Blog Views

श्री.व्यंकटेश विजय भाग 11

*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*

*🌺.. श्री.व्यंकटेश विजय ..🌺*
__________🔺__________

अध्याय :- ११ ..

श्री वेंकटेशाचा लग्न सोहळा दहाव्या अध्यायात सांगून झाल्यावर पुनः सूतांनी देवाचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली. सूत म्हणाले, हे ऋषिजनहो श्रीभगवान अगस्तिऋषींच्या आश्रमापाशी येऊन राहिले असता त्या अरण्यास अपूर्व शोभा प्राप्त झाली. सर्व वृक्षलतादिक फळाफुलांने नित्य बहरून गेले होते. अशा आश्रमात देव पद्मावतीसह आनंदाने येऊन राहिले.

इकडे नारायणपुरात आकाशराजा उत्तम रीतीने राज्यकारभार करीत राहिला होता. तो एकाएकी फार मोठ्या रोगाने पिडला गेला. त्या रोगाने त्याचा मृत्युकाल जवळ येत चालला होता. दैवगती विचित्र असते. पुढे तो रोग इतका वाढला की, राजाची वाणी बंद झाली. चलनवलन थांबले. त्याला ऊर्ध्वश्वास सुरू झाला.

राजाचा आसन्नमरणकाल जवळ आला हे पाहून तोंडमान नावाच्या राजाच्या भावाने श्रीवेंकटेशाकडे दूत पाठविला, व त्वरित येण्याविषयी कळविले. दूताची बातमी ऐकताच देवी पद्मावती दुःखाने मूर्च्छित पडली. अगस्तीऋषींच्या पत्‍नीने थंड उपचाराने तिला सावध केले. श्रीवेंकटेश बकुला पद्मावतीसह नारायणपुरास आले. भगवंतांनी राजाचे क्षेमकुशलाची चौकशी केली. प्रकृति बरी नसल्याचे ऐकून राजशयनमंदिरात भगवान गेले व त्यांनी राजाची गाठ घेतली. प्रकृतीमान पाहून उभयतांना फारच दुःख झाले. श्रीवेंकटेश राजाचे गुणवर्णन करून शोक करू लागले. ते पाहून राजा सावध होऊन भगवंतास म्हणाला, मी आता चाललो. आपण आता माझ्या बंधूस व मुलास सांभाळावे, असे सांगून राजाने प्राण सोडला. सर्वत्र शोकाकूल झाले. देवी पद्मावती व राणीच्या दुःखास पारावार उरला नाही. देवांनी सर्वांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी तेथे राहून आकाशराजाचे उत्तर कार्य यथासांग करविले. पुष्कळ दानधर्म करविला. ब्राह्मण भोजन वगैरे झाले. भगवान पद्मावती देवीसह आपल्या मंदिरास परत आल्यावर काही दिवस गेले. पुढे राजपुत्र वसुदान व तोंडमान यांच्यात राज्याच्या अधिकाराबद्दल वाद सुरू झाला. वाद संपेना शेवटी ते प्रकरण भगवंताच्याकडे आले. देवी पद्मावतीने आपल्या भावाचा पक्ष घेण्यास भगवंतांना सांगितले व आपली शस्त्रसामग्री तोंडमानास देवविली.

उभयतात घनघोर युद्ध सुरू झाले. विपुल हानी झाली, कोणी कोणास हटेना. भगवंतांनी मेहुण्याच्या बाजूने युद्धात भाग घेतला. त्यांना शस्त्राघाताने मूर्च्छा आली. पद्मावतीस ही बातमी कळताच तिला फारच दुःख झाले. थोड्यावेळाने भगवान सावध झाले. सर्वांचे त्यांनी समाधान केले.

शेवटी अगस्ति ऋषींच्या विचारे उभयतांना राज्य वाटून देण्याचे ठरवून युद्ध थांबविले. सर्व ऐश्वर्याची व राज्याची वाटणी करून तोंडदेशावर तोंडमान यास व नारायणपुरात वसुदान यास राज्यावर बसविले. विभाग करताना शेवटी तीन गावे उरली ती उभयतांनी भगवंतांना दिली. एवढे कार्य करून भगवान आपल्या स्थानी परत आले.

तोंडमान नेहमी श्रीवेंकटेशाच्या दर्शनास येत असे. एके दिवशी असाच तो आला असता त्याने काही तरी आपणाकडुन सेवा घेण्याविषयी विनंती करताच भगवंतांनी आपणास राहण्यास एक विशाल व अतिसुंदर असे मंदीर बांधून देण्यास सांगितले. भगवंताच्या इच्छेप्रमाणे मंदीर बांधून तयार होताच योग्यवेळी वास्तुशांति वगैरे करून भगवान तेथे राहण्यास गेले. वास्तुशांतीचा समारंभही फार मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. भगवंतास उच्चासनावर बसवून सर्व देव व ऋषी वगैरे मंडळींनी पूजा केली. देवांनी व ऋषींनी या ठिकाणी आपण स्थिर राहा असा आशीर्वाद दिला. दोन दिवे लाविले. ते कलियुगाच्या अस्तापर्यंत कायम राहतील असे सांगण्यात आले. तोंडमानाने छत्रचामर वगैरे सर्व ऐश्वर्य भगवंतास समर्पण केले. अनेक प्रकारचे उत्सव समारंभ झाले. ध्वज चढविला गेला. शेवटी अवभृत स्नान करून मंडळी आपापल्या ठिकाणी गेली. शुक्रवारी आकाशराजाने दिलेला मुकुट देवाच्या मस्तकावर घातला जातो. अद्यापि सर्व उत्सव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालतात. मोठी यात्रा नेहमी व अनेक उत्सव येथे होतात. श्रीभगवान आपल्या ऐश्वर्याने या ठिकाणी सतत वास्तव्य करून आहेत. जे कोणी भगवंताच्या दर्शनास जातात त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात. *यापुढील भगवन्माहात्म्य पुढील अध्यायात पाहू.*
〰〰〰〰〰〰〰🔺
*सं* - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs