Blog Views

हाचि सुबोध गुरुंचा... गोंदवलेकर महाराज...

हाचि सुबोध गुरुंचा... गोंदवलेकर महाराज...

 

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

 

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

 

आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

 

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

 

स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

 

माझा राम सखा, मी रामाचा दासनित्य बोलावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥

 

यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥

 

आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥

 

दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।

हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥

 

स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥

 

अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥

 

राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धन मान ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥

 

प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥

 

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला 

जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती 

 

श्रीराम जय राम जय जय राम

 

अत्यंत मोजक्या, नेमक्या आणि चपखल शब्दात केलेले हे मार्गदर्शन माझे अत्यंत आवडते आहे. श्रीरामाचे संपूर्ण चरित्र असे क्षुब्ध चित्ताला शांत करणारे आहे. हा शांतरस या काव्यातून ओथंबून वाहातो आहे. साधी सोपी रसाळ वाणी आणि मानवाला संपूर्ण जीवनभर आत्मसात करून जगावे असे तत्वज्ञान. याचे पालन केले तर प्रापंचिक समस्याच उरणार नाहीत इतके सुंदर तत्वज्ञान. माझी आई हे काव्य झोपताना म्हणते. मला ऐकून ऐकून पाठ झाले. माझ्या पत्नीला गर्भावस्थेत रात्री झोप येत नसे. तिला मी हे रोज ऐकवायचो. तिला शांत झोप लागायची. आता माझ्या छोट्या पिल्लूला रोज रात्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि नन्तर हे गुरुवचन ऐकवतो.. तिचे आणि माझे दोघांचे पण मन शांत होते. प्रभू श्रीरामाच्या सर्व भक्तांच्या चरणी गोंदवलेकर महाराजांचे हे काव्य सादर करतो आहे.. याचे नित्य पठण करा. श्रीराम तुम्हाला भवसागर निश्चित पार करून देतील

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs