्ता हातात असूनही भरत सुमतीच राहीला. रामायणाने असे आदर्श निर्माण केले. आमची भूमी कोणीही सहज बळकावून शकणार नाही. तिचे प्राणपणाने रक्षण करणारे पुत्र वेळोवेळी तिच निर्माण करते, ते या आदर्श चरित्रांच्या माध्यमातून.
ही भूमी नित्यपुष्टा असावी. धनधान्याने नेहमी समृद्ध असावी.याच भूमीत अनेक तेजस्वी, पराक्रमी, बुद्धीमानी नररत्ने निपजली व तिच्या अंगाखांद्यावर वाढली. आपण ज्या भूमीत जन्मलो त्या भूमीचे आपण पांग फेडले पाहिजेत. तिची सेवा करुन तिला आनंदी, सुस्थितीत ठेवले पाहिजे. हे मातृऋण फेडायला हवे. सकाळी ऊठून पादस्पर्शे क्षमस्वमे म्हणायला हवे.
करीषिणी-----करिषि म्हणजे वाळलेले गोमय. वाळलेले गोमय जिच्यावर भरपूर पसरलेले आहे अशी भूमी हवी. गोमयाने भूमी सकस बनते व भरपूर सकस धान्य पिकते. पशुधनासह असलेली भूमीरुप लक्ष्मी आमच्या पाशी नांदावी.
सर्वभूतानां ईश्वरी----आपण पसाभर पेरले तर उदार भूमाता आपल्याला भरपूर देते. मनुष्य, प्राणिमात्रांना, पशु, पक्षी या सर्वांचेच भरणपोषण धरीत्री करते. तिची कृपा म्हणजे जीवन, तिचा कोप म्हणजे सर्वनाश. म्हणून तिला ईश्वरी म्हटले आहे. दैवी मातृभावाने आमचा प्रतिपादन करणारी भूमीरुप लक्ष्मी आमच्या राष्ट्रात नांदावी ही प्रार्थना.
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहिl
पशूनां रुपमन्नस्य मयि श्री श्रयतां यशः ll१०ll
हे लक्ष्मीदेवी माझ्या मनातील इच्छा व संकल्प पूर्ण होवोत. माझ्या वाढीला सत्यत्व लाभो. आमचे पशू धष्टपुष्ट असावेत. माझ्याकडे अन्नसमृद्धी असावी. मला यश व कीर्ती प्राप्त व्हावी.
मनाच्या सामर्थ्यास प्रार्थना लक्ष्मी कडे केलीय. आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. वाणीने सत्यच बोलावे. कोणालाही फसविण्याचा, लुबाडण्याचा विचार आमच्या मनात येऊ नये. स्वतःची प्रगती होतांना दुसऱ्याचे अहित होणार नाहीना ही काळजी घ्यायला हवी. सर्वांचे चांगलेच व्हायला हवे हीच आमची भूमिका असू दे. तपःसामर्थ्याने बोललेले कधीच व्यर्थ जात नाही. वाणी चांगलीच हवी. आपण केलेले संकल्प नेहमी यशस्वी होवोत हीच प्रार्थना.
उत्तम आरोग्य असलेले पुष्टधन हे राष्ट्राचे वैभव आहे. हे पशुधनासह देखणं असाव. अन्नधान्याचीही विपुलता असावी..
कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम l
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्ll११ll
हे कर्दमा तुझ्यामुळे लक्ष्मी पुत्रवती आहे. त्या कमळाच्या माळा धारण करणाऱ्या लक्ष्मीचा निवास माझ्याकडे असू दे. पवित्रतेच निदर्शक आहे. तीचे सौंदर्य सोज्वळ आहे.
कर्दम या ज्ञानी व तपस्वी ऋषींमुळे लक्ष्मीदेवी पुत्रवती आहे. कर्दमांनी आपल्या पद्ममालिनी मातेसह माझ्याकडे यावे आणि तिला माझ्या वंशातील स्थिर करावे.
