*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*🌺.. श्री.व्यंकटेश विजय ..🌺*
__________🔺__________
अध्याय :- १० ..
श्रीवेंकटेश श्रीशुकाचार्यांच्या आश्रमात भोजन करून इतर सर्वदेवादिकांना संतुष्ट करून नारायणपुरास निघाले. नारायणपुरातही आकाशराजाने विवाहाकरिता आवश्यक ती मंडपवगैरे सर्व सामग्री उत्तम रीतीने तयार केली. सायंकाळपर्यंत नवमीच्या दिवशी पुण्याहवाचनादि सर्व वैदिक विधि उरकण्यात आले. सायंकाळी हेरांनी येउन श्रीवेंकटेश नगराजवळ येत असल्याची बातमी राजास सांगितली.
राजा सर्व लवाजमा बरोबर घेऊन देवास सामोरा गेला. पद्मावती सुद्धा एका हत्तिणीवर बसून बरोबर निघाली देवाच्या दर्शनास ती फार उत्सुक झाली होती.
देवाबरोबर सुद्धा पुष्कळ जनसमुदाय असल्याने श्रीभगवान कोठे आहेत हे लवकर कळून येईना. नंतर ज्यांच्या दोन्ही बाजूस ब्रह्मदेव व शंकर चालतात व मध्यभागी श्रीवेंकटेश येत आहेत हे पाहून राजास फार आनंद झाला व डोळ्याचे पारणे फिटल्याचे समाधान झाले. पद्मावतीचे भाग्य थोर म्हणून तिला असा पति मिळाला असे वाटून राजाच्या शरीरावर अष्टसत्विक भाव उठले.
इकडे श्रीवेंकटेशांनी नारदाकडे यात आकाश राजा कोण याची चौकशी करण्यास सुरुवात केली असता नारदांनी त्यांना लांबून दाखविले. दोघेही जवळ येताच आपल्या वाहनावरून उतरले. श्रीवेंकटेशांनी भावीश्वशुरास वाकून नमस्कार केला. राजाने त्यांना उठवून क्षेमालिंगन दिले. उत्तम साहित्यांनी तेथेच चौरंग मांडून श्रीरंगाचे राजाने सीमांत पूजन केले. सर्व मंडळी लग्न मंडपाकडे निघाली. नारायणपुरातील लोकांना श्रीभगवंताला पाहून फार आनंद व समाधान वाटले व सर्वजण पद्मावतीच्या भाग्याची प्रशंसा करू लागले.
मंडपात येताच भगवंतांनी सर्वजण भुकेलेले पाहून भोजनाची व्यवस्था करण्यास राजाच्या भावास सांगितले. उत्तम सर्व पदार्थांनी सर्वांची भोजने झाली. सर्वांची रात्री निद्रा झाल्यावर दुसरे दिवशी सकाळी विवाहाच्या पूर्वीची सर्व तयारी व सर्व वैदिक विधी पार पडले. लग्नाचा मुहूर्त रात्री असल्याने पुनः सर्वांची भोजने झाली. आवश्यक ती वधुवरांकडील मंडळीतेवढी उपोषित राहिली. धरणी देवींनी येऊन भगवंताचे प्रेमाने पूजन केले. देवाचे सौंदर्य पाहून धरणी देवीस फार आनंद झाला. तिने भगवंताना आपल्या हाताने तेल हळद लावली.
नंतर सर्वजण लग्न मंडपाकडे निघाले. ती मिरवणूक फार मोठी व सुंदर होती. वाद्यांचा गजर, दारूकाम, लवाजमा वगैरे सर्व साहित्यपूर्ण चाललेली ती मिरवणूक पाहून नारायणपुरातील लोक संतुष्ट झाले.
विवाह मंडपात जाताच राजाने सर्वांस यथायोग्य आसनावर बसविले. सर्वांचे प्रेमभराने स्वागत केले. मध्यभागी श्रीवेंकटेशास बसवून मधुपर्कपूजा केली. वस्त्राभरणे सर्व वैभव भगवंतास अर्पण केले. वाङनिश्चय झाला.
इकडी पद्मावतीही सर्व वस्त्राभरणे धारण करून विवाहमंडपात आली. अन्तःपट धरला गेला. सर्वांना सावध होण्याचा इशारा देऊन मंगलाष्टके सुरू झाली. उभयतांच्या मस्तकी सर्वांनी मंगलाक्षता टाकताच वाद्यांचा मोठा गजर झाला. राजाने दक्षिणेस भांडारखाना उघडून दिला. श्रीभगवंतास आकाशराजाने रत्नखचित सुवर्णमुकुट दिला. अनेक प्रकारचे वैभव दिले. भगवंतांनी पद्मावतीच्या मस्तकावर आपल्या हातांनी अक्षता घालून वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेविला. उभयतांच्या कडील पुरोहितांनी दोघांचेही गोत्रोच्चार करून कन्यादान करविले. मंगळसूत्र बांधणे, लाजाहोमादि सर्व विधी झाल्यावर वधूवर व इतर लोकांची भोजने झाली. त्यावेळीही फार मोठे समारंभ उत्साहपूर्वक झाले. स्त्रियांनी उटणी खेळण्याचाही कार्यक्रम भगवंताकडून घेतला. चार दिवस लग्न सोहळा झाल्यावर पद्मावतीस पाठविण्याच्या वेळी सर्वांना फार दुःख झाले. धरणी देवीने एक महिनाभर राहावे असा आग्रह केला. भगवंतांनी सर्वांचा प्रेमाने निरोप घेऊन जाण्याचे ठरविले. आपापल्या वाहनावर बसून सर्व देव निघाले पोचविण्यास येणार्यांनी भगवंतांनी प्रेमाने निरोप दिला. भगवंतांनी आकाशराजास वंदन केले. त्यांनी आशीर्वाद दिला.
लग्न झाल्यावर सहा महिने पर्वतावर चढावयाचे नाही म्हणून भगवंतांनी सुवर्णमुखरी पाशी राहण्याचे ठरविले. तेथे अंगिरस ऋषींच्या आश्रमाजवळ एक मंदिर बांधविण्यात आले भगवान तेथे राहू लागले. सर्व देव आपापल्या ठिकाणी परत गेले. या ग्रंथाच्या वाचनपठणाने सर्वांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. *श्रीभगवंताच्या आणखी काही लीला आपण पुढील १।२ अध्यायात पाहू.*
〰〰〰〰〰〰〰🌺
*सं -* श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*