------------------------------
#मारुतीचे_मूर्ती_प्रकार
-------------------------------
१)वीर मारुती –
वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. त्याच्या हातात गदा असते.
२)दास मारुती –
हात जोडून उभा असलेला. सेवेसी तत्पर असा दक्ष हनुमान.
३)रामसेवक मारुती –
दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असतो. रामाची सेवा करतो म्हणून दास मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.
४)मिश्र मूर्ती –
पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती.
५)योगी मारुती –
योगांजनेय (अंजनी + योगी)
वार्ता विज्ञापन करणारा हनुमान – वार्ताहर हनुमान म्हटलं तरी चालेल. विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.
६)वीणा पुस्तकधारी हनुमान –
मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते. मारुती चांगला संगीत-गायनतज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.
७)पंचमुखी मारुती –
हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुख्य तोंड वानराचे, सिंह, गरुड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वराह आणि अश्व यांचे मुख असते. या संदर्भात एक कल्पना अशीही आहे की वैकुठांची मूर्ती आहे त्यालादेखील सिंह, वराह, अश्व, गरुड यांचे तोंड असते. मधले तोंड हे वासुदेवाचे असते. येथे वानराचे आहे. त्यामुळे यावरून या मूर्तीची संकल्पना घेतलेली असावी असा समज आहे.