श्री या शब्दाचा अर्थ काय ?
आपण व्यवहारात सुद्धा श्री हा उल्लेख पुरुषाच्या साठी , स्त्री च्या साठी श्रीमती असा उल्लेख करतो.
देवांचा उल्लेख करताना सुद्धा तत्पूर्वी श्री शब्द जोडला जातो.
श्री या शब्दाचे विवेचन भगवतगीतेत केले आहे ते खालील प्रमाणे...
श्री म्हणजे काय तर संपत्ती, साधी संपत्ती नाही तर दैवी संपत्ती. संपत्ती या शब्दाचा अर्थ दैवी गुण हा सुद्ध होतो. श्री या अद्याक्षारात येणारे दैवी गुण भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेच्या सोळाव्या अध्यायात १ ते ३ श्लोकात सांगितले आहेत. ते इथे क्रमवार पद्धतीने सांगतो.
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ (१)
ईश्वरी शक्तीवर ज्याची ठाम श्रद्धा असते तो व्यक्ती निर्भय असतो. निर्भय असणे हा पहिला दैवी गुण आहे.
आत्मशुद्धी अर्थात चांगल्या आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव असणे आणि त्या प्रमाणेच वर्तन असणे, अश्या व्यक्तीचा आत्मा सुद्धा शुद्ध असतो. हा दुसरा दैवी गुण आहे.
ईश्वरी शक्तीशी तादात्म्य पावण्याची दृढ इच्छा हा तिसरा दैवी गुण आहे.
योग अर्थात अष्टांग योग हि योग सिद्धी प्राप्त करणे हा दैवी गुण आहे. योग म्हणजे जोडणे. अष्टांग योग शिकलेला व्यक्ती ईश्वरी तत्वाशी जोडला जातो. हे जोडले जाणे आत्म्याच्या पातळीवर असते आणि त्यामुळे ते चिरंतन असते. योग हा चौथा दैवी गुण आहे.
पहिल्या चारीही गुणांच्या मध्ये स्थिर असणारी बुद्धी आणि चित्त विकसित करणे हा पाचवा दैवी गुण आहे. ( व्यवस्थित )
दान करण्याची प्रवृत्ती. तुमच्याकडे काय आहे या पेक्षा तुमच्या कडे जे आहे ते सत्पात्री व्यक्तीला दान करण्याची आपण क्षमता बाळगून असणे हे महत्वाचे. अशी दानत असणे हा सहावा दैवी गुण आहे.
इंद्रियांना, मनातील वैषयिक भावनांना नियंत्रणात ठेवण्याची क्षमता हा सातवा दैवी गुण आहे.
नित्यकर्मे यथायोग्य पद्धतीने आणि वेळेत पार पाडणे हा आठवा दैवी गुण आहे.
आत्मचिंतन करून स्वतःला जाणून घेणे, स्वतःच्याच वर्तनाचा स्वभावाचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय, असा अभ्यास करून स्वतःतील दोष कमी करणे हा नववा दैवी गुण आहे.
ईश्वराच्या, सत्याच्या किंवा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तपस्या अर्थात लक्ष्यकेंद्रित उपासना करण्याची तयारी हा दहावा दैवी गुण आहे.
अत्यंत सरल स्वभावाचे असणे हा अकरावा दैवी गुण आहे.
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ (२)
कुणालाही त्रास न देण्याची मनोवृत्ती अर्थात अहिंसा हा बारावा दैवी गुण आहे.
मन आणि वाणी यांच्यात ऐक्य असणे अर्थात सत्यभाषण हा तेरावा दैवी गुण आहे.
संताप किंवा रागावर नियंत्रण मिळवणे ( क्रोध विहिनता ) हा चौदावा दैवी गुण आहे.
एखाद्या कार्यात मी कर्ता आहे हा भाव नसणे अर्थात निष्काम कर्म करणे, त्याग हा पंधरावा दैवी गुण आहे.
मनाच्या चंचलतेवर नियंत्रण असणे अर्थात शांती हा सोळावा दैवी गुण आहे.
एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात काही दोष असेल तर त्याला रन्ध्र किंवा छिद्र असे म्हटले जाते. ज्यांचा स्वभाव परनिंदेचा असतो ते अश्या दोषाचीच चर्चा करतात. परनिंदा न करण्याची वृत्ती, छिद्रान्वेषण न करण्याची वृत्ती हा सतरावा दैवी गुण आहे.
समस्त प्राणिमात्रांच्या बद्दल हृदयात करुणा भाव असणे अर्थात दया हा अठरावा दैवी गुण आहे.
लोभाच्या पासून मुक्त असणे हा एकोणिसावा दैवी गुण आहे.
सुखोपभोग घेत असताना सुद्धा त्यात पूर्णपणे न गुंतणे अर्थात अनासक्ती हा विसावा दैवी गुण आहे.
कोमल हृदयाचा असणे अर्थात अहंकार नसणे हा एकविसावा दैवी गुण आहे.
आपल्या कडून चुकीची गोष्ट घडल्यास त्या बद्दल लाज वाटणे आणि काम करताना अपयश आले तरी विचलित न होणे. अर्थात दृढ संकल्प असणे हा बाविसावा दैवी गुण आहे.
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहोनातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ (३)
ईश्वरीय तेज असणारे व्यक्तिमत्व असणे हा तेविसावा दैवी गुण आहे.
कुणालाही क्षमा करता येणे हा चोविसावा दैवी गुण आहे.
कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणे अर्थात धैर्य हा पंचविसावा दैवी गुण आहे.
मन आणि शरीराने शुद्ध असणे अर्थात पवित्रता हा सव्हीसावा दैवी गुण आहे.
कुणाबद्दल सुद्धा मनामध्ये ईर्ष्या नसणे आणि कुणाकडूनही कुठल्याही सन्मानाची अपेक्षा नसणे हा सर्वात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा असा सत्ताविसावा दैवी गुण आहे.
दैवी गुण अंगी असणारी व्यक्ती हि मुक्ती मिळवण्यास पात्र असते. अर्थात या तिन्ही रूपांनी हे देवी मी तुझे नामपठन करतो आहे तू मला या दैवी गुणांनी समृद्ध कर. जरी या गुणांच्या प्राप्तीचे फळ मुक्ती असले तरी सुद्धा हे गुण आत्मसात केल्याने आपले भौतिक जीवन सुद्धा समृद्ध आणि सार्थ होऊ शकते हे आपल्या लक्षात येईल.
आपण सुद्धा हे गुण समुच्चय आत्मसात करण्यासाठी कटिबद्ध होऊ या...
श्री ललिता सहस्त्रनाम भाष्य
लेखक
सुजीत भोगले.