ज्ञान, तप, शुचिता, सौंदर्य या सर्वांचा विलास माझ्या कुळात असावा. कर्दम —ज्ञान व तप. पद्म—सौंदर्य व शुचिता. धनाचा योग्य विनियोग करण्यासाठी विद्या व संयम हवा.
आम्हाला सुबत्ते बरोबरच ज्ञान वैभव, गुणवैभव, चारित्र्यवैभव हवे.
कर्दम म्हणजे चिखल असाही अर्थ आहे. ओलिताची भूमी हवी. ज्यात अन्नधान्याच उत्पादन जास्त येईल. तसेच नद्यांपासून दूर असणाऱ्या समाजाची धनधान्याची सुबत्ता आणि गोधनाची वाढ यांचा मुख्य आधार, ज्यामधे कमळांचे ताटवे फुलतात अशा पुष्करणी असत. या मार्गाने लक्ष्मीने समाजजीवनात प्रथम प्रवेश केला आणि कमळ हे लक्ष्मीच प्रतिक बनले.
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लित वस मे गृहे l
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ll१२ll
हे जलाशय स्नेहभाव उत्पन्न करोत. हे चिक्लिता तू माझ्या घरात रहा आणि देवीलक्ष्मीमातेला माझ्या कुळात रहायला आण.
कर्दमा प्रमाणे चिक्लिता हे ही लक्ष्मीचे पुत्र आहेत. ज्याचे नाव उच्चारताच अंतःकरण आर्द्र होते तो चिक्लिता. मायेच्या ओलाव्यासह लक्ष्मी यावी. दोन्ही मुले बरोबर असली की त्यांच्या ओढीने आई येथेच स्थिर राहिल.
चिक्लित म्हणजे जलवैभव. सर्व सृष्टीला आवश्यक. पाणी म्हणजे ओलावा तो ओलावा माणूसकीतही आवश्यक. तरच स्नेहभाव होतो. सह्रुदयता हवी तरच लोकांबद्दल प्रेम आपुलकी वाटेल व सामाजिक प्रश्न सोडवले जातील.जलवैभवाने युक्त चिक्लिताने आपल्या मातेसह माझ्या कुळात वास करावा ही प्रार्थना.
आज जलसंपदा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी आपण किती निष्काळजी आहोत. सृष्टीची उत्पत्ती जगापासून होते व तिचा लयही जगातच आहे हे आपण विसरलो का? प्रदूषण, उधळपट्टी पासून जलाचे रक्षण करुया..
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् l
चंन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मी आवहll१३ll
हे जातवेद ! वत्सल ! सर्व प्राणिमात्रांचे पोषण करणाऱ्या, पिंगट वर्णाच्या पुष्करिणींत वास करणाऱ्या, चंद्राप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या, सुवर्णासम कांतीच्या लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.
लक्ष्मी पुष्करिणींत राहणारी, ज्यात कमळे फुलतात व हत्ती असतात असा विस्तीर्ण जलाशय. श्वेतकमळांची माळा ल्यायलेली हत्तीवर बसलेली लक्ष्मी जिचे पूजन हत्ती सोंडेचा पाणी उडवून करतो. हत्ती हा सामर्थ्यवान, बुद्धिवान, वैभवाचे प्रतिक आहे. स्वभाव उदार. त्याला दिलेल खाणं तो पहिले दोन घास इकडे तिकडे उडवतो नंतर आपण खातो. उडविलेल्या दोन घासांवर अनेक लहान जीवाचे पोट भरते. अशा उदार वृत्तीसह लक्ष्मीने आमच्याकडे यावे. आपल्याकडे जे काही असेल ते उदार वृत्तीने सामाजिक कार्यात द्यावे. दात्या हाताला लक्ष्मी भरभरुन देते.
पुष्टीवर्धक अशी पिङ्गल वर्षाची लक्ष्मी, लाल व पिवळ्या रंगाचे मिश्रण. लालरंग सामर्थ्याचा व पिवळा समृद्धीचा निर्देशक आहे. सामर्थ्याचे रक्षण समृद्धी माझ्याकडे नांदावी.सामर्थ्य चंद्रासारखे आल्हाददायक असावे. माझ्या स्वभावात बुद्धीचे व सात्विकतेचे तेज यावे. गजांत लक्ष्मी सुपीक झालेल्या भूमीतील पिकांचे तेज धारण करणारी, सर्व प्राणिमात्रांवर सुखाचा वर्षाव करण्यासाठी येऊ दे.
आर्द्रा यः करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्l
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहll१४ll
हे जातवेदा ! आर्द्रा हातात वेताची काठी घेतलेल्या, सुवर्णमाळा धारण करणाऱ्या, सूर्याप्रमाणे तेजस्वी, लखलखीत लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.
लक्ष्मीमाते प्रेमळ असावी पण मूल चुकले की आई जशी कठोर शिक्षा देऊन सन्मार्गावर आणते तशी. वैभवशाली धर्मदंडाचा अंकुश हवाच. नाहितर मनुष्य धनयोगाने मत्त व स्वैर वागेल. मगध साम्राज्य हे उदाहरण." धर्मदण्ड्योसि" राजा तू जरी ऐश्वर्यसंपन्न असलास तरी धर्मदंडाचे शासन तुलाही लागू आहे. तू धर्माविरुद्ध आचरण केलेस तर तुला पदच्युत करण्याचा अधिकार आम्हांला आहे. या धर्मदंडाचा मान राखण्यात अयोध्येचे राजकुल अग्रणी होते. प्रजाहितपरायण, धर्मशील, पराक्रमी, न्यायी राजांची परंपराच या कुलात निर्माण झाली.
असा धर्मदंड धारण केलेली तेजस्वी लक्ष्मी मातृभावाने माझ्याकडे स्थिर व्हावी.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् l
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ll१५ll
हे जातवेदा ! त्या अक्षय स्थिर लक्ष्मीला माझ्याकडे बोलाव जी आली असता मला विपुल सोनं, गोधन, दासदासी, घोडे मिळतील. आतापर्यंत केलेल्या आवाहनाचाच या अखेरच्या ऋचेतील पुनरुच्चार आहे. सर्व प्रकारच्या संपन्नतेसह लक्ष्मीने यावे ते परत कधीही न जाण्यासाठी. सर्व चराचरांना जाणवणाऱ्या अग्निदेवा मला हाच वरप्रसाद द्यावा.
या पंधरा ऋचा म्हणजे मुख्य सूक्त होय.
सोळावा ऋचा उपसंहारात्मक आहे.
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् l
सूक्तं पञ्च दशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ll१६ll
येथे श्रीसूक्ताच्या प्रयोगाचा विधी सांगितला आहे. हा प्रतिदिन करण्याचा विधी आहे. त्यासाठी स्थानाची शुद्धी हवी व मनाची शुचिता हवी. व्रतस्थ असावे. तुपाच्या आहुती द्याव्यात आणि सतत सूक्ताचा जप करावा.
संपत्तीच्या प्राप्तीच्या ईच्छे बरोबरच त्यागाचीही भावना हवी. लक्ष्मीच्या प्राप्तीच्या ईच्छा असणाऱ्यांनी अंतर्बाह्य शुद्ध हवे. आपली संपत्ती ही दिनदुबळ्यांसाठी, देवकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी उपयोगात आणण्याची वृत्ती ठेवावी.
इति सूक्तम्
या नंतरच्या ऋचा लक्ष्मिसूक्त व फलश्रुती सांगणाऱ्या आहेत.
पद्मासने पद्मउरु पद्माक्षि पद्मसम्भवे l
तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ll१ll
हे कमलमुखी, कमळासारख्या मांड्या असणारी, कमळासारखे नेत्र असणारी, कमळात जन्मलेली देवी लक्ष्मी तू माझ्या सन्निध रहा. त्यामुळे मी सुखी होईन.
कमळ मिळालेल्या आयुष्यात प्रसन्नता पुरवते. भूतकाळाविषयी खेद किंवा भविष्यकाळाची चिंता यामुळे वर्तमानकाळातील आनंदावर विरजण पडू द्यायचे नाही. ईश्वराने आपल्याला जे आयुष्य दिले आहे ते समाजकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी उपयोगात आणता आणले पाहिजे. आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो त्या समाजाला स्वस्थ, सुखी करुन राष्ट्राला उन्नत करण्याचा संकल्प करायला हवा व तो पूर्ण करण्यासाठी दृढ श्रद्धेने आचरण हवे.
पद्मानना म्हणजे सुंदर मुख्य असलेली. विचारातील सत्यनिष्ठा व मनाची सरलता यामुळे मनुष्याला सौंदर्य प्राप्त होते. व्यक्तिमत्त्व आकर्षित होते असे गुणांनीयुक्त सौंदर्य मला लाभावे.
पद्म उरु म्हणजे कमळासारख्या कोमलमांड्या जिच्या आहेत ती. कमळाला अनेक पाकळ्या असतात. पूर्ण विकसित कमळावर अनेक भुंगे आश्रय घेतात. हे लक्ष्मीमाते माझ्यातही अनेकांना सामावून घेण्याची, आधार देण्याची क्षमता यावी. पंडितांनी निःशंकपणे माझा आश्रय घ्यावा.
श्वेतकमळाप्रमाणे स्वच्छ दृष्टी लक्ष्मीमाते च्या कृपेने मला लाभावी. लक्ष्मीची प्राप्ती झाली तरी माझ्या दृष्टीत शुद्धभाव व निरागसता असावी.
लक्ष्मी पद्मसम्भवा आहे. अर्थातच कमळाचे सौंदर्य, कोमलता हे गुण तिच्या सन्निधाने माझ्यातही यावेत.
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि l
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्वं ll२ll
हे पद्मानने, पद्मामध्ये वास करणारी, कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असणारी,सर्वविश्वाला प्रिय असणारी, विष्णूच्या मनानुकूल वागणारी देवी तुझे मंगलमय चरण माझ्यासाठी असू दे.
स्तुतीसाठी आणि आचारविचारांची शुद्धता, नम्रता हे गुण ठसविण्यासाठीच ही पुनरुक्ती आहे. जागरुकता, समभाव, विशाल दृष्टी, सद्गुणी, सदाचारी, विश्वाचे संरक्षण, सुसंवाद, समाजाला अनुकूल वर्तन हवे. तिच्या सारखे माझे वर्तन असावे.
हे देवी तुझे चरण कमल माझ्याकडे स्थिर होऊ देत.
अश्वदायै गोदायै धनदायै महानधे l
धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देवि मे ll३ll
अश्व, गायी आणि धन देणाऱ्या धावती देवी मला धन दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
गायी, घोडे हे देखील धन संज्ञेत येतात. देवी लक्ष्मीला धन मागितले आहे. त्याबरोबर हे शब्द स्वतंत्रपणे सांगितले. ते गति, प्रगति, विजय सुचवतात. मी हातात घेतलेल्या कामाला गती यावी, कामात सतत प्रगती व्हावी आणि अंती सफलता मिळावी. अश्व हे त्याचे प्रतीक. गोधन हे समृद्धीचे प्रतीक. भरपूर दुध देणाऱ्या धष्टपुष्ट गायीवासरांची खिल्लारे म्हणजे कृषी संस्कृतीचं वैभव. भरपूर धन घेउन अशा अश्व व गोधनासह लक्ष्मी माझ्याकडे यावी आणि तिने माझे मनोरथ पूर्ण करावेत.
पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादि गवेरथम् l
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोत मे ll४ll
हे देवी मला मुलं, नातवंडे, धन, धान्य, हत्ती, घोडे, गायी, रथ वैभव दे. तू सर्व प्रजेची माता आहेस. तू मला दीर्घायुषी कर.
ज्या कुळात जन्म घेतला ते कुळ पवित्र करणारी, जन्म देणाऱ्या मातेला धन्य व कृतार्थ करणारी, ही भूमी पुण्यवान करणारी संतती मला दे. "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा." स्वतःच्या कुणाची, समाजाची, राष्ट्राची मान उन्नत करणारी संतती हवी आणि ही परंपरा अखंड चालावी.
माझ्या प्रमाणेच माझ्या संततीचाही हे माते तू प्रतिपाळ करावा. सगळ्या प्रजेची तू माता आहेस. आयुष्याची रुपरेषा वेदांनी आखून दिली आहे. ब्रम्हचर्याश्रमात अध्ययन, गृहस्थाश्रमात अग्निहोत्रादि कर्म, वानप्रस्थाश्रमात भक्ति आणि संन्यासाश्रमात ज्ञानप्राप्ती असे ते टप्पे आहेत. या चारही अवस्थांनी परिपूर्ण आयुष्य असावे ही प्रार्थना.
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनंजय वसुः l
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमस्तु मे ll५ll
अग्नि, वायु, सूर्य, वसुली, इंद्र, बृहस्पती, वरुण हे सर्व माझे धन व्हावेत.
अग्नि-----अग्नि म्हणजे पावित्र्य, त्याग, सामर्थ्य, तेजस्विता. अग्नीत सर्व काही शुद्ध होते. तो वैश्वानर, वडवानल, दावानल आहे. अग्नी देवता व मनुष्य यातील देवदूत आहे. उन्नती चा संदेश देतो. खूप मोठे धन आहे.
वायु-----जीवसृष्टीला आवश्यक. हवा, वारा वायूची रुपे. सर्वांना शुद्ध व विपुल हवा हवी.
सूर्य - - - सर्व चराचरांना सृष्टीचा जीवनाचा. सूर्याची सर्वोत्तम प्रार्थना गायत्री मंत्र.
वसु----अष्टवसु.
(आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनिल प्रत्यक्ष, प्रभास. )
इंद्र - - - देवांचा राजा. दुष्ट शक्तीं पासून रक्षण.
बृहस्पती - - - - देवांचे गुरु. वरद हस्ते लाभावा.
वरुण----पाण्याची देवता. जल संपती लाभावी.
हे सर्व माझे धन व्हावे.
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा l
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ll६ll
हे वैनतेया ! तू सोमरस पी. वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्रानेही सोमपान करावे. सोमरस हे ज्याचे धन आहे त्या देवांनी मलाही सोमरस द्यावा.
सोमरस हे स्वर्गातील अत्यंत स्वादिष्ट व शक्तिवर्धक पेय आहे. देव सोमरस पिऊन बलशाली होतात. सोमरसाला धनाधिपती म्हणतात. सोमरस म्हणजे दारु नव्हे.
वैनतेय म्हणजे विनतापुत्र गरुड. गरुड, इंद्र, आणि इतर देव श्रीविष्णूलक्ष्मीच्या परिवारातले आहेत. महान्व्यक्तिंच्या थोर कार्यात त्यांच्या परिवारासाठी सहभाग असतो.
गरुडच सारखी झेप घेण्याचे व भरारी मारण्याचे सामर्थ्य व इंद्रा सारखे दुष्टांच्या निर्दालन करण्याचे सामर्थ्य आमच्यात येऊ दे.
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः l
भवन्ति कृतपुण्यानां भक्त्यां श्रीसूक्तजापिनाम् ll७ll
ज्यांनी पुण्यकर्म केले आहे अशा श्रीसूक्ताचा जप करणाऱ्या भक्तांच्या मनात क्रोध, मत्सर, लोभ, दुर्बुद्धी उत्पन्न होत नाही.
पैसा आला की माणसाची मतिः भ्रष्ट होते. एकेक दुर्गुण त्याच्या कडे येऊ लागतात. लक्ष्मी सोडून जाते पण दुर्गुण त्याच्या जवळच राहतात. स्वतःला मोठ समजलं की आपल्या विरुध्द कोणी बोललेले खपत नाही. कोणी आपली चुक दाखवली तर सहन होत नाही. विवेक जातो. तोल ढळतो. अधोगती सुरु होते. हे टाळण्यासाठी प्रार्थना आहे. हे माते तुझी कृपा झाली तर दुर्गुण माझ्यात येणारच नाहीत. माझी बुद्धी स्थिर, समतोल राहू दे. चांगल्या कामासाठी तिचा उपयोग होऊ दे. "राष्ट्राय स्वाहा इदं न मम" हा भाव दृढ होऊदे.
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे l
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ll८ll
कमलनिवासिनी, हातात कमळ धारण करणारी, अतिशय शुभ्र वस्त्रे आणि सुगंधी फुलांच्या माळांनी सुशोभित, विष्णूची प्रिया, भक्तांचे मन जाणारी, त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणारी भगवती माझ्यावर प्रसन्न हो.
समुद्रमंथनातून लक्ष्मी वर आली ती कमळात बसून. चिखलाचा म्हणजे अमंगलाचा स्वतःला स्पर्शही होऊ न देणारे कमल सौंदर्यशाली आहे. प्रचंड जलसाठ्याच्यावर दिमाखाने राहण्याचे सामर्थ्यही आहे. अशा बहुगुणी कमळ लक्ष्मीचे वसतीस्थान आहे. माझ्याकडे लक्ष्मी येईल तेव्हा हे गुणही माझ्यात येवोत.
माझे चारित्र्य निष्कलंक राहो. माझे जीवन इतरांना आनंद, तृप्ती, सुगंध देणारे होवो. श्रीविष्णूलक्ष्मीच्या जी प्रिय आहे तीची योग्यता किती मोठी आहे. हरिवल्लभा आहे. तिने माझंही प्रिय करावे.
ऐश्वर्य, यश, सौंदर्य, ज्ञान, बल व सामर्थ्य हे सहा गुण जिच्याजवळ आहेत ती भगवती माझे गुणांसह रक्षण करु दे. साऱ्या त्रिभुवनाला वैभवशाली करणारी लक्ष्मी मलाही वैभवसंपन्न करो.
विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् l
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ll९ll
विष्णूची पत्नी, क्षमाशील, मधुरा, माधवाची प्रिया, विष्णूची प्रियसखीं, अच्युत जिचा पती आहे अशा देवीला मी नमस्कार करतो.
लक्ष्मीची तिच्या पतीशी असलेली एकरूपता इथे व्यक्त झाली आहे. आपल्या कर्तव्यापासून जो कधीही च्युत होत नाही ढळत नाही तो अच्युत. त्याच्या कार्यात लक्ष्मीची पूर्ण साथ आहे. तो माधव तर ही माधवी. दोघेही गोडच. ती क्षमाशील आहे. भक्तांकडून जाणता अजाणता घडलेल्या अपराधांबद्दल ती क्षमाशील आहे. माधवाला प्रिय असणाऱ्या या देवीला मी नमस्कार करतो.
ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः l
भयशोकमनस्तापाः नश्यन्तु मम सर्वदा ll१०ll
माझे कर्ज, रोग, दारिद्र्य, पाप, भूक, अपमृत्यु, भिती, दुःख, मनस्ताप आदि कायमचे नष्ट होवोत.
