श्री तुळसीची आरती
जय देवी जय देवी जय
माये तुळसी I
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
जय देवी जय देवी II धृ.
II
ब्रह्मा केवळ मुळीं मध्ये तो शौरी I
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी I
सेवा करिती भावे सकळही नरनारी I
दर्शनामात्रे पापे हरती निर्धारी II
जय देवी जय देवी जय माये तुळसी I
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
जय देवी जय देवी II १
II
शीतळ छाया भूतळव्यापक तू कैसी I
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी I
तव दल विरहित विष्णू राहे उपवासी I
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी I
जय देवी जय देवी जय माये तुळसी I
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
जय देवी जय देवी II २
II
अच्युत माधव केशव पीतांबरधारी I
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी I
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी I
गोसावी सुत विनवी मजला तू तारी I
जय देवी जय देवी जय माये तुळसी I
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी I
जय देवी जय देवी II ३
II
मराठी अर्थ
हे माते तुळसी ! तुझा जयजयकार असो. तुझ्या एका
पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. तुझ्या मूळी ब्रह्मदेवांचा, तर मध्ये विष्णूंचा आणि अग्री शंकरांचा वास आहे. शाखा
शाखामध्ये सर्व तीर्थे आहेत. सर्व लोक तुझी मनोभावे पूजा करतात. तुझ्या दर्शनानेच
त्यांची पापे नाहीशी होतात. हे माते तुळसी ! तुझा जय जयकार असो. तुझ्या एका
पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II १ II
या भूतळाला तुझ्या शितळ छायेने व्यापून टाकले आहे.
तुझी मंजिरी श्रीविष्णुंची अत्यंत आवडती आहे. तुझ्या पानाशिवाय श्रीविष्णू उपाशी
असतो. अत्यंत शुभ कार्तिक महिन्यांत तुझा विशेष महिमा असतो. हे माते तुळसी ! तुझा
जयजयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II २ II
अच्युत, माधव,
केशव, पितांबरधारी अशी तुझ्या पूजनाच्यावेळी
जो नावे उच्चारतो त्याला तू संतति आणि संपत्ति देतेस. हा गोसावी सुत तुला विनंती करत
आहे कि, या भवसागरांत तू मला तार. माझे रक्षण कर. हे माते
तुळसी ! तुझा जयजयकार असो. तुझ्या एका पानापुढे हे त्रिभुवन फिके पडले आहे. II
३ II
साभार : अनंत देव : वाई