Blog Views

गणपति अथर्वशीर्ष (मराठी)शांतिपाठ

गणपति अथर्वशीर्ष (मराठी)

शांतिपाठ

 

सदा भद्र तें कान  ऐकोत देवा ।

सदा भद्र तें चक्षु पाहोत देवा ।

असे कल्पिले आयु जे ब्रह्मयाने

जगावे पुरे ते निरोगी तनूने ॥ १ ॥

 

रहावी सदा शक्तिशालीचे अंगे ।

स्तुतिस्तोत्र देवा करु भक्तिरंगे ।

तुझ्या याजनी पूजनी जीचनाचा ।

कळावा खरा अर्थ आम्हां सुखाचा ॥ २ ॥

 

करो स्वस्ति सर्वत्र तो इंद्रदेव ।

जयाच्या धनाचा नसे पूर्ण ठाव ।

जगी स्वस्ति विश्र्वज्ञ पूषा करु दे ।

 

 

तसा संकटा पक्षिराजा हरु दे ॥ ३ ॥

 

सुरांचा गुरु स्वस्ति शांतीस देवो ।

त्रिकाळांत तैसी त्रिधा शांति होवो ।

अशी गाऊनी प्रार्थना नम्रभावे ।

गणेशा तुझे स्तोत्र वाचे वदावे ॥ ४ ॥

मुख्य स्तोत्र

 

गणेशा तुला मी करी वंदनास ।

जगी तत्त्व प्रत्यक्ष तू निर्विशेष ।

जगा निर्मुनी पाळिसी तूच त्यास ।

तसे अन्ति संहारिसी तू तयास ॥ ५ ॥

 

असे सर्व ब्रह्म ते तूचि आहे ।

जे मदीयांतरंगी तुझे रुप पाहे ।

सदा सर्व भूतांत आत्मस्वरुप ।

करी रक्षणा माझिया रे गणेशा ॥ ६ ॥

 

तसे रक्षि वक्त्यास श्रोत्या परेशा ।

ऋतोक्ती असे सत्य हे नित्यरुप ।

सदा देवकार्यी करी दानधर्म ।

तया रक्षी धात्यास जो पाळी धर्म ॥ ७ ॥

 

जयाने जगी वेद कंठस्थ केले ।

तयाला तुवा पाहिजे तारियेले ।

जगी नित्य रक्षी ।

मला मागुनीया पुढोनी तसे ह्या भवाते तराया ॥ ८ ॥

 

वरुनी तसे खालती दक्षिणेला ।

करी रक्षणा पश्र्चिमा उत्तरेला ।

तसे पूर्व बाजूस रक्षी दयाळा ।

तुझे ध्यान चित्ती करी मी कृपाळा ॥ ९ ॥

 

प्रभो वाङ्मया चिन्मया मोदयुक्ता ।

सदा सच्चिदानंद तू विघ्नहर्ता ।

असे ज्ञान विज्ञान सारे तुझ्यात ।

तुझे रुप ते ब्रह्म साक्षात्पुनीत ॥ १० ॥

 

दिसे सर्व जे ते तुझ्यापासुनिया ।

इथे जन्मुनी धारणा लाभुनीया ।

तुझ्यामाजि ते अन्ति होई विलीन ।

तुझ्या आत्मरुपात जाई विरोन ॥ ११ ॥

 

तुझे रुप ते भूमि आकाश आप ।

तुझे रुप ते तेज वायू अमाप ।

तशा चार वाणी परादी तुझ्यात ।

म्हणोनी तुझे नाव वागीश ख्यात ॥ १२ ॥

 

गुणांच्या त्रयातीत तू नित्यरुप ।

तसा तीन देहांहुनी भिन्नरुप ।

असो भूत भावी तथा वर्तमान ।

त्रिकाळास भेदून होसी समान ॥ १३ ॥

 

