श्रावणातील उपवास व आरोग्य !
श्रावण भाद्रपद महिना (Shravan Bhadrapad month) आला कि व्रत उपवास (Fasting) पूजापाठ सुरु होतात. अनेक जण पूर्ण श्रावण महिना उपवास किंवा १ सांज
जेवतात. श्रावण सोमवारचा उपवास (Shravan Somvar) हमखास
करतातच. उपवास म्हणजे नक्की काय ? त्याचा लाभ काय आणि कसा
करावा ?
आजकाल उपवास म्हणजे रोजच्या जेवणात काहीतरी वेगळेपण
असे काहीसे दृश्य असते. साबुदाणा बटाटा शेंगदाणे (Sabudana batate ) दही सर्व पदार्थ पचायला जड व त्यांच्यापासून बनविलेले पदार्थ त्यापेक्षाही
पचायला जड ! बरं हे पदार्थ चालतात हे कुणी ठरविले ते माहित नाही. प्रत्येक घराचे
गावाचे आपले स्वतःचे नियम उपवासाबाबतीत दिसतात. कुणाला बटाटा रताळी चालतात कुणाला
गाजर खायला हरकत नसते. कुणी काकडी सुद्धा चालते असे म्हणून पावसाळ्यातील थंड
वातावरणात थंड काकडीची कोशींबीर वनस्पती तूपात तळलेल्या साबुदाणा वड्यासह उपवास
आहे म्हणून घेतात. याला उपवास कसे म्हणणार हा तर विरुद्धाहार ऋतुविरुद्ध आणि संयोग
विरूद्ध मग पाचन गडबडणारच ना!
उपवास म्हणजे शरीराच्या पाचनसंस्थेला १ दिवस आराम असा
त्यामागचा विचार. १ दिवस पोटाला आराम देऊन ईश्वर भक्तीत लीन होणे, देवाच्या जवळ राहणे ( वास).
आधी ‘पावसाळ्यातील
ऋतुचर्या ‘ या लेखात तुम्ही वाचले असेल की पावसाळ्यात
जठराग्नि मंद झालेली असते तसेच वातावरण, पाणी गढूळ असते.
त्यामुळे या काळात स्वाभाविकरित्या भूक कमी लागते पचनाचे त्रास होऊ शकतात. म्हणूनच
पाचनशक्ति बिघडू नये रोगप्रतिकारशक्ति कमी होऊ नये मुख्य म्हणजे बदलेल्या
वातावरणाचा शरीरावर होणाऱ्या परिणाम त्रासदायक होऊ नये यासाठी लघु आहार घेणे उपवास
करणे हा शास्त्रीय (सायंटिफिक) विचार आपल्या आचार्यांनी (शास्त्रज्ञांनी) केला
आहे. जेव्हा आपण असे का करायचे किंवा वागायचे याची कारणं समजवून घेऊ तेव्हा लक्षात
येईल मांसाहार श्रावण भाद्रपदात का बंद करायचे किंवा पचायला जड ग्रेव्हीयुक्त
भाज्या या काळात का खाऊ नये तर शरीरस्वास्थ्यासाठी ! शरीराला ऋतुनुसार बदलण्यासाठी
!
उपवास म्हणजे काय –
लंघन ही एक आयुर्वेदिक चिकित्सा आहे. ज्या उपायांनी
शरीरात लाघवता किंवा हलकेपणा उत्पन्न केला जातो त्याला लंघन म्हणतात. पाचन करणारे
काढे घेणे, हलका आहार घेणे किंवा काहीच न खाणे
हे सर्व लंघनाचे प्रकारात मोडतात.
त्यामुळे शरीरातील दोषांचे शमन होते. काही व्याधींची
सुरवात असेल उदा. ज्वर सर्दी अजीर्ण इ. तर त्यांची उत्पत्ती होत नाही. पाचनशक्ती
प्राकृत राहते. मल मूत्र इ. सुखपूर्वक शरीराबाहेर काढल्या जातात, भोजन करण्याची इच्छा होते. भूक तहान दोन्ही व्यवस्थित लागते.
छाती कण्ठ स्वच्छ शुद्ध हलकेपण जाणवते, शरीरातील जडपणा कमी
होऊन कामात उत्साह जाणवतो. ढेकर शुद्ध येतात.
या गोष्टी लंघनाने साध्य होतात. तुम्ही विचार करा आपण
जो उपवास करतो त्याने हे फायदे मिळतात का? साबुदाणा
शेंगदाणे इ. खाल्ल्यानंतर भूक लागते का पोट हलके जाणवते का ?
नेमके काय घ्यावे?
लाह्या (Lahya) हा सर्वात चांगला लंघनाचा पदार्थ आहे. साळीच्या ज्वारीच्या लाह्या कफाचे
शोषण करतात पचायला हलक्या मुख्य म्हणजे अशक्तपणा आणत नाही.
मूगाचे कढण – मूग
पचायला सर्वात हलके पण पौष्टीक धान्य. याचे सुंठ जीरे घालून सूप पाचन करणारे आहे.
डाळीचे सूप, मध,
यव यांचा वापर या ऋतुत करावयास हवे.
गरम पाणी / सुंठसिद्ध जल (Ginger Water) – वर्षाऋतुमधे गरम पाणी तसेच सुंठीचा वापर
करण्यास सांगितला आहे. सुंठ पाचन करणारे भूक वाढविणारे कफ कमी करणारे असल्यामुळे
या ऋतुमधे उत्तम.
फळांमधे काळ्या मनुका (Dry Black Currant) उत्तम मलनिस्सारक तसेच पौष्टीक रक्तवर्धक
आणि अशक्तपणा न येण्यासाठी उत्तम.
डाळींब (Pomegranate) हे पाचन करणारे पित्त कमी करणारे फळ.
असे पदार्थ आहारात घेतल्याने लंघनाचा योग्य फायदा होऊ
शकतो. हे पदार्थ चालतात का उपवासाला त्यापेक्षा उपवास या संकल्पनेच्या मागचा विचार
महत्त्वाचा !
Ref: Maharashtra Today