२१ दुर्वा
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? गणपतीला दुर्वा
प्रिय होण्याचे कारण ?आपण २१ च दुर्वा का वाहाव्यात ?
प्रथम बघूया आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तर – गणपतीला
प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या
शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही.
मग आंतरजालावर (इंटरनेट वर) बसून दुर्वाचे महत्व शोधू
लागलो.
सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.
काण्डात्काण्डा प्ररोहन्ती
परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन
च. (यजुर्वेद १३.२०)
[ऋषी : अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]
अर्थ : हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र
आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध
कर.
गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात
गायी, घोडे, शेळ्या हे
मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैल-शेतीला, गाय-दुध, दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला, युद्धाला इत्यादी आणि शेळी मांस आणि वस्त्रांसाठी (त्या काळी अधिकांश लोक
पशुंचे चर्मचा वापर वस्त्र म्हणून करायचे). या सर्वांसाठी लागणार हिरवीगार दुर्वा.
अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर कुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणी प्रजाजन समृद्ध
होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग - बसण्यासाठी आसन, इत्यादी.
दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ
दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे
प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे
औषधीय गुण माहिती होते. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.
गणपतीला दुर्वा प्रिय होण्याचे कारण ?
एकदा मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला. त्याच्या
कानठळया बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते.
त्यांतून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत
नव्हते. या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठायकरून सोडले होते. संपूर्ण देवलोक
ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते.अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले.
त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला. गणपतीने देवांना
अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. अनलासुराविरूध्द युध्द पुकारले.
अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले.
त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तो
गडबडा लोळू लागला.
त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी
त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्रअसे नाव पडले.
विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव
मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळयातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरूणाने
गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबेना. गणपती
बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता.
इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने एकवीस-एकवीस दुर्वांची जुडी
गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या
अंगाची आग शांत झाली.
गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी
सर्व देवांनी नानाविध उपाय. केले, परंतु दुर्वांनी माझ्या
अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो
यज्ञयाग, व्रतं आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल.
श्री गणेशाला २१ च दुर्वा का वाहाव्यात ?
याबद्दल आंतरजालावर खूप शोध घेतला, आणि
खालील विश्लेषणात्मक स्पष्टीकरण प्राप्त झाले. ह्यावर जाणकारांकडून विस्तृत प्रकाश
टाकावा ही नम्र विनंती
२१ च का तर त्याचे स्पष्टीकरण या प्रमाणे आहे :-
प्रथम दुर्वा या शब्दाचा अर्थ बघू
" दुःखांना वारते ( दूर करते ) ती दुर्वा "
आता संसारात दुःख का आहे ?
तर त्या मागे षड्रिपू आहेत
काम, क्रोध, लोभ,
मोह, मद, मत्सर हे
षड्रिपू दुःखाला कारण होतात.
कसे तर प्रपंचामुळे.
प्रपंच म्हणजे :-
१. ५ ज्ञानेंद्रिय
२. ५ कर्मेंद्रिय
३. ५ तन्मात्रा
४. ५ महाभूते
५. ५ प्राण
यामागे काय असते तर
अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी,
चित्त, अहंकार
या चतुष्टयाचे मागे असतात तीन गुण
सत्व, रज, तम
या तीन गुणांच्या मागे असते
द्वैत म्हणजे मूळ माया आणि परब्रह्म
आणि त्यामागे असते
अद्वैत म्हणजे श्री गणेश.
आता आपण हे सर्व मोजू
६ षड्रिपू
५ प्रपंच
४ चतुष्टय
३ गुण
२ द्वैत
या सर्वांची बेरीज २० होते व शेवटी राहतो १ तो अद्वैत. म्हणजे श्री गणेश.
अशा २१ दुर्वा वहाव्यात.
यातील २० जे दुःखाला कारणीभूत आहेत ते दुर करण्यासाठी . एक अद्वैताला .
अशा २१ दुर्वा श्री गणेशाला अर्पण कराव्यात.
नैवेद्य दाखवून झाला कि एक मोदक आपण गणपतीला ठेवतो व बाकी प्रसाद म्हणून
वितरीत करतो .
अद्वैतातुन जन्म झाल्यावर आपण द्वैतात येतो आणि परब्रह्मा पासून दूर होऊन
मायेच्या प्रभावात येतो. त्यामुळे तीन गुण, मन,बुद्धी, चित्त, अहंकार हे
चतुष्टय, आणि पंच सकार म्हणजे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्रा, महाभूते,
आणि प्राण ( प्रत्येकी पाच ) आणि षड्रिपू असा २० चा समूह आपल्या मूळ
स्वरूपावर आरूढ होतात व कर्मफल सिद्धांतानुसार आपण आपले मूळ स्वरूप विसरुन जन्म
मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो.त्यातुन बाहेर पडण्यासाठी श्री गणेश उपासना आहे.
असा २१ या संख्येचा अर्थ आहे.
म्हणून गणेशाला २१ दुर्वा वाहाव्यात जेणे करून श्री गणेश कृपेने जन्म मरणाच्या
फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्ष लाभुन अंती स्वानंद प्राप्त होवो.