तुझा मूळ-आधार चक्रात वास ।

तुझ्यामाजी शक्तित्रयांचा निवास ।

तुला नित्य योगी मनामाजी ध्याती ।

तयां आत्मरुपात येई प्रचीती ॥ १४ ॥

 

तुझे रुप ब्रह्मा तसा विष्णु रुद्र ।

तुझे रुप इन्द्राग्नि तो सूर्य चन्द्र ।

तुझे रुप वायूत ब्रह्मात आहे ।

तसे भूर्भुवस्वःत ते नांदताहे ॥ १५ ॥

 

गणादी म्हणोनी अकारा म्हणावे ।

अनुस्वार अर्धेंदुयुक्ते स्मरावे ।

म्हणावा सदा मंत्र ॐकारयुक्त ।

असे हे गणेशा तुझे तंत्ररुप ॥ १६ ॥

 

' गँ  ' तंत्ररुपास ॐकारयुक्ता ।

जपावे तयाने मिळे शांति चित्ता ।

गकारा म्हणोनी अकारा स्मरावे ।

अनुस्वार अर्धेंदुयुक्तास गावे ॥ १७ ॥

 

असा ' गँ ' पदाचा घुमावा निनाद ।

तया संहिता संधिने स्पष्ट नाद ।

गणेशा तुझी हीच तंत्रोक्त विद्या ।

जियेची असे देवता तूचि आद्या ॥ १८ ॥

 

' ॐ गँ ' नमू या गणांच्या पतीला ।

तया एकदन्तस्वरुपा यतीला ।

जये खंडिली वक्र बुद्धि जगात ।

तया वक्रतुंडा मनी साठवीत ॥ १९ ॥

 

असा दंति तो प्रेरणा नित्य देतो ।

चतुर्हस्त जो दन्त हाती धरीतो ।

असे पाश अंकूश तैसाच हाती ।

सदा दाखवी स्वकृपा जो जनान्ती ॥ २० ॥

 

शरीरी तुझ्या लेप हा चंदनाचा ।

तुझा डौल तो रक्तवस्त्रात साचा ।

तुझ्या पूजनी रक्तपुष्पे वहावी ।

तुझी नित्य सेवा गणेशा करावी ॥ २१ ॥

 

तुझ्या मूषकाच्या ध्वजाते स्मरावे ।

तुझ्या शूर्पकर्णा गुणां आठवावे ।

करी जो कृपा भक्तवृंदावरी तो ।

असा देव तू या जगा हेतु होतो ॥ २२ ॥

 

असे देव तूं सृष्टिपूर्वी अनादी ।

तसा प्रकृतीचा असे तूच आदी ।

प्रकृतिप्रेरकाच्या अतीत असे

तुझे रुप ध्याती जगी तेच मुक्त ॥ २३ ॥

 

करी नित्य योगी अशी साधना जो ।

तया योगिश्रेष्ठांत श्रेष्ठत्व दे जो ।

गणांच्या पतीला तया एकदन्ता ।

नमू व्रातमुख्यास जो विघ्नहर्ता ॥ २४ ॥

 

नमूया तया श्रीशिवाच्या सुताला ।

असे मूर्ति जी सौख्यदा ह्या जगाला ।

नमूया तया त्या गणांच्या पतीला ।

सदा विघ्नहर्त्यास लंबोदराला ॥ २५ ॥

 

फलश्रुती

करी पाठ जो नित्य हे स्तोत्र त्याला ।

सदा ब्रह्मरुपात ठेवा मिळाला ।

तयाला मिळे सर्वदा सौख्यप्राप्ती ।

नुरे अल्पही विघ्नचिंता स्वचित्ती ॥ २६ ॥

 

तयाला मिळे पंच पापंतुनीया झणी

मुक्ति स्तोत्रास वाचुनीया ।

सकाळी म्हणोनी निशापातकांना

करी दूर सायं दिवापातकांना ॥ २७ ॥

 

करी पाठ सायं तसे जो प्रभाती ।

तयाला नसे अल्पही पापभीती ।

सदा सर्वदा पाठ आथर्वणाचा ।

करी विघ्ननाशास भावार्थ त्याचा ॥ २८ ॥

 

तयाला मिळे धर्म तैसाच अर्थ ।

मिळोनी मनीचा पुरे काम स्वार्थ ।

मिळे अंती मुक्ती तया पाठकाला ।

नये स्तोत्र देऊ कुमार्गी नराला ॥ २९ ॥

 

जयाच्या मनी भाव श्रद्धा नसेल ।

तयाला न द्यावे जगी स्तोत्र, फोल ।

जरी द्रव्यलोभे कुळाला प्रदान ।

करी स्तोत्र तो पातकी हो महान ॥ ३० ॥

 

सहस्रावरी पाठ याचे करील ।

तरी सत्वरी वांछिता पाविजेल ।

असे स्तोत्र गाऊन देवास स्नान ।

जगी घाली तो होय वक्ता महान ॥ ३१ ॥

 

चतुर्थी तिथीला निराहार राही ।

तया प्राप्त विद्या जगी नित्य पाही ।

असे सत्य ही उक्ति आथर्वणाची ।

जरी जाणली नष्ट चिंता भवाची ॥ ३२ ॥

 

असे सत्स्वरुपावरी अभ्र आले ।

स्वरुपी रमे ते तदा दूर झाले ।

कुणाची नसे भीति त्याला भवात ।

सदा नित्य विघ्नेश ध्याई मनात ॥ ३३ ॥

 

जरी पूजिला देव दुर्वांकुरांनी ।

कुबेरापरी सौख्य त्याला मिळोनी ।

जगामाजी तैसाच स्वर्गी प्रमोद ।

सदा लाजहोमे यशाचा प्रसाद ॥ ३४ ॥

 

तया प्राप्त होई सदा तीक्ष्ण बुद्धि ।

मनी पूजिता प्राप्त होईल ऋद्धी ।

सहस्त्रावरी मोदका यज्ञि दान ।

तया लाभतो वांछितार्थ प्रसन्न ॥ ३५ ॥

 

गणेशास होमात अर्पील भक्त ।

समिद्पूर्ण स्वाहा असे जी घृताक्त ।

तरी सर्व लाभेल हे सत्य पाहे ।

द्विजा आठ, स्तोत्रास जो देत आहे ॥ ३६ ॥

 

जगी मंत्र हा सिद्ध व्हाया जपावे ।

नरे स्तोत्र सूर्यग्रही भक्तिभावे गणेशा

तुझ्या मूर्तिसान्निध्ययोगे ।

नद्यांच्या तटी ज्यामुळे तेज जागे ॥ ३७ ॥

 

महाविघ्न आले तरी ते टळेल ।

महादोषही सत्वरी भंगतील ।

महापातकांपासुनी होय मुक्ती ।

तया सर्व विद्या जगी प्राप्त होती ॥ ३८ ॥

 

असे जाणले सार ज्यांनी मनात ।

तयां मुक्ति लाभे स्वरुपी निवांत ।

असा अर्थ हा सांगते श्रौतविद्या ।

अशी ही अथर्वोक्त ती आद्य विद्या ॥ ३९ ॥

 

गुरुने तसे शिष्यवृंदे असावे ।

सदा सौमनस्ये स्वकार्यी रमावे ।

नको द्वेष सर्वत्र शांति प्रभाव ।

तयांचा सदाहो मनी नम्र भाव ॥ ४० ॥

 

करावे गणेशे सदा रक्षणास ।

तयाच्या करी जो अशा या जपास ।

मिळावी तया सौख्यशक्ती अपार ।

असे चिंतुनी अर्पिता पुण्य फार ॥ ४१ ॥

 

असे मूळ गीर्वाण हे स्तोत्र काम्य ।

तया प्राकृतामाजी वाचून पुण्य ।

गणेशात्मजाने अशी शब्दपूजा ।

 

असे वाहिली, धन्य तो विघ्नराजा ॥ ४२ ॥

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs