*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*🌺.. श्री.व्यंकटेश विजय ..🌺*
___________🔺___________
अध्याय :- ९ ..
श्रीवेंकटेशाच्या विवाहाकरिता सर्व देव वेंकट पर्वतावर आले. देवांनी विश्वकर्म्यास मंडप घालण्यास सांगितल्याचे वृत्त आठव्या अध्यायात आहे.
यानंतर ब्रह्मदेवांनी श्रीवेंकटेशास मंगलस्नान करण्यास सांगितले असता देव विचार करू लागले. येथे अठ्याऐंशी हजार ऋषि व तेहत्तीस कोटी देव वगैरे जमा झाले आहेत तेव्हा यांच्या व्यवस्थेकरिता कामे वाटून दिली पाहिजेत.
नंतर वसिष्ठ ऋषीस पौरोहित्य करण्यास सांगितले. शंकरांनी देव व ऋषीचे स्वागत करावे षडाननाने बोलावून योग्य ठिकाणी त्यांना बसवावे त्याला मदनाने मदत करावी. वरुणाने जलपुरवठा करावे. यमाने दुष्टांना शासन करावे. वायूने सुगंधी पदार्थ पुरवावेत. अष्टवसूंनी भांडी घासावीत. नवग्रहांनी पाने मांडावीत.
इतक्यात श्रीवेंकटेश पूर्वपत्नी लक्ष्मीच्या स्मरणाने दुःखी झाले. दुःख का असे देवांनी विचारताच देवांनी कारण सांगितले असता सर्वांनी थोडासा विनोद केला. त्यावेळी देव म्हणाले, ती आल्यावाचून कार्यसिद्धि होणार नाही. नंतर सूर्यास बोलावून श्रीवेंकटेशांनी सांगितले, तू करवीरास जा. तेथे द्वारात उभा राहून रडण्याचे सोंग कर म्हणजे लक्ष्मी तुझी चौकशी करील व तुजबरोबर येईल. एकदा इकडे आल्यावर मी तिची समजूत करीन.
सूर्याने त्याप्रमाणे करताच श्रीलक्ष्मी धावत आली व तिने सूर्याची चौकशी केली. सूर्याने श्रीवेंकटेशाची पहिल्यापासून सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून महालक्ष्मी घाबरून रथावरून ताबडतोब श्रीवेंकटगिरीवर आली. देवांनी प्रेमभराने स्वागत करून सर्व हकीकत सांगितली असता देवी म्हणते आता माझी गरज काय? नवीन कपडा मिळाला असता जुन्यास कोण विचारतो ! देवांनी महालक्ष्मीचे समाधान केले. रामावतारातील आठवण करून वेदवतीबरोबर लग्न केले पाहिजे ही इच्छा तिला सांगताच तिला समाधान वाटले.
सोन्याच्या कढ्यात सुगंधी पाणी तापवून सर्वांनी मंगलस्नाने केली. चौकन्हाण वगैरे झाले. मंगलवाद्यांचे गजर सुरू झाले. नंतर श्रीदेवास केशरकस्तुरीचा मळवट भरून उत्तम कपडे नसविले. इकडे पुण्याहवाचनादिकांची तयारी होऊन वसिष्ठ ऋषीने कुलदेवतेची स्थापना करविली. मंडपदेवतांचे स्थापन झाले.
ब्रह्मदेवांनी सर्वांना भोजनाचे आमंत्रण दिले. इतक्यांच्या भोजनव्यवस्थेस पैसा अमाप लागणार म्हणून कुबेरांकडून कागद लिहून कर्ज आणविले. देवांनी साक्षी घातल्या. कारण हे कलियुग आहे. त्याप्रमाणे वागले पाहिजे. पैसा येताच सर्व साहित्य गरुडाकडून आणवून सर्व सिद्धता केली. स्वामीतीर्थात अग्निदेवांनी उत्तम अन्न शिजविले. आकाशगंगेत खीर, देवतीर्थात सर्व भाज्या शिजविल्या. स्वयंपाक झाल्यानंतर पांडूतीर्थापासून मल्लिकार्जुनापर्यंत पाने मांडली. शंकरांनि सर्वांचे स्वागत करून भोजनास बसविले. श्रीवेंकटेशांनी पंक्तीत फिरून सर्वांचा समाचार घेऊन सर्वांना संतुष्ट केले. भोजनोत्तर पान, तांबूल, दक्षिणा वगैरे वाटण्यात आली.
नंतर ब्रह्मदेव, इंद्र, शंकर, लक्ष्मीसह श्रीवेंकटेश भोजनास बसले. सर्वांची भोजने होईपर्यंत सुर्य मावळला. सर्वांनी रात्र तेथेच काढली.
दुसरे दिवशी सकाळी सर्वांनी आपापले आन्हिक उरकून आपापल्या वाहनावरून विवाहास जाण्यास सर्व देव तयार झाले. तो समारंभ फार अपूर्व झाला. इतकी गर्दी झाली की, कित्येकांचे कितीएक पदार्थ हरवले. कोणाची कोणास भेट होईना.
नारायणपुरास विवाहास जात असताना वाटेत श्रीशुकाचार्यांचा आश्रम लागतो. देव येत आहेत हे ऐकताच त्यांना फार आनंद झाला. ते स्वतः सामोरे गेले. स्वागत करून आपल्या आश्रमात त्यांना भोजन दिले. श्रीभगवान हे भक्तिप्रिय आहेत; त्यांना इतर कशाचीही गरज नाहि हे येथे दाखविले आहे. आम्हास सोडून एकट्या देवासच भोजन दिल्यामुळे इतर देवांना वगैरे राग आला. श्रीशुकाचार्यास शाप देण्यास तयार झाले असता श्रीवेंकटेशांनी सर्वांचे समाधान केले. तो दिवस व रात्र श्रीशुकाचार्यांच्या आश्रमात घालविली व नंतर देव आपापल्या ऐश्वर्यासह मिरवत नारायणपुरास निघाले. *यापुढील चरित्र पुढील अध्यायात पाहू.*
〰〰〰〰〰〰〰📕
*सं -* श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*