श्रीसमर्थरचित समग्र मारुतीस्तोत्र..
या स्तोत्र पठनाने उच्चारातील अस्पष्टपणा दूर होण्यास मदत होते,असा उल्लेख आहे.
नमन गा तुज भीमराया ।निजमती मज दे तुज गाया ।
तडकितां तडका तडकाया ।भडकितां भडका भडकाया ॥१॥
हरुषला हर हा वरदानी ।प्रगटला नटला मज मानीं ।
वदवितां वदनीं वदवितो ।पुरवितो सदनीं पदवी तो ॥२॥
अवचितां चढला गड लंका ।पळभरी न धरी मन शंका ।
तडकितां तडके तडकीतो ।भडकितां भडके भडकीतो ॥३॥
खवळले रजनीचरभारें ।भडकितां तडके भडमारें ।
अवचिता गरजे भुभुकारें ।रगडिजे गमकें दळ सारें ॥४॥
कितिकां खरडी खुरडीतो ।कितेकां नरडी मुरडीतो ।
कितेकां चरडी चिरडीतो ।कितेकां आरडी दरडीतो ॥५॥
महाबळी रजनीचर आले ।भीम भयानकसेचि मिळाले ।
रपटितां रपटी रपटेना ।आपटितां आपटी आपटेना ॥६॥
खिजवितां खिजवी खिजवेना ।झिजवितां झिजवी झिजवेना ।
रिझवितां रिझवी रिझवेना ।विझवितां विझवी विझवेना ॥७॥
झिडकितां झिडकी झिडकेना ।तडकितां तडकी तडकेना ।
फडकितां फडकी फडकेना ।कडकितां कडकी कडकेना ॥८॥
दपटितां दपटी दपटेना ।झपटितां झपटी झपटेना ।
लपटितां लपटी लपटेना ।चनटितां चपटी चपटेना ॥९॥
दडवितां दडवी दडवेना ।घडवितां घडवी घडवेना ।
बडवितां बडवी बडवेना ।रडवितां रडवी रडवेना ॥१०॥
कवळितां कवळी कवळेना ।खवळितां खवळी खवळेना ।
जवळितां जवळी जवळेना ।मवळितां मवळी मवळेना ॥११॥
चढवितां चढवी चढवेना ।झडवितां झडवी झडवेना ।
तडवितां तडवी तडवेना ।गडवितां गडवी गडवेना ॥१२॥
तगटितां तगटी तगटेना ।झगटितां झगटी झगटेना ।
लगटितां लगटी लगटेना ।झुगटितां झुगटी झुगटेना ॥१३॥
टणकितां टणकी टणकेना ।ठणकितां ठणकी ठणकेना ।
दणगितां दणगी दणगेना ।फुणगितां फुणगी फुणगेना ॥१४॥
चळवितां चळवी चळवेना ।छेळवितां छळवी छळवेना ।
जळवितां जळवी जळवेना ।टळवितां टळवी टळवेना ॥१५॥
घसरितां घसरी घसरेना ।विसरितां विसरी विसरेना ।
मरवितां मरवी मरवेना ।हरवितां हरवी हरवेना ॥१६॥
उलथितां उलथी उलथेना ।कलथितां कलथी कलथेना ।
उडवितां उडवी उडवेना ।बुडवितां बुडवी बुडवेना ॥१७॥
बुकलितां बुकली बुकलेना ।धुमसितां धुमसी धुमसेना ।
धरवितां धरवी धरवेना ।सरवितां सरवी सरवेना ॥१८॥
झडपितां झडपी झडपेना ।दडपितां दडपी दडपेना ।
तटवितां तटवी तटवेना ।फटवितां फटवी फटवेना ॥१९॥
वळवितां वळवी वळवेना ।पळवितां पळवी पळवेना ।
ढळवितां ढळवी ढळवेना ।लळवितां लळवी लळवेना ॥२०॥
धुरकितां धुरके धुरकावी ।थरकितां थरके थरकावी ।
भरकितां भरके भरकावी ।झरकिरकितां झरके झरकावी ॥२१॥
परम दास हटी हटवादी ।लिगटला उतटी तटवादी ।
सिकवितां सिकवी सिक लावी ।दपटितां दपटून दटावी ॥२२॥
|| जय जय रघुवीर समर्थ ||
,