अलक्ष्मीचा माझ्या घरात प्रवेश नको. तिचा कायमचा नाश होऊ दे. मनुष्याच्या हातून चुका-पापे होऊ शकतात. हे देवी माझ्या हातून काही पाप घडले तर मला मातृभावनेने क्षमा कर व पाप नाहीसे कर. पापाचे मूळ भूक, हाव आहे. त्यासाठीच पापे करण्यास मनुष्य प्रवृत्त होतो तर ती भूक, हाव नष्ट कर. कर्जही दारिद्र्या मुळेच होते. तूच माझ्या घरी राहिलीस तर दारिद्र्य माझ्याकडे येणारच नाही. माझी जीवनचर्या अशी असावी की रोगराई माझ्या घरात प्रवेशच होणार नाही. माझ्या घरात सदैव आरोग्यलक्ष्मीचा वास असो.
सर्व अशुभ गोष्टी माझ्या जीवनातून नष्ट व्हाव्यात. माझ्या घरात सदैव आनंद फुलू दे.
१-----धनलक्ष्मी २----धान्यलक्ष्मी
३-----संतानलक्ष्मी ४----विद्यालक्ष्मी
५-----धैर्यलक्ष्मी ६-----गजलक्ष्मी
७----वरलक्ष्मी ८----विजयलक्ष्मी
अशा आठही रुपांनी लक्ष्मी माझ्या घरात प्रकट होऊदे.
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते l
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ll११ll
मला संपत्ती, सत्ता, आयुष्य, आरोग्य, दीप्तिमान ऐश्वर्य, धन, धान्य, पशुधन, पुत्रपौत्र आणि शतवर्षाचे दीर्घायुष्य लाभावे.
श्रीसूक्ताच्या नंतर म्हटल्या जाणाऱ्या ह्या ऋचेत दहा प्रकारची संपत्ती मागितली आहे. संपत्ती, सत्ता, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य पृथ्वीतलावरीलच नव्हे तर स्वर्गलोकीचेही ऐश्वर्य, विपुल धान्य, धन, पशुधन, पुत्रपौत्र आणि त्या सर्वांचे वैभवशाली जीवन पाहण्यासाठी शंभर वर्षांचे दीर्घ आयुष्य दे.
श्री म्हणजे केवळ धनसंपदा नव्हे. लक्ष्मीची व्याप्ती अशी मागणी आहे. ह्या सगळ्या मागण्या विस्ताराने आपण पाहिल्या आहेत.
ओम् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि l
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ll१२ll
आम्ही लक्ष्मीला जाणून घेतो. तीच्या स्वरुपाचे ज्ञान प्राप्त करुन घेतो, विष्णूपत्नीचे लक्ष्मीचे ध्यान करतो. त्यामुळे लक्ष्मी आम्हांला सत्कर्माची प्रेरणा देवो.
जी लक्ष्मी महान कार्यासाठी वापरली जाते ती महालक्ष्मी. जे कार्य भगवंतापर्यंत पोहचविणारे असते ते महान कार्य. लक्ष्मी आपल्या घरात येते. तीला महालक्ष्मी बनवणे हे आपले काम.
लक्ष्मी विष्णूंची पत्नी आहे. सर्व विश्वाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याचा त्यांच काम थोर आहे, महान आहे. त्यांची पत्नी ही तशीच महान असणार. हे थोरपण तीला तीच्या दैदीप्यमान कार्यामुळे प्राप्त झाले आहे.
महान व्यक्तींच्या नांवाने जप करणे, त्यांच्या स्वरुपाचे ध्यान करणे, त्यांच्या नांवाने भव्य उत्सव करणे, यांच्या जोडीला स्वतः तसे वागण्याचा प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर त्याचा काहीच उपयोग व्यक्ती, समाज, राष्ट्र कोणालाच होणार नाही. थोर व्यक्तींनी दाखवून दिलेल्या मार्गाने आपली वाटचाल व्हावी. स्वार्थाचा गंध नसावा. असे कार्य परमेश्वराची रुजू होते. आपली सेवा परमेश्वरापाशी रुजू व्हावी हीच प्रार्थना.